महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे भूषण ठरलेल्या किर्लोस्कर समूहाचे प्रवर्तक आणि प्रणेते म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर तर वडिलांनी सुरू केलेला उद्योग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम केले ते त्यांचे जेष्ठ पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी. एका उद्योजक घराण्याचं नेतृत्व करता करता, भारतीय उद्योगक्षेत्राचं नेतृत्व करणारे, देशाच्या आणि विशेष करून महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीला कारणीभूत असणारे द्रष्टे उद्योजक म्हणजे पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर.
लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि राधाबाई यांच्या पोटी २८ मे १९०३ रोजी सोलापूर येथे शंतनुचा जन्म झाला. तो विसाव्या शतकाचा प्रारंभ होता. देशावर ब्रिटिशांचा अंमल होता. शंतनुचे वडील लक्ष्मणराव आणि काका रामचंद्रराव तेव्हा बेळगावात सायकल दुरुस्तीचं दुकान चालवत होते. आज कर्नाटक राज्यात असलेलं बेळगाव तेव्हा महाराष्ट्राचाच एक भाग होतं. त्यांचे आणखी एक काका वासुदेवराव हे डॉक्टर होते आणि ते सोलापूर इथे रुग्णसेवा करत होते. त्यांचे चुलतकाका गंगाधरराव यांचं तेव्हा मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण सुरू होतं. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या दक्षिण भागात वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या किर्लोस्कर कुटुंबांतील परस्पर आस्था आणि नातेसंबंध कमालीचे घट्ट होते. लक्ष्मणराव, रामचंद्रराव, वासुदेवराव या सर्वांनी आपल्या मोठ्या पण पांगलेल्या कुटुंबातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. किर्लोस्करांचा अवघा गोतावळा गरज पडेल तिथे परस्परांसाठी धावून जाणारा होता. सोलापूर इथे असणाऱ्या डॉ. वासुदेवराव यांच्याकडे कुटुंबातील सगळे रुग्ण आणि गर्भार स्त्रियांची जबाबदारी होती. घरातल्या लहानग्या मुलांचं प्राथमिक शिक्षण मार्गी लावण्याचं काम रामूअण्णा यांच्याकडे होतं. लक्ष्मणरावांकडे जबाबदारी होती सर्व मुलांचं माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण करणं आणि मुलांना स्वावलंबी बनवणं.
लक्ष्मणरावांच्या पत्नी म्हणजे राधाबाई. शंतनु हे दोघांचं पहिलं अपत्य. घराण्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात नेणाऱ्या या पुत्राच्या जन्मासाठी मात्र त्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. राधाबाई वृत्तीने कमालीच्या धार्मिक, ईश्वरनिष्ठ होत्या. त्यांनी अपत्यप्राप्तीसाठी अनेक व्रतवैकल्यं, उपासतापास केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना दिवस राहिले. राधाबाईंचे गर्भारपणाचे दिवस पूर्ण होत येण्याच्या सुमाराला लक्ष्मणरावांनी त्यांना सोलापूरला डॉ. वासुदेवरावांकडे पाठवलं. डॉ. वासुदेवरावांकडे त्यांची निगुतीने काळजी घेतली गेली आणि १९०३ सालच्या मे महिन्याच्या २८ तारखेला राधाबाईंची सुखरूप सुटका होऊन शंतनुरावांसारखं पुढे विश्वविख्यात होणारं पुत्ररत्न जन्माला आलं. आपल्या व्रतवैकल्यांमुळे अपत्य झाल्याचा अतीव आनंद आणि विश्वास राधाबाईंना वाटत होता, लक्ष्मणरावांचा मात्र या गोष्टींवर विश्वास नव्हता.
१९०३ हे वर्ष किर्लोस्कर घराण्यासाठी महत्त्वाचं ठरलं! या वर्षी जसा शंतनुचा जन्म झाला, त्याचप्रमाणे याच वर्षी योगायोगाने लक्ष्मणरावांच्या हातून किर्लोस्कर उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९०३ साली लक्ष्मणरावांनी बेळगावातलं आपलं सायकलचं दुकान विकलं आणि लोखंडी नांगर तयार करायला सुरुवात केली. त्यांनी सायकलचं दुकान विकून टाकलं. या योगायोगाप्रमाणेच ’शंतनु’ हे त्या काळी फारसं प्रचलित नसलेलं नाव लक्ष्मणरावांनी मुलासाठी निवडलं, हाही एक योगायोगच असावा.
‘शं तनोति इति शंतनु,’ ज्याच्या स्पर्शाने कल्याण होते तो शंतनु! लक्ष्मणराव शंतनुला ‘शांतनू’ म्हणत असत. काही जवळची ज्येष्ठ मंडळीही त्यांना ‘शांतनू’च म्हणत, स्वतः त्यांनी मात्र ‘शंतनु’ हेच नाव स्वीकारलं. शंतनुरावांची कारकिर्द ‘शं तनोति इति शंतनु’ या नामअर्थाला संपूर्ण न्याय देणारी ठरली. शंतनुरावांच्या कर्तबगारीविषयी त्यांच्या ‘बाळ’पणीच ज्योतिष वर्तवलं गेल्याची हकीकतही सांगितली जाते. त्यांच्या आई राधाबाई आणि हैदराबादच्या काकू काशीबाई त्या घटनेचा उल्लेख गप्पांच्या ओघात वारंवार करत असत. झालं असं, की शंतनु जेमतेम दोन महिन्यांचा असताना विख्यात वैदिक पंडित श्री. दा. सातवळेकर यांनी बाळाचा हात पाहिला. सातवळेकर हे किर्लोस्कर कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे स्नेही! बाळ शंतनुचा हात पाहून त्यांनी भविष्य वर्तवलं, ‘या परमभाग्यशाली मुलाच्या हाताखाली हजारो माणसे काम करतील. याच्या दारात हत्ती-घोडे झुलतील. याच्या हातावर राजयोग किंवा अमृतयोग आहे.’ पंडित सातवळेकरांनी हे ज्योतिष वर्तवलं तेव्हा किर्लोस्कर घराणं उद्योगजगतात मोठ्या हिरिरीने उतरेल आणि प्रचंड उद्योग उभारेल याचं काहीही नामोनिशाण नव्हतं. त्यावेळी लक्ष्मणरावांचं बेळगावात फक्त सायकलचं दुकान होतं आणि १९०१ साली तयार केलेलं वैरण कापणी यंत्र ही एक निर्मिती हाती होती. लक्ष्मणरावांच्या यंत्रविषयक उद्योगाच्या कल्पना आणि स्वप्नं मोठी होती, ‘कारखानदार व्हायची इच्छा असणाराने एकाच उद्योगाला वाहून घ्यायला हवं’ असा विचार त्यांच्या मनात बळावत होता, पण प्रत्यक्षात ‘आपल्या मुलाच्या हाताखाली हजारो माणसे काम करतील,’ अशी स्थिती तेव्हा अजिबातच नव्हती.