महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुरावांच्या आयुष्यात सर्वार्थाने सहकारी होऊन आलेल्या यमुताई म्हणजे प्रेम, निग्रह, कर्तेपणा, सामाजिक कामाचा ओढा आणि कौटुंबिक जबाबदारी यांचा सुरेख मिलाफ होत्या. सासू-सासऱ्यांच्या सहवासात त्यांच्या मूळ स्वभावाला अधिक देखणे असे पैलू पडले. शंतनुरावांची लाभलेली बळकट साथ ही त्यांची ताकद होती, आयुष्याला मिळालेली मनोहर अशी दिशा होती. लग्न होऊन ‘प्रगतीच्या ध्यासाने झपाटलेल्या’ या उद्योजक घराण्यात पाऊल टाकल्यावर यमुताईंनी दिवसागणिक इथली एक न् एक गोष्ट कमालीच्या वेगाने समजून घेतली. देशाला पुढे नेणारे उद्योगकारण, सामाजिक विकासाला दिशा देणारे समाजकारण, सेवाभाव, नवतेचा ध्यास ही सारी किर्लोस्कर घराण्याने आचरणात आणलेली व्रतस्थता होती. हे व्रत यमुताईनी कमालीच्या ऊर्जेने आपलंसं केलं.
यमुताईंनी घराण्याचा प्रत्येक वारसा किती जिद्दीने आणि दूरदृष्टीने जपला त्याचं एक फार बोलकं उदाहरण आहे. यमुताईंना सासूबाईंच्या कामाचा वसा पुढे न्यायचा होता. सासूबाईंनी किर्लोस्करवाडी आणि परिसरातल्या खेड्यापाड्यातल्या स्त्रियांसाठी फार मोठं काम उभं केलं होतं. अगदी शेवटच्या दिवसांतही परिसरातील शेतकरी स्त्रियांचाच विचार राधाबाईंच्या मनात सतत येत होता. किर्लोस्करवाडीमध्ये या स्त्रियांसाठी एक सुतिकागृह सुरू करायचे अशी त्यांची तीव्र इइच्छा होती. त्यामुळे त्यांनी या कामासाठी २४ हजार रुपये बाजूला काढून ठेवले होते. या त्यांच्या थोरपणामुळे वाडीतील मंडळींनी राधाबाईंचा एक संगमरवरी पुतळा उभारून त्यांच्या स्मृती जतन केल्या. अशा लोकोपयोगी कार्यासाठी जनांच्या मनी विराजमान असणाऱ्या सासूबाईंच्या तालमीत यमुताई तयार झाल्या. एकदा राधाबाई आणि गंगावाहिनी दोघीही वाडीत नव्हत्या. नेमके त्याचवेळी एक झाडूवाला त्याच्या बायकोच्या पोटात दुखते आहे हे सांगत आला. त्यावेळी लक्ष्मणराव यमुताईंना म्हणाले की आई इथे नाही, तर तुम्ही याच्या घरी जा. झालं. यमुताईंसाठी हा प्रसंग म्हणजे पहिलाच प्रसंग, पहिलाच अनुभव! त्या अस्वस्थ झाल्या. बाळंतपणाचा तो प्रसंग यमुताईंना अक्षरशः पाहवेना. काय करावे तेही सुचेना. तसेच परत जावे अशी हिमंतदेखील नव्हती. शेवटी त्या बाईची सुटका झाली आणि यमुताईंना हायसं वाटलं. तिची शुश्रुषा करून त्या घरी परत आल्या. त्या प्रसंगाने यमुताईना अंतर्बाह्य हलवले. त्यांनी या विषयात स्वत:ला संपूर्ण तयार करायचे ठरवले आणि पुण्यातील डॉक्टर नूलकर यांच्याकडे सुतिकाशास्त्राचे पद्धतशीर शिक्षण घेतले. यमुताई या अशा समर्पित वृत्तीच्या, अभ्यासू, शिस्तीच्या आणि निग्रहाच्या होत्या.
यमुताईंचा जन्म १९०८ सालचा. मध्यमवर्गीय पण शिक्षणप्रेमी कुटुंबातला. एक विशेष योगायोग म्हणजे यमुताई आणि शंतनुराव या दोघांचेही जन्म मे महिन्यातले. यमुताई वाई इथल्या फाटक घराण्यातल्या. वाईच्या कोर्टात नझर म्हणून काम करीत असलेले रंगनाथ फाटक आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई हे त्यांचे माता-पिता. वाईसारख्या सनातनी वातावरण असलेल्या लहानशा गावात राहत असूनही वडिलांनी यमुताईंना शाळेत घालण्याचे धाडस केले. त्या गावात तो काळ सुधारणेचा अजिबातच नव्हता, तरीही यमुताईंच्या आईला वाटत होतं की आपल्या धाकट्या लेकीने, यमुने किमान मॅट्रिक तरी व्हावे. शाळेतून जातायेताना बायका कुत्सितपणे कुजबुज करीत की, ‘या पाहा इंग्रजी शाळेतल्या मुली चालल्यात.’ अशा वातावरणात यमुताई १९२५ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या. या परीक्षेसाठी त्यावेळी पुण्यात यावे लागत असे. यमुताईदेखील पुण्यात आल्या. त्या वेळी यमुताईंचे बंधू फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे फेलो होते. त्यांनी यमुताईंची राहण्याची सोय महाविद्यालयाच्या वसतिगृहात केली. तेथे शरयू किर्लोस्कर नावाची एक चटपटीत मुलगी होती. ही शरयू म्हणजे शंतनुरावांची चुलत बहीण. यमुताईंच्या बंधूंनी शरयू हिला यमुताईकडे लक्ष द्यायला सांगितले. वसतिगृहात राहत असताना यमुताई आणि शरयू यांच्यामध्ये मैत्रीचे धागे तयार झाले. जे पुढे नात्याच्या माध्यमातून अधिक घट्ट बनले.
