महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुरावांनी देशाच्या प्रगतीसाठी, हितासाठी, अर्थव्यवस्थेसाठी निगडित जे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वाटले ते लोकांसमोर मांडले. त्यामुळे ‘मी अनेकांच्या शापाचा धनी झालो’ असं ते म्हणत. ‘सत्ताधीशांच्या मनात उद्योजकाने शत्रुत्व निर्माण करणे हे परवडणार नाही’ असा सल्लाही त्यांना अनेकांनी दिला. ‘याची किंमत मोजावी लागेल,’ असं काही जवळच्या मित्रांनी सांगितलं, असंही शंतनुराव म्हणतात.
‘पण मला माझ्या जगण्यामधला आत्मा गमवायचा नव्हता. सत्य, तर्कशुद्धता आणि स्पष्टवक्तेपणाची आस धरून परिणामांना तोंड देत चालायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे काही आहे ते समोर बोलण्याचा माझा निर्णय मी घेतला होता. व्यवसायात आणि प्रत्यक्षातही असा दुटप्पीपणा, निष्काळजीपणा, वैचारिक गोंधळ या सबबींना मी थारा दिला नाही.’
उद्योग-व्यवसाय आणि शिस्तशीर, वक्तशीर, नियोजनबद्ध कामाची सवय, माणसांशी जोडलेपण, यांपुढे जाऊन आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजाच्या हिताच्या गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करणे आणि ती केवळ कोरडी बांधीलकी न मानता ते कर्तव्य मानून किर्लोस्करांनी हे व्रत आजही जपलं आहे. वाडीला असतानाही सामाजिक सुधारणेच्या प्रेरणेमधून लोकांना चोरी, दरोडेखोरीपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या कृतीतून लक्ष्मणरावांनी आदर्श घालून दिला होता. त्यांनी शिक्षा भोगून आलेल्यांना वाडीच्या कारखान्यात नोकरी दिली. अस्पृश्यांसाठी, समता रुजवण्यासाठी त्यांनी जे काम केलं, त्यामुळे त्या वेळच्या कर्मठ मंडळींकडून अगदी वाळीत टाकण्यापर्यंत केलेला निषेधही सोसला.
सव्वाशे वर्षांपूर्वीची, १९१० सालची गोष्ट आहे. लक्ष्मणरावांनी किर्लोस्कर वाडीच्या स्थापनेपासूनच अस्पृश्यता हद्दपार केली होती. अस्पृश्य समाजासाठी वाडीत कोणतीही वेगळी वसाहत नव्हती. लक्ष्मणरावांनी १९१२ साली हरिजन कर्मचाऱ्यांच्या मुलाच्या विवाहासाठी ब्राह्मणाला बोलावल्यावर आसपासच्या खेड्यातील व्यावसायिक गुरूजींनी लक्ष्मणरावांवर - किर्लोस्कर मंडळींवर बहिष्कार टाकला. पण लक्ष्मणराव बधले नाहीत, उलट त्यांनी कंपनीमध्ये एका ब्राह्मणाची - गुरूजींची नेमणूकच करून टाकली. वाडीतील सर्वांची सर्व कार्ये करणं हे त्या व्यक्तीचं काम होतं. औद्योगिक प्रश्न असो, कौटुंबिक असो की सामाजिक असो, लक्ष्मणरावांकडे उत्तर तयार असे. हाच वारसा शंतनुरावांनी तेवढ्याच समर्थपणे पुढे सुरू ठेवला.
शंतनुरावांनी एखाद्या नव्या होतकरू व्यावसायिकाला उभे करण्यासाठीही सातत्याने मदतीचा हात पुढे केला. त्याचवेळी ही मदत त्या व्यक्तीसाठी पांगळेपणा ठरू नये याचीही खबरदारी घेतली. ही दृष्टी नवे उद्योजक आणि समाजाची प्रगती यांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. नव्या व्यावसायिकाला पुढची वाट दिसेपर्यंत, लागेल ती यंत्रसामुग्री शंतनुराव तत्क्षणी पण तात्पुरती पुरवून नवीन उद्योजकाचं काम सुरू करून देत. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करीत, पण त्यांची ही मदत वा हातभार नव्या उद्योजकांनी सक्षम होईपर्यंतच असे.
किर्लोस्कर घराण्यातल्या सर्वच मंडळींनी उद्योगाच्या बरोबरीने सामाजिक कामाला प्राधान्य दिलं होतं. या दृष्टीमुळे लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी सुद्धा आगळ्यावेगळ्या तऱ्हेने साजरी केली गेली. समारंभाच्या दिवशी सुट्टी न देता, दिवसभर पूर्ण वेळ काम करून, त्यानंतर लक्ष्मणरावांना आदरांजली वाहण्यात आली. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी वर्गणी दिली ती ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर प्रतिष्ठान’मध्ये जमा करून घेतली.
