महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
माधव आणि शंतनु अमेरिकेत तर पोचले होते. आता तिथल्या ‘मसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (MIT) मध्ये आवडत्या विभागात, आवडत्या विषयासाठी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची होती. आपण कल्पना करतो, ठरवतो तसं होईलच याची खात्री नसते याचा प्रत्यय दोन्ही मुलांना अमेरिकेत गेल्यागेल्याच घ्यावा लागला. माधवला तर निराशेचा सामना करावा लागला. ‘एमआयटी’ची निवड माधवने केली होती ती प्रत्यक्ष कामाचा अनुभव तिथे मिळत असे म्हणून, पण तिथे गेल्यावर ‘इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग’ शाखेतला त्याने निवडलेला कोर्स फक्त अमेरिकन नागरिकांसाठी आहे असं कळलं. माधवला मार्ग बदलावा लागला. आधी जी.इ.सी. कारखान्यात ‘को-ऑपरेटिव्ह’ कोर्स करायचा आणि त्यानंतर इंजीनिअरिंग असा बदल त्याला करावा लागला.
शंतनुच्या बाबतीत तर मॅट्रिकची परीक्षा पास नसल्यामुळे तो विषय अडचणीचाच झाला. ही परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय संस्थेत प्रवेश देता येणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं. शंतनुने त्यांना आपलं गुणपत्रक दाखवलं, मेकॅनिकल इंजीनिअरिंगशी संबंध नसलेल्या विषयात नापास झाल्याचा आणि मेकॅनिकल इंजीनिअरिंगशी संबंध विषयात उत्तम गुण असल्याचा पुरावा संस्थेच्या डीनसमोर ठवला. व्यक्तिश: हे मुद्दे त्यांना पटूनही ते संस्थेच्या नियमाविरुद्ध काही करू शकत नव्हते. शेवटी त्यांनी सुचवलं की, ‘या मुलाने ‘एमआयटी’ची ‘कॉलेज एन्ट्रन्स एक्झामिनेशन बोर्ड’ घेत असलेली प्रवेशपरीक्षा द्यावी आणि त्यात तो उत्तीर्ण झाल्यास त्याला इथे प्रवेश घेता घेता येईल.’
शंतनुने अक्षरशः सुटकेचा नि:श्वास टाकला. “चला, आता इथे तरी भाषेच्या तावडीतून सुटका होईल!” प्रवेशपरीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी मोठ्या आनंदाने तिथल्या ‘चॉन्सी हॉल स्कूल’मध्ये प्रवेश घेतला. या स्कूलमध्ये थोड्या कालावधीचा प्रशिक्षणवर्ग चालवला जाई. ‘एमआयटी’च्या प्रवेश परीक्षेची तयारी त्यात करून घेतली जाई. इथे शिकवणारे शिक्षक प्रेमळ आणि विद्यार्थ्यांना समजून घेऊन मदत करणारे होते. त्यांनी शंतनुची सर्व कहाणी मनापासून ऐकली आणि मग हळुवारपणे त्याला सांगितलं की, ‘एमआयटी’मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर दोन परकीय भाषा यायला हव्यात. झालं, शंतनुला अक्षरशः ब्रह्मांड आठवलं. म्हणजे इथेही भाषेच्या तावडीतून सुटका होणार नव्हतीच. पुन्हा एकदा एक नाही तर दोन भाषांच्या राक्षसांना समोर जावं लागणार होतं. ज्या जर्मन भाषेने एकदा घात केला होता, तिचाच हात धरूया, असं शंतनुने ठरवलं; कारण फारसं लिहिता आलं नाही तरी, अडखळत का होईना पण थोडंफार बोलता येईल एवढा जर्मनचा आणि त्यांचा परिचय झालेला होता. परकीय भाषेसाठी लेखी परीक्षा नव्हती, तोंडी परीक्षा तेवढीच असणार होती आणि तोच मोठा दिलासा होता. एका भाषेचा प्रश्न सुटला. पुढे काय? दुसरी परकीय भाषा कोणती घ्यायची? विचार करता-करता बुद्धीचातुर्यसंपन्न शंतनुच्या लक्षात आलं की, आपल्याला मातृभाषा मराठी चांगल्या प्रतीची आणि हिंदी बोलण्याइतकी येते आहे. ‘या दोन्ही भाषा चालणार नाहीत, कारण आपण या भाषांची नावंही कधी ऐकलेली नाहीत’ असं तिथले शिक्षक म्हणाले. त्यावर, ‘या दोन्ही भाषा अमेरिकेत जर्मनइतक्याच परकीय आहेत आणि परकीय भाषा युरोपियनच असल्या पाहिजेत असं नियमात कुठेच नाही,’ हा मुद्दा शंतनुने बराच वाद घालून, नाखुशीने का होईना पण तिथल्या शिक्षकांना पटवून घ्यायला लावला. अखेरीस, ‘एमआयटी’च्या रेकॉर्डमध्ये शंतनुच्या दोन परकीय भाषा म्हणून ‘जर्मन आणि मराठी’ या दोन भाषांची नोंद झाली. ही लढाई जिंकल्यावर ‘एमआयटी’ची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणं हे शंतनुसाठी कठीण नव्हतं. ही परीक्षा तो चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला आणि अखेर मेकॅनिकल इंजीनिअरिंगच्या बी.एस्सी. पदवीचा विद्यार्थी म्हणून ‘एमआयटी’मध्ये त्याचा प्रवेश झाला.