सामाजिक कामाकडे असणारा यमुताईंचा कल वाईला असतानाच ‘वनिता मंडळा’च्या कामातून व्यक्त झाला होता. तेव्हा वाईमध्ये चितळे मास्तरांच्या पत्नी वनिता मंडळाचे काम करीत असत. या मंडळाच्या कामाकडे यमुताई लक्ष देत असत. महाविद्यालयात आल्यावर तर यमुताईंनी राष्ट्रीय चळवळीतही भाग घायला सुरुवात केली. फर्ग्युसनमध्ये असताना, १९२७ सालात, पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी स्वयंसेविका म्हणून काम केले होते. ही यमुताईंची मूलभूत आवड पुढच्या काळात अधिक ठळक झाली आणि लक्षणीय असे सामाजिक काम उभारण्यासाठी उपयुक्त ठरली.
किर्लोस्करांच्या घरात आल्यावर कर्तबगार, करारी सासरे, परदेशी शिकून आलेला आधुनिक प्रगत विचारांचा जोडीदार, पारंपरिक वळणाच्या सासूबाई, आल्या-गेल्यांसहित घरात अनेक माणसांचा मोठा राबता असा सारा तोल यमुताईंना सांभाळायचा होता, तो त्यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळला. यमुताई-शंतनुराव यांच्या लग्नाआधीपासूनच राधाबाई आजारी होत्या. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. ‘राधाबाईंना कोणत्याही प्रकारे त्रास होईल असे वागायचे नाही,’ हे यमुताईंना शंतनुरावांनी बजावून ठेवले होते. एकदा लक्ष्मणरावांनी त्यांना राधाबाईंच्या बिछान्याजवळ बोलावून साऱ्या घराच्या किल्ल्या हाती दिल्या आणि सांगितले, “हे घर आजपासून तू सांभाळायचेस!”
घरच्या आणि कंपनीच्या काही जबाबदाऱ्या अशा दोन्ही बाबी यमुताईंनी खुबीने सांभाळल्या. या सगळ्याच्या जोडीला त्या लक्ष्मणरावांबरोबर शेतावरही जात. आपल्याकडे येत असलेल्या गडी-माणसांचीही नीट काळजी घेतली पाहिजे ही सासऱ्यांची शिकवणही यमुताईंनी अंगी बाणवून घेतली होती. घरची-दारची, आली-गेल्याची काळजी घेताघेता यमुताईंचा सगळा वेळ कामाने व्यापलेला असे. मोठमोठे पुढारी, सामान्य शेतकरी, वेगवेगळ्या कंपन्यांचे एजंट्स, ऑडिटर्स, संचालक, संस्थानिक, त्यांचे दिवाण अशा सर्वांचा पाहुणचार त्यांना सांभाळावा लागे. गावात लग्नकार्य असो की कुणी आजारी असो, कुणाचा मृत्यू होवो की कुठे चोरी होवो, कुठे भांडणे विकोपाला जावोत की गावात कुणी कीर्तनकार नाटकमंडळी येवोत, यमुताईंना या साऱ्या गोष्टींत लक्ष घालावे लागे. शारदा मंडळ, कॉंग्रेस कमिटी, महिला मंडळ या सर्वांच्या स्थापनेत यमुताईंना भाग घ्यावा लागला. त्या वेळी कारखान्याचा व्याप फार मोठा नव्हता, पण जे अन्य व्याप होते ते बरेच होते. त्यात, कारखान्यात एखादं नवीन मशीन आलं की शंतनुराव ते पाहायला यमुताईंना कारखान्यात बोलवत आणि त्याचं काम समजावून सांगत. यमुताई ते सारं उत्साहाने आणि उत्कंठेने समजून घेत. या दृढ होत गेलेल्या पती-पत्नीच्या नात्यामुळे आणि यमुताईंना असलेल्या व्यावहारिक समजुतीमुळे पुढे नवीन कारखाना सुरू करण्याच्या वेळी शंतनुरावांनी यमुताईंना सल्ला विचारला आणि तो मानलादेखील. त्यांनी यमुताईंना विचारले, “आपण कुठे कारखाना काढायचा? बंगलोरला की पुण्याला?” त्यावर यमुताईंनी ‘पुणे’ असं म्हटलं. यमुताईंनी पुण्याची निवड केली कारण तोवर त्यांची समाजकार्याची आवड, ओढ अधिक विस्तारली होती आणि आपण मराठी मुलखात राहिलो तर अधिक काम करता येईल असा त्यांचा विचार होता.
