महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
पाचवी झाल्यावर शंतनुला पुण्यातल्या ‘न्यू इग्लिश स्कूल’मध्ये दाखल करण्यात आलं. त्या शाळेशी संलग्न असणाऱ्या, अत्यंत नावाजलेल्या गद्रे वाड्यातील बोर्डिंग हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था झाली होती. महाराष्ट्राबाहेरचे - इंदूर, हैदराबाद, बडोदा अशा ठिकाणचे विद्यार्थीही या बोर्डिंगमध्ये राहायला असायचे. इथे फार उत्तम शिस्त होती. विद्यार्थ्यांना पहाटे साडेचार वाजता, घंटा झाली की उठावं लागे. प्रातर्विधी आटोपून, अंघोळ, व्यायाम करून सर्वांना अभ्यासाला बसावं लागे. दहा वाजता जेवण होई. विद्यार्थ्यांच्या पंक्तीलाच शिक्षकही जेवायला बसत. प्रत्येक जण आपापली ताट-वाटी आणी. जेवणानंतर शाळेत जायचं. मधल्या सुट्टीत जेवणासाठी परत यायचं. पुन्हा शाळेत जायचं ते संध्याकाळी साडेपाच वाजता बोर्डिंगमध्ये परत यायचं. संध्याकाळी पुन्हा थोडा व्यायाम, थोडा खेळ आणि मग साडेसात वाजता जेवून अभ्यासाला लागायचं. रात्री दहा वाजता झोपण्याची घंटा व्हायची. मुळातच शिस्तशीर, शांत, प्रेमळ असलेल्या शंतनुवर इथल्या सुयोग्य दिनक्रमाचे संस्कार अतिशय परिणामकारकपणे होत राहिले.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तेव्हा सुतारकामही शिकवलं जाई. ‘आमच्या मुलांना सुतार-गवंडी करायचे नाही,’ अशी काही पालकांची तक्रार असण्याचा तो काळ! शंतनु मात्र लहानपणापासून फार आवडीने सुतारकामात रमायचा. शाळेतलं सुतारकामाचं पहिलं बक्षीस शंतनुच्या नावावर होत असे. ‘आमच्या कारखान्यात लोखंडी रंधा वापरतात,’ अशी माहिती तो मोठ्या कौतुकाने सहाध्यायींना सांगत असे. लाकूड आणि धातूंतून नवीन काही घडवण्यामध्ये शंतनुला इतका पराकोटीचा रस होता की तो शालेय मित्रांना सांगे, ‘मला आता काही स्कॉलर व्हायचे नाही, पण जेव्हा मी तांत्रिक शिक्षण घेऊ लागेन तेव्हा मात्र मला जरूर चमकायचं आहे.’
शंतनुला पहिल्यापासूनच आपल्या वाटचालीच्या दिशेची, आवडनिवड, कौशल्य आणि नावड या सगळ्याची नीट कल्पना होती. त्याचं प्रतिबिंब शालेय प्रगतीपुस्तकातही ठळकपणे पडायचं. अंकगणित, बीजगणित, भूमिती या विषयात त्याला नेहमीच पैकीच्या पैकी गुण असत. भाषेशी मात्र कमालीचं वावडं होतं. या भाषांमुळेच त्याला मॅट्रिकला एक नव्हे तर दोन वेळा गोते खावे लागले. त्याने पहिल्या वर्षी संस्कृत घेतलं, पण संस्कृतनं घात केला. दुसऱ्या वर्षी जर्मन घेऊन पाहिलं, पण जर्मननेही त्याला हात दिला नाही. ही मोठी अडचणीची बाब होऊन बसली होती. खरंतर विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असल्याने किर्लोस्करवाडीला गेल्यावर शंतनु शाळकरी मुलांशी विज्ञान तंत्रज्ञानाच्या गप्पा मारी. मुलांना अनेक प्रात्यक्षिकं करून दाखवून मूळ तत्त्व समजावून देई. विमान उडतं कसं? पडणाऱ्या वस्तूची गती काय असते? भरलेल्या ग्लासमधला बर्फाचा तुकडा वितळला तर पाणी बाहेर सांडेल का? असे नाना प्रश्न विचारीत, मुलांना विचारमग्न करी आणि मग तत्त्व समजावून देई.