लक्ष्मणरावांच्या निधनानंतर १९५७ साली धर्मादाय संस्था म्हणून या प्रतिष्ठानाची सुरुवात झाली. त्याचे मुख्य उद्दिष्ट होते नवीन आणि लघुउद्योगांना बँकेच्या कर्जासाठी मदत करणे आणि उद्योजकांना उत्पादनासंदर्भात तांत्रिक सल्ला देणे. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कितीतरी उद्योगांना उभं करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. शंतनुरावांनी हीच समाजकार्याची जाग निरंतर ठेवून त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी आणि चाहत्यांनी जी वर्गणी जमा केली, तीदेखील या प्रतिष्ठानमध्ये जमा केली. शंतनुराव म्हणतात, ‘समाजातल्या अपंग लोकांसाठी तुम्ही काय करता?’ असा प्रश्न मला विचारला जातो. किर्लोस्करांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठानमार्फत त्यांचे शिक्षण केले जाते. नोकरी-व्यवसायाला जमेल तसा हातभार लावला जातो. दृष्टीहीन किंवा दिव्यांग व्यक्तींच्या जीवाला धोका, दुखापत होऊ शकते, त्यामुळे आमच्या उद्योगात त्यांना प्रत्यक्ष नोकरी देता येत नाही, पण अपंगांना अर्थार्जन करता येईल असं काम करणाऱ्या संस्थांना आम्ही विविध प्रकारे मदत पुरवतो. मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्तींना, मानसिक दौर्बल्य असणाऱ्या स्त्रियांना आणि अडचणीतल्या कितीतरी जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली जाते.
सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी शंतनुरावांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात १९६० दरम्यान दोन योजना सुरू केल्या. किर्लोस्करवाडीला औद्योगिक विकास सुरू झाल्यावर परिसरातल्या खेड्यांमध्ये त्याचे सकारात्मक पडसाद दिसू लागले. याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात खेड शिवापूरमध्ये त्यांनी पहिला प्रयोग केला. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी ही संस्था दीर्घ काळापासून शिक्षणाचे, आरोग्याचे आणि समाज कल्याणाचे काम करते. असाच दुसरा प्रयोग होता औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ मधला ‘कैलास ट्रस्ट’! या दोन्ही संस्थांमार्फत शंतनुरावांनी उपलब्ध करून दिलेल्या यंत्रशाळेमध्ये स्थानिक कामगार गुणवत्तेनुसार काम करतात आणि त्यांचं त्यानुसार वेतन ठरतं. खेड्यातून नोकरी व्यवसायासाठी जी मंडळी स्थलांतर करतात त्यांचा बराचसा खर्च अन्न, प्रवास या बाबींवर खर्ची पडतो. गावात राहूनच प्रशिक्षण घेऊन यंत्रशाळेतून तयार केलेली उत्पादनं पुन्हा किर्लोस्कर कंपनीला पाठवली जातात. काही तरुणांनी तर उत्पादनयंत्रं स्वतःच्या घरी हलवली आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्या कामाला हातभार लावू शकतं. इंजिनाचे सुट्टे भाग पोलादापासून तयार करण्याची ही उत्पादन सुविधा किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीने या दोन्ही संस्थांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिथे घरदार आहे, कुटुंब आहे तिथेच राहून काम करता आलं तर जास्त समाधानाने ते काम करता येईल, याची खात्री शंतनुरावांना होती. हा आगळावेगळा प्रयोगही यशस्वी झाला.
स्वच्छ शहर हा सामाजिक मानसिकतेचा आरसा म्हटला जातो. घर, परिसर स्वच्छ असेल तर ती सामाजिक स्वास्थ्याची पहिली पायरी ठरते. या गोष्टी मुळापासूनच शिकवायला हव्यात असं शंतनुरावांचं म्हणणं होतं. स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या सवयी अगदी लहानपणापासूनच अंगी बाणवल्या तर अनेक गोष्टी सुकर होत जातात. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, कुठल्याही नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी असलात तरी या सवयी तुमच्या प्रगतीच्या वाटेवर नेहमीच उपयोगी पडतात. हाती घेतलेलं कोणतंही काम कमी वेळात आणि जास्तीत जास्त बिनचूक करता येण्यासाठी याच सवयी माणसाची गुणात्मक बाजू वाढवतात. ‘स्वच्छ व सुंदर पुणे’ या चळवळीचा विचार शंतनुरावांच्या मनात अनेक दिवस होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते शालेय स्तरापासून. ‘स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ अशी स्पर्धा देखील घेतली जात असे, जी आजही सुरू आहे. शाळा आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामात विद्यार्थी, शिक्षक यांचा सक्रिय सहभाग पाहून शंतनुरावांना समाधान वाटलं होतं. त्यानंतरही कितीतरी उद्योजकांनी, राजकारणी, समाजकारणी मंडळींनी यापासून प्रेरणा घेतली आणि ही चळवळ पुढे नेली.
‘किर्लोस्कर फाउंडेशन’ संस्थेच्या अंतर्गत विविध समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कामं केली जातात. कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या आहे, हे लक्षात घेऊन घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाविषयीची चळवळदेखील किर्लोस्कर फाउंडेशनच्या अंतर्गत सुरू झाली. ‘कचऱ्यातून संपत्ती’ ही संकल्पना या विचारातून राबवली गेली. किर्लोस्करांच्या सामाजिक कामात निसर्गाचा विचारही समाविष्ट होता. वृक्षारोपण, घर, शाळा, इमारतींच्या परिसरात स्वच्छता राखणे, नीटनेटकेपणा ठेवणे, बायोगॅस प्रकल्प, अखंड सौरऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा देणे, सांडपाण्याचा पुनर्वापर, हरित इमारत यांसारखे समुदायाने मिळून करायचे अनेक प्रकल्प, अनेक उपक्रम किर्लोस्करांच्या संस्थांद्वारे चालविले गेले. एका उद्योजक घराण्याने औद्योगिक प्रगतीबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासाचे पाहिलेले स्वप्न आणि त्यासाठी दिलेले सर्वतोपरी योगदान याची ही कहाणी आदर, आस्था निर्माण करणारी आणि प्रेरणा देणारी, दृष्टीदायी अशी आहे