यमुताईंचा सामाजिक संघटनात्मक कामाचा वसा विवाहापूर्वीच सुरू झालेला होता, हा प्रवास विवाहानंतर अधिकच विस्तारत गेला. यमुताईंनी किर्लोस्करवाडीत आल्यावर १९३० साली महिला मंडळाची स्थापना केली. १९३१ साली त्या चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे भरलेल्या परिषदेच्या अधिवेशनालाही उपस्थित राहिल्या. तेथे झालेले निर्णय महाराष्ट्रात येऊन त्यांनी येथील कार्यकर्त्यांपर्यंत सविस्तर पोचवले. त्या निमित्ताने त्यांची महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांशी ओळख झाली. १९३७ सालात त्यांनी वाडीतील महिलांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत, आपले मंडळ अखिल भारतीय महिला परिषदेशी जोडले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९३८ साली नाशिक इथे वार्षिक अधिवेशन भरले. त्या संमेलनात यमुताईंनी भाषण केले. हे त्यांचे पहिले भाषण! यमुताईंनी या नंतरचं वार्षिक अधिवेशन आपल्या शाखेतर्फे किर्लोस्करवाडीमध्ये भरवलं. त्या वेळी सुमारे सहाशे प्रतिनिधींची निवास, भोजनाची व्यवस्था यमुताईंनी उत्तम राखली. या प्रवासात पुढे यमुताई महाराष्ट्र महिला परिषदेच्या खजिनदार बनल्या. त्यानंतर १९४२ ते १९४७ या काळात त्यांच्याकडे चिटणीस आणि स्टॅंडिंग कमिटीच्या सदस्य म्हणून कामाची जबाबदारी आली. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी संघटनेच्या वाढीचं उत्तम काम केलं. तोवर महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात केवळ सात शाखा होत्या. यमुताई चिटणीसपदी आल्या, त्यांनी खेड्यापाड्यापासून अनेक ठिकाणी भरपूर प्रवास केला, संघटनेचा हेतू, महत्त्व त्या सर्वदूर पोचवत राहिल्या आणि आपल्या कारकिर्दीत त्यांनी राज्यभरात ५० पेक्षाही अधिक शाखा स्थापन केल्या. अखिल भारतीय महिला परिषदेतर्फे खेड्यांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारी फिरती गाडी उपलब्ध करून दिली. ही गाडी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्यांमध्ये साहाय्य पुरवू लागली. महाराष्ट्रातला हा पहिला फिरता दवाखाना होता. या दवाखान्यासाठी निधी गोळा करण्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली.
तो काळ पारतंत्र्याचा काळ होता. सगळीकडे स्वातंत्र्यासाठी देश पेटून उठावा म्हणून प्रयत्न सुरू होते. १९३०-३२ चा काळ हा असहकार चळवळीचा काळ. त्या काळात किर्लोस्करवाडीत कॉंग्रेस कमिटी स्थापन करण्यात यमुताईंनी पुढाकार घेतला. त्यांच्या स्वतंत्रतेच्या राजकीय प्रेरणाही सामाजिक कामाइतक्याच तीव्र होत्या. त्या प्रेरणेतून त्यांनी कॉंग्रेस कमिटी स्थापन करण्यात पुढाकार घेण्यापासून ते पुढे सूतकताई, प्रभातफेऱ्या, स्वदेशी वस्तूंची विक्री या सगळ्यात हिरीरीने भाग घेतला. १९३३ पासून ते १९४१ सालापर्यंत यमुताईंकडे एक वेगळीच जबाबदारी आली. औंध संस्थानच्या सल्लागार मंडळात सभासद म्हणून त्यांना सहभागी करून घेण्यात आले. श्रीमंत राजेसाहेब यमुताईंच्या सहकार्याचे वेळोवेळी कौतुक करीत. पुढे औंधकरांच्या पुढाकारानेच ‘दक्षिणी संस्थान संघराज्या’ची कल्पना निघाली. यमुताई या संघराज्याच्या प्रमुख कार्यकर्त्या बनल्या. सरदार वल्लभभाई पटेल हे या संस्थेच्या सांगली येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्या संस्थेच्या कामानिमित्ताने संस्थानातील खेड्यापाड्यात प्रचार करण्यासाठी यमुताई हिंडत असत.
यमुताईंकडे तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही होते. त्या कमिटीच्या अध्यक्ष असतानाच्या काळात शंकरराव देव, जयप्रकाश नारायण असे पुढारी वाडीत येऊन गेले. पं. नेहरूंनीही वाडीला भेट दिली होती. ही भेट यमुताईंच्या अध्यक्षीय कारकिर्दीनंतर झाली, पण ते मुक्कामाला यमुताईंच्या घरीच होते.