एमआयटी मध्ये असलेले सगळे विषय शंतनुच्या आवडीचे होते, त्यामुळे आता काळजीचं कारण उरलेलं नव्हतं. पहिल्या वर्षाला गणित, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान हे विषय नेमलेले होते. स्ट्रक्चरल इंजीनिअरिंग आणि संबंधित विषय दुसऱ्या वर्षाला होते. तिसऱ्या वर्षी मूलतत्त्वांचा सखोल अभ्यास अपेक्षित होता. ‘एमआयटी’मध्ये प्रात्यक्षिक शिक्षण नव्हतं, पण संस्थेच्या वतीने खाजगी इंजीनिअरींग संस्थामध्ये, कारखान्यांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा उत्तम अनुभव, भरपूर संधी इथल्या मुलांना मिळत असे. कारखान्यातही विद्यार्थ्यांकडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं जाई. शंतनुला असा पुष्कळ प्रत्यक्ष अनुभव मिळाला. १९२२ सालच्या सप्टेंबर महिन्यात शंतनुचा ‘मेकॅनिकल इंजीनिअरिंगच्या बीएस्सी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश नक्की झाला. त्या पहिल्याच शैक्षणिक वर्षात १९२३ साली ‘नाइल्स, बेमेंट अँड पॉन्ड इनकॉर्पोरेशन’ नावाच्या कारखान्यातून शंतनुच्या नावाचं पत्र आलं. पत्रातून विचारलं होतं, ‘एमआयटीच्या विद्यार्थ्यांच्या यादीत किर्लोस्कर हे वाचलं. आमच्या कारखान्यानं ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ ला एक मोठं यंत्र पुरवलं आहे. या किर्लोस्करांशी तुझा काही संबंध आहे का? असेल तर मला तुला भेटायला आणि कारखाना दाखवायला आवडेल.’ शंतनुने उत्तरादाखल कळवलं की, ‘मी किर्लोस्कर ब्रदर्सच्या संचालकांचा मोठा मुलगा. मला केवळ तुमचा कारखाना नुसता बघण्यापेक्षा मशीन टूल्स निर्मितीच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव येत्या उन्हाळ्यात घ्यायला आवडेल.’ या पत्रव्यवहारानंतर शंतनुला कनेक्टिकट, हार्टफोर्ड इथल्या ‘प्रँट अँड व्हिटने’ नावाच्या मशीन-टूल्स बनवणाऱ्या कारखान्यात कामाची संधी मिळाली.
पुढारलेल्या देशांमध्ये त्या काळापासूनच शिक्षणसंस्था आणि औद्योगिक संस्था या परस्परांच्या समवेत काम करत असत. विद्यापीठात शिकवणारी व्यक्ती किंवा विद्यार्थी कारखान्यात यंत्रावर काम करताना, तर कारखान्यात वरच्या पदावर काम करणारी व्यक्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापक म्हणून काम करताना दिसू शकत असत. जपान हा या पद्धतीने केलेल्या कामातून मोठं यश मिळवणारा देश आहे. या पद्धतीचा फायदा उद्योजक आणि शिक्षणक्षेत्र अशा दोन्हीकडे लक्षणीय रीतीने होत असे. भारतात परत आल्यावर शंतनुरावांनी इथल्या एका विद्यापीठात असे उपक्रम व्हावेत यासाठी काही वेळा प्रयत्न केले. पण इथल्या शिक्षणसंस्था आणि कारखाने या दोन्हीकडच्या नियमांच्या चौकटीने ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.
