महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
उद्योग किंवा व्यवसाय करणं हे खरंतर प्रत्येक क्षणी आव्हान असतं आणि एखादा व्यवसाय लोकाभिमुख झाल्यानंतर, लोकप्रिय झाल्यानंतर किंवा त्या टप्प्यावर असताना तर हे आव्हान अधिकाधिक कसोट्या पाहणारं ठरतं. लक्ष्मणरावांनी सुरू केलेला किर्लोस्करचा एकूण व्यवसाय पुण्यात येऊन ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड’च्या माध्यमातून वृद्धिंगत करायला घेतल्याचा हा काळ शंतनुराव किर्लोस्कर यांच्या व्यक्तित्वातला आणि व्यवसाय वृद्धीतला महत्त्वाचा टप्पा म्हणता येतो. शंतनुरावांनी अनेक वर्षं खेड्यांमधून, गावभागांमधून हिंडल्यानंतर मनोमन ही गोष्ट पक्की ठरवली होती की आपण जी इंजिनं बनवतो ती अगदी छोटीशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या झेपली पाहिजेत आणि वापरायला सुद्धा अगदी सहज आणि सोपी असली पाहिजेत. ही कल्पना अमलात आणताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागणार होत्या. वजनाला कमी असायला हवं, शिवाय हव्या त्या अश्वशक्तीचंही हवं, शिवाय मजबूत असायला हवं आणि वापरायलाही सोपं, कमी गुंतागुंतीचं असायला हवं. याखेरीज त्याची किंमतही अगदी वाजवी हवी, एखाद्या शेतकऱ्याला असे इंजिन किंवा पंप विकत घ्यायला परवडलं नाही तर ते भाड्याने घेऊन सुद्धा त्याला वापरता यायला हवं आणि या सगळ्या गरजा पूर्ण करून ते परवडेल अशा किमतीला देता यायला हवं. एकीकडे व्यवसायदृष्टी आणि समाजभान या दोन्हीची सांगड घालत शंतनुरावांनी आपल्या व्यवसायाला एक मानवतेचा भक्कम आधार दिला होता.
आपल्याकडचे शेतकरी वर्षानुवर्षं संथगतीने चालणारी इंजिनं वापरत असल्यामुळे, त्याचाच आधार त्यांना वाटायचा. नवे प्रयोग करणे किंवा नवीन जलद गतीने चालणारे इंजिन वापरण्याचा सराव किंवा ती वापरण्याची सवय त्यांना होईल की नाही याविषयी सुद्धा शंका होती. जराशी जलद गतीने चालणारी आणि प्रसंगी दुरुस्तीसाठी किंवा सुटे भाग बदलण्याची गरज पडली तर ते त्यांच्या सोयीचे असेल की नाही याचाही विचार करणं गरजेचं होतं आणि जर तसं झालं नाही तर ही नव्या अवतारातली जलद गतीची इंजिनं दुर्लक्षित राहतील, त्याच्याकडे कोणी वळूनही पाहणार नाही अशी सुद्धा एक धास्ती होती. नव्याने तयार करत असलेल्या इंजिनाचं प्रशिक्षण देणंही गरजेचं होतं. अर्थातच खेडोपाडी सर्वदूर पसरलेल्या शेतकऱ्यांपर्यंत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पोहोचवणं, त्यानंतर त्या इंजिनांची विक्री होणं ही मालिका वेळेच्या आणि गतीच्या हिशोबात साहसाचीच ठरणार होती. तरीदेखील मनाशी केलेला निर्धार आणि निश्चयापासून न ढळता शंतनुरावांनी छोटी, उभी आणि जलद इंजिनं बनवायचं धाडस दाखवलं.
