महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुने एमआयटीमध्ये लष्करी शिक्षणासाठी नाव नोदवलं होतं. हे शिक्षण ऐच्छिक होतं, पण हा अनुभव घेण्याची त्याची खूप इच्छा होती. प्रवेशासाठी नाव नोंदवलं, पण आपण परकीय असल्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही असं त्यांना वाटत होतं. सुदैवाने तसं काही घडलं नाही आणि शंतनुला लष्करी शिक्षणाला प्रवेश मिळाला. हे शिक्षण म्हणजे अत्यंत रोमांचक आणि कमालीचा कष्टप्रद अनुभव होता. लष्कर म्हटलं की पराकोटीची शिस्त आलीच! अर्थात शंतनुने लहानपणापासून अनेक अडचणी, प्रतिकूलता यांना तोंड दिलं असल्यामुळे, घरी शिस्तीचंच वातावरण असल्यामुळे लष्करी कष्ट आणि लष्करी शिस्त यांत स्वतःला बसवणं कठीण गेलं नाही. पहिल्या वर्षात कवायतीचं, पायदळाचं शिक्षण देण्यात आलं. वर्ष संपेपर्यंत लष्करी शिस्तीतली कवायत शंतनुला जमू लागली. दुसऱ्या वर्षी अमेरिकन लष्कराचा इतिहास आणि वर्गातच युद्धतंत्रं शिकवण्यात आली. तिसऱ्या वर्षी तोफखान्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यात नाविक तोफखाना, रणांगणावरचा तोफखाना आणि विमाननाशक तोफखाना यांचं प्रशिक्षण होतं. या तीनपैकी आवडीच्या विषयात विद्यार्थ्यांनी पुढचं शिक्षण घेणं अपेक्षित होतं. शंतनुने नाविक तोफखाना निवडला. याचं शिक्षण बॉस्टनपासून सुमारे सहाशे पन्नास मैलावर असणाऱ्या व्हर्जिनिया फोर्ट मोन्रो इथे होणार होतं. स्वतःची मोटार घेऊन, चार मित्रांसह शंतनुने हा प्रवास केला. प्रवासखर्च वाटून घेतल्यामुळे तो बसखर्चापेक्षाही कमी आला. १० जून १९२५ या दिवशी हे प्रशिक्षणार्थी तळावर जाऊन पोहोचले.
तळावर गेल्यावर प्रथम सर्वांना गणवेश देण्यात आले. मग रायफली दिल्या गेल्या. रायफली हाती मिळाल्यानंतर काही जण घाबरले तर काहींचे खांदे ताठ झाले, छाती पुढे आली आणि ते सैनिकी थाटात चालायला लागले. लष्करी प्रशिक्षण सकाळी सात ते अकरा आणि दुपारी एक ते संध्याकाळी पाच या वेळात असे. दुपारी मैदानावर मनसोक्त गोळीबार करण्याची - नेमबाजीची परवानगी प्रशिक्षणार्थींना दिलेली होती. ही सवलत मोठी चित्तथरारक कल्पना मनात आणणारी होती. मात्र प्रत्यक्षात एकच गोळी झाडल्यानंतर बंदुकीच्या चापाचा दणका असा काही खांद्याला बसला की काही विचारायची सोय उरली नाही. खांदा निखळून पडतो की काय असं वाटलं. खांद्यात वेदना घेऊन, दुसरी संधी नको रे बाबा असं मनात म्हणत मुलं गप्प बसली.
यानंतर विमान वेधण्याचं तोफांचं प्रशिक्षण सुरू झालं. धुराने भरलेल्या प्रचंड मोठ्या पिशव्या विमानांच्या शेपटीला लांबच्या लांब दोराने बांधलेल्या असत आणि त्या पिशवीवर तोफ डागायची असे. तोफेवरच्या दुर्बिणीतून पाहून हे निशाण भेदायचं असे. हे फार जोखमीचं शिक्षण होतं. विमानाला काहीही न होता, तोफ डागायची असे. विमानवेधी तोफांची यांत्रिक रचना, त्यातली मशिनगन हा शंतनुच्या कुतुहलाचा मोठा भाग होता. शंतनुला आणखी एक गोष्ट आवडली होती, ती म्हणजे ‘रात्री अचानक हल्ला झाला तर कर्णे बसवलेल्या यंत्राच्या सहाय्याने विमानाचा आवाज ऐकायचा आणि त्यावरून विमानाची जागा लक्षात घेऊन विमानावर प्रकाश टाकायचा आणि मग त्या विमानावर मारा करायचा.’ हे मोठं कौशल्याचं, अचूकतेने करण्याचं काम होतं. मोठ्या तोफेचा गोळा माणसाइतक्या उंचीचा असे. एवढा मोठा गोळा तोफेत भरण्यासाठीच वीस-पंचवीस माणसांची गरज असे. एवढी मोठी तोफ डागल्यावर कानठळ्या बसवणारा आणि कानाचे पडदे फाटू नयेत म्हणून कानात घातलेले बोळे बुचासारखे फटकन बाहेर उडवणारा प्रचंड मोठा आवाज येई. शंतनुकडे ‘फायर’ म्हणून हुकूम देण्याचं काम होतं. एकदा तर तोफेच्या आवाजामुळे खिडकीचं तावदान फुटलं आणि एक माणूस रक्तबंबाळ झाला. शंतनुची तोफ उडतानाचा फोटो घेण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने छोटा कॅमेरा अँगल लावून तयार ठेवलेला होता. तोफेचा आवाज झाला मात्र आणि काही कळायच्या आत तो कॅमेरा शंतनुच्या हातून निसटला आणि खाली पडला. फोटोची कल्पनाही आवाजाबरोबर निसटून गेली.
