महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
१९४० च्या दरम्यान किर्लोस्करवाडीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीचा योग आला. ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटी’च्या पुण्यातल्या बैठकीसाठी ते आले होते. तिथे अप्पासाहेब पंतांनी औंध संस्थानातल्या राज्यपद्धतीचे निरीक्षण करण्याची त्यांना विनंती केली. तेव्हा पंडित नेहरू त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित, भारती साराभाई तसेच बाबा रघुदास यांच्यासह औंध आणि किर्लोस्करवाडीला आले. त्यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सात ते आठ हजार लोक जमा झाले होते. १९४२ च्या चळवळीला आता तप्त आणि उग्र स्वरूप प्राप्त झालं होतं. या चळवळीतली भूमिगत मंडळी अनेकदा वाडीला आश्रयाला असत. किर्लोस्करवाडीच्या कारखान्याचे चालक त्यांना पिस्तुले तयार करून पुरवतात, असा एक खोटा कट पोलिसांमार्फत तयार करण्यात आला होता. पिस्तुलाचे काही भाग अनंतराव फळणीकरांच्या घरात ठेवण्याचा प्रयत्न निष्फळ झाला. अनंतरावांच्या घराचीही झडती झाली. पोलिसांनी लक्ष्मणरावांच्या घरात घुसून, घराची झडती घेऊन सामानाची उलथापालथ करून टाकली. या कारस्थानातून बाहेर पडणं गरजेचं होतं. शंतनुरावांच्या अत्यंत धीट, सडेतोड साक्षीने हे कारस्थान मोडून निघालं.
१९४० च्या दरम्यान अगदी साध्या, क्षुल्लक कारणांवरून मतभेद झाले आणि कामगारांनी संप केला. अर्थात तो एकच दिवसात मिटला आणि कारखाना पुन्हा सुरळीत चालू झाला. कारखान्यात साधारण सतराशे कामगार तेव्हा काम करत होते. त्यांच्या अडचणी समजून घेणं सोपं व्हावं म्हणून कामगार कौन्सिलची स्थापना केली. त्याची महिन्यातून एकदा बैठक होत असे. गोविंदराव खोत अनेक वर्षे कामगारांचे पुढारी म्हणून काम पाहत होते. नानासाहेब गुर्जर हे शंतनुरावांचे बिझनेस मॅनेजर म्हणून सगळीकडे भ्रमंती करत असत. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी चालणारे व्यवसाय उद्योग तसंच किर्लोस्करांच्या बरोबरीने नवं काही करू पाहणारे उत्साही व्यावसायिक अशा अनेकांच्या गाठीभेटी होत असत. अशाच एका प्रवासात ‘वेस्टींग हाऊस’चे इंजिनियर क्रॉम्प्टन यांची भेट झाली. कोलॅबरेशन, अर्थात सहकार्याच्या करारावरदेखील कंपनी चालवता येते, ही नवीनच संकल्पना किर्लोस्कर यांना कळली. नवनवीन शक्यता पडताळून पाहायच्या आणि नव्याचा पुरस्कार करत पुढे पाऊल टाकायचं अशा स्वभावामुळे कोलॅबरेशनसाठी सुद्धा पुढे जाण्याचं ठरलं. मात्र त्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली, त्यामुळे तो विषय तिथेच रहित झाला.
युद्धकाळामध्ये व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत होत्या. वाडीतल्या कारखान्यातील काही भाग बंद करावा लागला. मात्र याच दरम्यान सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी गन मेटलच्या पंपाची ऑर्डर दिली. त्याकरता लागणारं कोट्यवधी किमतीचं यंत्रसाहित्य परदेशातून युद्धकाळात आयात करणं अशक्य होतं. त्यामुळे शंतनुरावांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्हाला नेमके कशा प्रकारचे पंप हवे आहेत आणि कसे हवेत ते आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ते बनवून पाहतो, असे विचारले. त्या काळात किर्लोस्कर १२१ नंबरचा ‘नीरा’ नावाचा हातपंप बनवत असत. लष्करी अधिकाऱ्यांनाही साधारण तसेच पंप हवे होते. शंतनुरावांनी लष्करी अधिकाऱ्यांना समजावून सांगत, त्यांचं मन वळवून घेत ‘नीरा १२१’ पंप स्वीकारण्यासाठी उद्युक्त केलं. या पंपांची किंमतही अगदी थोडी होती आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेत त्यांची मागणी पूर्ण करणंही शक्य होतं. हा संवाद फलद्रूप झाला आणि सुरुवातीलाच तीन हजार पंपांची ऑर्डर मिळाली.