अडचणींची मालिका पाहता, समोर उभ्या राहणाऱ्या शंका, संभ्रम बघता अशी इंजिनं मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचं पाऊल हे व्यवसायाच्या दृष्टीने आत्मघातकी होईल की काय, असं वाटत होतं. परंपरागत चाकोरीतून जाणारा आपला शेतकरी हे इंजिन स्वीकारेल का याविषयी सुद्धा साशंकता होती. तोपर्यंत आपल्याकडे रस्टन, नॅशनल, फील्डिंग, राॅबसन ही सगळी इंजिनं आडवी आणि दणदणीत अशी होती. परदेशी कंपन्यांना सुद्धा शेतकऱ्यांना असलेली मोठ्या आणि आडव्या इंजिनांची सवय होती, पण तरी देखील छोटी आणि उभीच इंजिनं बनवायची यावर ठाम असलेल्या शंतनुरावांनी जबरदस्त धैर्याने, आत्मविश्वासाने आणि दूरदृष्टीने अचूक निर्णयावर उडी घेतली. व्यवसायामध्ये अनेकदा समोर असलेली परिस्थिती, उत्पादन वापरकर्ता, त्याची मानसिकता आणि शिवाय व्यवसायाची आर्थिक घडी यावर यशस्वीता ठरते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शंतनुरावांनी घेतलेला हा निर्णय! तो किती प्रमाणात यशस्वी होणार हे कोणीच सांगू शकत नव्हतं. त्यावर येणारा काळ हेच उत्तर होतं, पण शंतनुरावांनी शेतकऱ्यांची सोय, गरज आणि फायदा या त्रिसूत्रीलाच झुकतं माप दिलं.
शंतनुरावांना मनापासून खात्री होती की, आपला शेतकरी हा सुज्ञ आहे. शेतीच्या कामात तरबेज आहे. वर्षानुवर्षं शेतीत खपल्यानंतर एखादं मशीन वा इंजिन वापरताना त्याचा होणारा फायदा-तोटा, त्यामुळे होणारी कामाची सोय याचे आडाखे तो लगेच बांधू शकेल आणि नक्कीच या इंजिनाला मनापासून ‘होकार’ देईल. तो स्वतःच पुढाकाराने हे इंजिन वापरेल असं शंतनुरावांना मनःपूर्वक वाटत होतं. हे नवं पाऊल टाकताना आपल्या आराखड्याला अन् कृतीला यश मिळालं तर इंजिनाचा खप तर वाढेलच, पण पीक उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊन त्यासाठीचा खर्च सुद्धा कमी होईल. एक प्रकारे शेतीप्रधान देशाच्या या प्रतलावर एक सामाजिक कार्य घडून येईल. हा नवा कारखाना सुरू करण्यापूर्वी शंतनुरावांनी सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पडताळून पाहिल्या आणि आणि त्यांच्या विचारात-मनात असलेलं हे इंजिन तयार झालं. शंतनुरावांचा आडाखा इतका अचूक होता की, अगदी थोड्याच अवधीत या इंजिनाने लोकप्रियता मिळवली. १९४९ च्या सुरुवातीला ‘किर्लोस्कर-पेटर ए. व्ही. १’ इंजिनाचा पहिला संच कारखान्यात तयार झाला. त्याची तपासणी केली, चाचणी घेतली आणि इंजिनं उत्तम आहेत याची खात्री पटल्यावरच विकण्याचं निश्चित केलं. २५ एप्रिल १९४९ या दिवशी कारखान्याचं शानदार औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. प्रमुख पाहुणे होते, भारत सरकारचे तत्कालीन उद्योग व पुरवठा मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी. ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ यांच्या प्रवासातला हा एक अविस्मरणीय क्षण होता.
सुरुवातीला विक्रीचा परीघ पुणे जिल्ह्यापुरता ठरवण्यात आला. कारण इंजिनाला आवश्यक असणारी दुरुस्ती किंवा देखभाल ही पुण्यात सोयीची होईल, शेतकऱ्याला मानवेल हा हेतू त्यामागे होता. किर्लोस्कर-पेटर इंजिनाची पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी ती पुण्यातल्या इंजीनियरिंग कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या शेतकी प्रदर्शनात ठेवली. त्यामध्ये किर्लोस्कर कंपनीचे इंजिनावर चालणारे दोन पंप ठेवण्यात आले. पट्टा लावलेल्या इंजिनाच्या साहाय्याने एक पंप सुरू होता, तर दुसरा पंप सरळ इंजिनालाच जोडलेला होता. याच प्रदर्शनात ‘किर्लोस्कर-पेटर’ला पहिला ग्राहक लाभला. वडगाव सरई गावच्या ब्रिजलाल शेठ सारडा यांनी हा पंप विकत घेतला आणि वडगाव सरई आणि भोवतालच्या खेड्यात या इंजिनाविषयी कुतूहल निर्माण झालं.