परीक्षा पद्धतीमुळे मॅट्रिकला दोनदा अपयश आलेल्या शंतनुच्या पुढच्या शिक्षणाचं आता कसं करायचं हा विचार आई-वडील आणि स्वतः शंतनुलाही पडला. हा विचार घरात सुरू असतानाच लक्ष्मणरावांचे एक स्नेही, ‘ओगले ग्लास वर्क्स’च्या संस्थापकांचे बंधू नागूदादा ओगले यांनी लक्ष्मणरावांना काही कॅटलॉग्ज पाठवले. त्या संदर्भात लक्ष्मणरावांनी ओगलेंशी जो पत्रव्यवहार केला, त्या दरम्यान शंतनुच्या शिक्षणातल्या अडचणींबाबत ओगलेंना समजलं. ओगले स्वतः अमेरिकेत काच व्यवसायाचं तांत्रिक शिक्षण घेत होते. त्यांनी शंतनुकरिता अमेरिकेतल्या निरनिराळ्या शैक्षणिक संस्थांची माहिती लक्ष्मणरावांना पाठवून दिली. त्यापैकी ‘मसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (MIT) मध्ये शंतनुने प्रवेश घ्यावा असं ठरलं आणि शंतनुलाही ही कल्पना अगदी पसंत पडली. शंतनुला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पाठवावं आणि अत्यंत हुशार असलेल्या माधव या शंतनुच्या चुलत भावानेही त्याच संस्थेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं असंही पक्कं ठरलं. माधव परत आल्यावर लक्ष्मणरावांचा विद्युतयंत्र उत्पादनांचा विभाग सांभाळेल असं लक्ष्मणरावांनी मनोमन ठरवलं होतं. ‘कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स’ असा एक कोर्स माधवला त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी योग्य वाटला.
ही दोन्ही मुलं अमेरिकेच्या प्रवासाला निघण्याची तारीख ठरली २६ जानेवारी १९२२. तेव्हा शंतनु फक्त १९ वर्षांचा होता आणि माधव त्याच्याहून जेमतेम चार वर्षांनी मोठा. बोट मुंबईहून निघणार होती. हा प्रवास महिना-सव्वा महिना एवढ्या दीर्घ काळाचा होता. त्यामुळे आईने स्वतः १८ शेराचे डबे भरतील एवढा लाडू, शंकरपाळी, चिवडा असा भरगच्च फराळ मुलांबरोबर द्यायला तयार केला. निघायची सगळी तयारी झाली होती. जायचा दिवस जवळ येत होता. आई-वडील आणि सगळ्यांच्या मनाची उलघाल होत होती. आता २६ जानेवारीची प्रतीक्षा सुरू होती. जायचा दिवस उजाडण्यापूर्वी, इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या डॉ. दि. स. सरदेसाई यांनी शंतनु आणि माधव या दोघांना एका मोठ्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये नेऊन ‘पाश्चिमात्य पद्धतीने कसे जेवावे?’ याची ओळख करून दिली.
अखेर २६ तारीख उजाडली. या १९ आणि २३ वर्षांच्या कोवळ्या मुलांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देत, त्यांना निरोप देण्यासाठी किर्लोस्कर, जांभेकरांसह जवळपास ३५-४० जणं बंदरावर हजर होती. राधाबाईंसह सर्व मंडळींचे डोळे सतत भरून येत होते. शंतनु आणि माधववर राधाबाईंचा फार जीव! शंतनुच्या जन्माआधीपासूनच माधव राधाबाईंचा अतिशय लाडका होता, स्वतःच्या मुलांइतका त्यांना तो प्रिय होता. आईचं छत्र माथ्यावर नसलेल्या परदेशात आपण जाणार म्हणून शंतनु, माधवच्या मनातही अस्वस्थता होती. शंतनु, माधव बोटीच्या जिन्याने वर गेले. बोट सुटायची वेळ आली तशी आई धावत येऊन काहीतरी ओरडून सांगत आहे असं शंतनुनं पाहिलं, पण तिचा आवाज तिथल्या गलबल्यात त्यांच्यापर्यंत पोचू शकला नाही. शंतनु विचारात पडला, पण आता काही इलाज नव्हता. भविष्याची, आवडत्या शिक्षणाची ओढ आणि मायदेश, मायेची माणसं सोडून दूर जाण्याचे क्लेष अशा अवस्थेत दोघांनी आपल्या माणसांचा निरोप घेतला. बोटीनं बंदर सोडलं.
मुलं दर आठवड्याला घरी पत्रं पाठवत होती, त्यामुळे घरच्या माणसांना हायसं वाटत असे. शंतनु अमेरिकेत पोचल्यावर त्याच्या मावसभावाचं - शंभूअण्णा जांभेकर यांचं एक पत्र त्याला आलं, त्या पत्रातून आईचे ते ऐकू न आलेले शब्द, तो निर्वाणीचा इशारा शंभूअण्णांनी शंतनुला लिहून कळवला होता. शेवटच्या क्षणी शंतनुपर्यंत न पोचणाऱ्या आवाजात राधाबाई त्याला सांगत होत्या, ‘येताना गोरी मड्डम बायको म्हणून आणू नकोस!’ शंतनुने त्यांना उत्तर पाठवलं, ‘असं काहीही करण्याचं माझ्या मनात नाहीये.’
आता नव्या संस्थेतल्या नव्या अभ्यासाची मोठी उत्सुकता मुलांच्या मनात दाटली होती.