शंतनु आणि बाकी सर्व प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षण काळात, ‘तोफा, बंदुका, पिस्तुलं, लढाऊ जहाजं, विमानं, सर्च लाईट, बिनतारी संदेश’ या सगळ्याचं शिक्षण दिलं गेलं. कोर्स संपल्यानंतर सगळ्यांना ‘रिझर्व्ह ऑफिसर ऑफ द युनायटेड स्टेटस् आर्मी’ म्हणून प्रमाणपत्रं देण्यात आली.
अमेरिकेत शिकत असताना आपला देश, देशाची अवस्था, भावी काळाच्या प्रगतीची स्वप्नं या विषयीचा विचार शंतनुच्या मनात सतत जागा असे. पाश्चिमात्यांची अजस्र संहारक यंत्रं बघून त्यांच्या मनात येई, ‘आपल्या देशाला सद्यस्थितीतून डोकं वर काढण्यास कसं मिळेल?’ पुढे या संदर्भात त्यांनी ‘किर्लोस्कर खबर’मध्ये एक लेखही लिहिला. त्यात त्यांनी लिहिलं, ‘पण इतकं निराश होण्याचं तरी कारण काय? आम्ही खाली पडलेलो असू, तरी पण वर उठण्याची आमची हिंमत जोपर्यंत खचलेली नाही तोपर्यंत आमचा पराभव झाला आहे असं मानण्याचं मुळीच कारण नाही. उलट आम्ही आता शेवटच्या पायरीवर गेलो असल्याने यापुढील आमचा प्रवास हळूहळू उन्नतिकारकच होणार आहे. रात्रीच्या बाराचा ठोका पडून गेला म्हणजे प्रभात होण्याची वेळ जवळच येऊ लागते.’
शंतनु किर्लोस्कर नावाचा एक देशप्रेमी, ध्येयवादी, आशावादी तरुण अमेरिकेत शिकून देशाच्या सर्वांगीण प्रगतीची स्वप्नं आणि ती स्वप्नं साकारण्याची दृष्टी, धमक घेऊन भारतात परत यायला निघाला होता. 1926 मध्ये अमेरिकेच्या ‘मसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या नामांकित संस्थेने ‘शंतनु लक्ष्मणराव किर्लोस्कर’ या काळापुढे पाहणाऱ्या, द्रष्ट्या आणि विजिगीषू वृत्तीच्या तरुणाला बीएस्सी (इंजीनिअरिंग) ही पदवी प्रदान केली. डोळ्यांत उज्ज्वल स्वप्न, मनात अनंत कल्पना आणि सळसळत्या रक्तात अपार ऊर्जा घेऊन भारताचा एक औद्योगिक शिल्पकार आता मायदेशीच्या वाटेकडे यायला निघाला होता. या वळणावर शैक्षणिक यशाचा आनंद शंतनुच्या सोबत होता, परंतु बालपणापासून परदेशातील एक शैक्षणिक वर्ष असा सदोदित एकत्र असणारा माधव आता परतीच्या वाटेवर आपल्याबरोबर नाही याचं शब्दांपलीकडचं दु:ख त्याच्या मनात दाटत होतं. माधववर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला आपल्याला एकट्याला बोटीतून उतरताना पाहून किती वेदना होतील, हा विचार मनात सलत होता.
शंतनु १९२६ साली जर्मनीमार्गे भारतात परत आला. जर्मनीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेला रामूअण्णांचा मुलगा विष्णू याला परतीच्या प्रवासात आवर्जून भेटून, काही दिवस त्याच्याकडे राहून आला. प्रवास संपला, भारतभूमीचं दर्शन झालं आणि मुंबईतल्या ‘बॅलार्ड पियर’ धक्क्याला बोट लागली तसे शंतनुला स्वागतासाठी आलेल्या आप्तमंडळींचे उत्सुक प्रेमळ चेहरे दिसू लागले. शंतनुला आई दिसली आणि त्याने धावत जाऊन आईला मिठी मारली. तब्बल चार वर्षांनी मायलेकरांची भेट होत होती. शंतनुला बघताच तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. गेल्या चार वर्षांत शंतनुला तिची उणीव किती भासली होती, ते शंतनुला तेव्हाच जाणवलं. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. शंतनु म्हणाला, “आई, मी बोटीवर चढल्यानंतर तू मला काय सांगत होतीस ते शंभूअण्णांनी मला पत्राने कळवलं. मी अमेरिकन मुलीशी लग्न केलेलं नाही.... बघ! मी एकटा परत आलोय.” आईच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिनं चेहरा बाजूला फिरवला आणि तिला रडू फुटलं. तत्क्षणी, ‘मी एकटा परत आलोय’ या वाक्याचा तिच्यावरचा घणाघात शंतनुच्या ध्यानी आला. चार वर्षांपूर्वी भारत सोडताना त्याच्याबरोबर माधव होता!