शेतकीकामासाठी नव्याने घेतलेलं हे यंत्र सुरू करण्यापूर्वी त्यांनी रीतसर नारळ फोडून कामाला सुरुवात केली. पण इंजिनाचं हॅण्डल सुरू केल्यानंतर पाईपमधून पाण्याचा एकही थेंब पडेना. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून सुद्धा पाणी येत नव्हतं. तेव्हा मेकॅनिकने इंजिन बंद केलं आणि इंजिनात बिघाड आहे असं सांगितलं. त्याने ते इंजिन उघडलं, पण त्याला ते पुन्हा जोडता येईना. शेवटी पुण्याहून किर्लोस्कर कंपनीतून नारायण हलगेकर या कुशल कामगाराला बोलावण्यात आलं. इंजिन पुन्हा जोडून लगेच सुरू करण्यात आलं. फुट व्हॉल्व्हच्या चामड्याची झडप थोडी वाकडी झाल्यामुळे त्यात पाणी राहू शकत नव्हतं. हा फुटव्हाॅल्व्ह बदलला आणि इंजिन सुरू झालं. इंजिनाने १५०० फेऱ्यांची गती घेतली. चार इंची पाईपमधून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. या पहिल्यावहिल्या इंजिनाचा वापर ब्रिजलाल शेठ सारडांनी कित्येक वर्षं केला.
या इंजिनाच्या प्रचारासाठी प्रयत्न सुरू झाले. काही मेकॅनिकना हे नवे इंजिन आणि त्याचे बदलता येणारे भाग याचं रीतसर प्रशिक्षण दिलं. शेतकरी ग्राहकांचे छोटे छोटे गट किंवा काही सहकारी संस्थांच्या मदतीने अशा मेकॅनिकच्या नेमणुका करण्यात आल्या. शेतकऱ्यांची इंजिनं व्यवस्थित सुरू राहावी याकरिता त्यांना साहाय्य मिळू लागलं. सोयीची ही इंजिनं शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली. कारण हे साधं सोपं सुटसुटीत इंजिन बैलगाडीमध्ये ठेवून कुठेही नेता येत होतं. शंतनुरावांचा हा निर्णय यशाचा आणि उपयोगितेचा मार्ग ठरला. त्यामुळे ‘ऑइल इंजिन’ म्हटलं की ‘किर्लोस्कर’ हे नाव जोडूनच घेतलं जाऊ लागलं. फक्त आपल्या देशापुरतं नव्हे तर दूरदेशीही या इंजिनाची सोपी हाताळणी लोकप्रिय झाली. परदेशातही नदीचं वा विहिरीचं पाणी काढताना तिथला शेतकरी ‘किर्लोस्कर बसवा’ असं म्हणत. तिथल्या शेतकऱ्यांसाठीही इंजिनं रवाना होत. सुरुवातीच्या परदेशातून येणाऱ्या आडव्या संथगतीच्या इंजिनाची जागा आता शंतनुरावांच्या कल्पनेतून उतरलेल्या ‘उभ्या आणि जलद गतीच्या इंजिना’ने घेतली. ही एक प्रकारे किर्लोस्कर व्यवसायातली नवयशाची गुढी होती. १९११ सालात अगदी आठव्या वर्षी छोट्या शंतनुरावांनी इंजिनाचं एक चित्र रेखाटलं होतं. तेव्हा किर्लोस्कर कारखान्यात सहा हॉर्स पाॅवरचं एकच इंजिन होतं, त्याचंच ते चित्र होतं. समोर असलेल्या-पाहिलेल्या काही गोष्टी कधी मनात घर करतील आणि कधी त्याची बीजं विचारात रुजतील हे सांगता येत नाही. या बीजाला प्रयत्नांची, कृतीशीलतेची जोड असेल तर त्या बीजाला धुमारे फुटल्यावाचून राहत नाहीत.
अमेरिकेहून परत आल्यानंतर शंतनुरावांनी ऑइल इंजिन बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याची रेखाटनं केली आणि ऑइल इंजिनचं नवं रूप कारखान्यात प्रत्यक्ष साकारलं गेलं. ही सारी प्रतिभा होती शंतनुरावांची! या ध्यासपर्वाला जोड मिळाली ती त्यांच्या कल्पकतेची!