युद्धकाळात सरकारला तोफगोळ्याची तीव्र गरज होती. कुठल्याही गोष्टी आयात करणं दुरापास्त झालं होतं. हे ओतीव लोखंडी तोफगोळे अत्यंत काटेकोर मोजमापाने कापावे आणि घासावे लागत. त्यांना आटेही पाडावे लागत. यासाठी सर्वप्रथम एक लेथ बनवण्याची आवश्यकता होती. किर्लोस्करांची फौंड्री मोठी होती. मुळात लेथ मशीन बनवणं हे आव्हान होतं. त्यामुळे शंतनुरावांनी आपल्याकडे असलेली माहिती, ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे रात्रंदिवस प्रयोग केले. राजाभाऊ, अनंतराव, शंभोराव आणि इतरही काही मंडळींनी सलग तीनेक महिने या कामासाठी घाम गाळला आणि लेथ तयार झाल्याची तार दिल्लीला पाठवली. अगदी तातडीने दोन ब्रिटिश अधिकारी लेथच्या तपासणीसाठी किर्लोस्करवाडीला दाखल झाले. अतिशय उत्तम दर्जाचं, काटेकोर मापाचं, उत्तम काम करणारं यंत्र म्हणजेच प्रिसिजन मशीन पाहताच एक अधिकारी अक्षरशः त्या लेथच्या भोवती आनंदाने नाचला. भारतीय यंत्रांचा, भारतीय कौशल्याचा आणि भारतीय धडाडीचा आणि भारतीय श्रमांचाही विजय किर्लोस्करवाडीत नोंदवला गेला.
काळ बदलत होता. पुढे जात होता. काळाच्या पटावर हव्याशा-नकोशा गोष्टी आपली पावलं आपल्या इच्छेविरुद्धही उमटवत चालल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर झालेले बदल लक्ष्मणरावांच्या विचारांच्या पलीकडचे होते. जुन्या जाणत्या माणसांचे दिवस वेगळे होते. याच दरम्यान देशामध्ये सुरू झालेली कामगार चळवळ सगळीकडे पसरली. कायदेभंग या शब्दाचा झेंडा सारे जण मिरवू लागले. किर्लोस्करवाडीला सुद्धा कामगार चळवळीचं हे वारं येऊन ठेपलं. १९४४ साली युनियनने संपाची नोटीस दिली. बोनस, पगारवाढ, रजा या मागण्यांबरोबरच सभा आणि मिरवणुकांचा सुद्धा ताण वाढला. वाटाघाटीतून काहीच निष्पन्न झालं नाही. शेवटी हे प्रकरण लवादाकडे सोपवलं गेलं. १९४५ साली नामदार दादासाहेब मावळणकर यांनी या लवादाचं काम पाहिलं. कामगारांच्या बाजूने काकासाहेब गाडगीळ आणि कारखान्याच्या बाजूने सातारच्या ढवळे आणि जोशी या वकिलांनी हे काम पाहिलं. बोलणी झाली. मध्यस्थी झाली. शंभरेक कामगार परत रुजू झाले. पण बाकीच्यांनी अडवून धरलं. अखेर साधारणपणे ६-७ महिन्यांनंतर कारखान्याने सुचवलेल्या अटींवर संप मागे घेण्यात आला.
एकीकडे शंतनुरावांची कारखानदारीच्या कामात घौडदौड सुरू असताना, लक्ष्मणराव १९४५ च्या दरम्यान किर्लोस्करवाडी सोडून काही दिवस हरिहर आणि नंतर बंगलोर असे वास्तव्याला होते. त्यांचे चिरंजीव प्रभाकर यांनी शेती घेतली होती. लक्ष्मणरावांनी त्या शेतीच्या प्रयोगात खूप लक्ष घातलं. १९४६ साली ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी’ची सुरुवात करण्याकरता लक्ष्मणरावांचे धाकटे चिरंजीव रवींद्र बंगलोरला गेले. एकाच्या शेतीच्या आणि एकाच्या कंपनीच्या कामात लक्ष्मणराव आनंदाने रमले होते. शंभोराव जांभेकर आणि राजारामपंत किर्लोस्कर यांनी बंगलोरलाही कारखाना उभा करण्याची जबाबदारी अगदी चोख बजावली. १९४७ पासून बंगलोरच्या या कंपनीतून विजेच्या मोटारी तयार होऊ लागल्या. त्याच दरम्यान पुण्याला ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’चा कारखाना आकार घेऊ लागला आणि १९४७ च्या एप्रिल अखेरीला शंतनुराव आपल्या कुटुंबासह पुण्यात राहायला आले. वडिलांनी पुण्यात यावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. शंतनुरावांनी सुरू केलेली ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड’ ही कंपनी २६ जुलै १९४६ ला रजिस्टर झाली. त्या काळात कंपनीचं पन्नास लाखांचं भांडवल होतं आणि त्यातले २५ लाखांचे शेअर्स लगेचच विक्रीसाठी तयार झाले.