अमेरिकेत १९२३ ते १९२६ या काळात शिक्षण घेत असताना शंतनु एमआयटीच्या मुलांसाठी असलेल्या डॉर्मेटरीत राहत होता. त्या मुलांमध्ये तो एकमेव भारतीय होता आणि सगळ्यात लहानही होता. मेकॅनिकल इंजीनिअरिंग आणि मेटलर्जी या दोन आवडत्या विषयांचे कोर्सेस सुरू असल्यामुळे शंतनुचे दिवस मोठ्या उत्साहात चालले होते. शक्य त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन शंतनु कारखान्यात उत्पादन नेमकं कसं होतं ते पाहत असे. न्यू इंग्लिश स्कूलमधले त्रंबकराव तळवलकर जेव्हा अमेरिकेत आले होते, तेव्हा तळवलकर स्केनेक्टडीस राहिले होते. तेव्हा तिथल्या लेथवर तळवलकर वगैरे मंडळी जी कामं करीत ते शॉप पाहायला शंतनु आवर्जून गेला होता. अधिकाधिक गोष्टी पाहणं, समजून घेणं आणि त्या प्रत्यक्षात आणणं, तसंच त्या गोष्टी अधिक प्रगत करण्यासाठी पराकाष्ठा करणं हे शंतनुरावांचं वैशिष्ट्य होतं.
अमेरिकेतील वेगवेगळ्या गोष्टींशी, अनुभवांशी जुळवून घेणं ही अजिबातच सोपी बाब नव्हती. पण शंतनु सगळ्या अवघड परिस्थितीत जिद्दीने अविचलपणे उभा राहिला. वेगवेगळ्या सवयी, संस्कृती असणाऱ्या मुलांबरोबर डॉर्मेटरीत राहताना सगळ्यांशी जमवून घेणं, नावडत्या गोष्टींचा (उदा. सिगारेट ओढणं) तीव्र विरोध करतानाही मैत्री जपणं, आपल्या शाकाहारी खाण्याचं टुमणं न वाजवता हळूहळू समोर येईल ते खायला शिकणं अशा पद्धतीने शंतनुने स्वतःला देश-काल सुसंगत राखलं. अमेरिकेत शिकत असताना, शंतनुची परिस्थिती अत्यंत वाईट झाली ती त्यांचा लाडका चुलतभाऊ मावध याला क्षयासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासलं तेव्हा. सर्दी, खोकल्याने हा आजार सुरू झाला, पण दुखणं बळावत गेलं. शंतनुने माधवला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कुणीही जवळचं नाही, फार परिचितदेखील नाही अशा परक्या देशात शंतनुने एकट्याने या लाडक्या मोठ्या चुलतभावाची नीट व्यवस्था ठेवली. खरंतर आपल्या उष्णकटिबंधीय देशात परतल्यावर माधवला बरं वाटेल या आशेमुळे त्याला भारतात पाठवण्याची शंतनुची तीव्र इच्छा होती, पण एवढा प्रवास झेपणार नाही या कारणाने अमेरिकेतील डॉक्टरांनी ही इच्छा नाकारली. हे सगळं पेलायला शंतनु फार लहान होता, जेमतेम विशीत.
माधव यातून वाचणार नाही, त्याचा अंत:काळ जवळ आला आहे हे शंतनुच्या लक्षात आलं. ही वेळ हातपाय गळून जावेत अशी होती, पण अत्यंत धीराने शंतनुने माधवला शेवटची इच्छा विचारून घेतली. अखेर माधवनी लहान वयात या जगाचा निरोप घेतला. शंतनुवर आभाळ कोसळलं. त्या अवस्थेत माधवचा मृतदेह पेटीत घालण्याचं कामही कोवळ्या वयाच्या, कोवळ्या मनाच्या शंतनुला करावं लागलं. सगळा धीर एकवटून, डोळ्यांतून अश्रू ओघळू न देता शंतनुने या कठोर प्रसंगाला तोंड दिलं. माधवचं आजारपण घरी कळू न देण्यात, सगळं ठीक चाललंय हे भासवत राहण्यातही शंतनुची मानसिक, भावनिक शक्ती पणाला लागत होती. माधवची पत्र येत नाहीयेत म्हटल्यावर घरी शंका यायला सुरुवात झाली आणि अखेर माधव अत्यवस्थ असल्याचं घरी कळवण्याची वेळ शंतनुवर आलीच. माधव गेल्यानंतर अमेरिकेत राहून एकट्याने अभ्यासक्रम पूर्ण करणं हे आणखीनच परीक्षा पाहणारं, कणाकणाने - क्षणाक्षणाने दमवणारं होतं. पण या सगळ्यात पराकोटीच्या ठरलेल्या संकटालाही स्थिरपणे सामोरं जात शंतनुने आपलं शैक्षणिक ध्येय पूर्ण केलं.