महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
किर्लोस्करवाडी या वसाहतीची जडणघडण काळाच्या कित्येक पावलं पुढे असलेल्या लक्ष्मणरावांनी सर्वार्थाने जगावेगळी अशीच केली. जातपात, धर्म, स्त्री-पुरुष या भेदांना वाडीच्या जन्मवेळेसच तिलांजली दिली गेली. उद्योगशीलता, यंत्रप्रेम, कष्ट, माणुसकी आणि सकारात्मकता हाच इथला जीवनधर्म होता. एकदा एका तत्कालीन अस्पृश्याच्या घरी काही कार्य होतं. कुंडलच्या भटजींनी ते कार्य करण्याला नकार दिला. लक्ष्मणराव या भावनिक, धार्मिक पेचात धावून गेले. त्यांनी आपल्या एका माणसाला भटजीचं काम करायला सांगितलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जेरेशास्त्री नावाच्या एका तरुण भटजींना कारखान्यात नोकरीवरच ठेवलं आणि किर्लोस्करवाडीतल्या सगळ्या मंगलकार्यांची कायमची सोय करून टाकली. लक्ष्मणराव म्हणत, ‘आम्ही सर्वच घिसाडी. तेव्हा आम्हा सर्वांची जात एक. सर्वांना समान वागणूक.’ या त्यांच्या विचारांमुळे किर्लोस्करवाडीत मुळापासूनच अस्पृश्यता राहिली नाही. ऐन पावसाळ्यात राधाबाई आणि गंगाबाई जांभेकर कामगाराच्या बायकोला प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर मदतीला धावून जात.
आपल्या बरोबर आलेल्या कामगारांचा विचार लक्ष्मणराव अगदी सर्वतोपरी करत. ते स्वतः आस्तिक, श्रद्धाळू नव्हते, तरी कामगारांना पंढरपूरच्या वारीला जायला ते रजा देत. या भाविकांची नेहमीची सोय व्हावी म्हणून त्यांनी किर्लोस्करवाडीतच विठ्ठल मंदिरही स्थापन केलं. सुरुवातीच्या काळात उत्सवसमारंभासाठी वाडीत सभागृह असणं शक्य नव्हतं. पण पुढे तिथल्या तरुणांच्या पुढाकारामुळे, लक्ष्मणरावांच्या परवानगीने वाडीतल्या स्त्री-पुरुषांनी तीन आठवडे रात्रंदिवस खपून पाचसहाशे माणसं बसतील असं सभागृह बांधून काढलं. यासाठी लक्ष्मणरावांनी परवानगीबरोबर फक्त सामान तेवढं पुरवलं. सहकार, सहयोगाची भावना तिथे ही अशी पहिल्यापासून रुजली. या ‘समाजमंदिरा’त सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम तर होतच, पण हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या जागेचा उपयोग आपापल्या प्रार्थनामंदिरासारखाही करीत. वेळी हेच चित्रपटगृह असे, मंगल कार्यालयही असे आणि हॉस्पिटल म्हणूनही या सभागृहाचा उपयोग केला जाई. इथे चित्रपट दाखवायला स्वतः शांतारामबापू येत. आणि इथल्या रंगमंचाची सजावट तर कोल्हापूरचे बाबूराव पेंटर आणि त्यांचे सहकारी दामले-फत्तेलाल यांनी करून दिली होती. या रंगमंचावर पुरुषांच्या प्रमाणेच स्त्रियांचीही नाटकं सादर होत.
नव्यानेच वसलेली किर्लोस्करवाडी वैचारिक दृष्टीने अशी संपन्न होती. ऐहिक सुखसोयी नसलेल्या, तरीही अत्यंत आधुनिक विचारांच्या या प्रथमच वसलेल्या औद्योगिक वसाहतीत, आयुष्याचे अस्सल धडे गिरवत शंतनु लहानाचा मोठा झाला. किर्लोस्करवाडीला आला तेव्हा शंतनु जेमतेम सात वर्षांचा होता. बालवयातला शंतनु, त्याहून तीन वर्षांनी लहान असलेला भाऊ राजाराम आणि बाकी मुलांनी त्या माळरानाला केव्हाच आपल्या खेळाचं मैदान करून टाकलं. ‘फार लांब जाऊ नका, सापांपासून जपा,’ अशा मोठ्यांच्या सूचना कानावर घेत घेत, मनसोक्त खेळत, हुंदडत या मुलांनी ही नवी जागा पटकन आपलीशी केली. उजाड माळावर उभी राहत असलेली नियोजनबद्ध वसाहत उत्सुकतेने निरखणाऱ्या या नव्या पिढीतून नव्या काळाला गतिमान करणारे नवे शिलेदार स्वतःच्याही नकळत तयार होत होते. या शिलेदारांपैकी शंतनुने तर अवघ्या उद्योगविश्वाला कवेत घेत नवा इतिहासच रचला.
किर्लोस्करवाडीत बालवयात आलेल्या शंतनुसह बाकी सर्व मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेकडे लक्ष्मणरावांचं जातीनं लक्ष होतं. इथल्या नव्या व्यवस्थेची किंवा गैरसोयीची झळ मुलांना शिक्षणाच्या बाबतीत बसू नये यावर त्यांचा पूर्ण कटाक्ष होता. प्रत्येक गोष्टीचा सांगोपांग विचार करणाऱ्या लक्ष्मणरावांनी ‘कुंडल इथली तीन किलोमीटरवरची शाळा मुलांना फार लांब होईल’ म्हणून वाडीतल्या एका देवळात जरंडीकर मास्तरांना बोलावून शाळा सुरू केली. पहिली ते चौथीपर्यंतची सगळी मुलं या शाळेत आपापल्या इयत्तेप्रमाणे कोंडाळं करून बसत. उद्योजकाचा मुलगा असूनही शंतनु याच शाळेत जायला लागला. त्याच्या पहिल्या तीन इयत्ता याच शाळेत झाल्या.
शाळेत जाण्याच्या आधीच कारखान्यातले हिशेब तपासनीस मंगेशराव रेगे यांनी आणि रामूअण्णांनी शंतनुला मुळाक्षरं शिकवली होती, पहिल्या दोन इयत्तांचे धडेही गिरवून घेतले होते. पण झालं असं की शंतनुकडे या शिक्षणाचा दाखला नव्हता, कारण तो कोणत्याच शाळेचा नोंदणीकृत, नियमित विद्यार्थी नव्हता. जरंडीकर मास्तर तर कायदे आणि नियमांबाबत कमालीचे जागरूक! मग मास्तरांनी या सात वर्षाच्या मुलाची चाचणी परीक्षा घेतली. या चाचणीत पास झाल्यावर मास्तरांनी छोट्या शंतनुला दुसऱ्या इयत्तेत बसायची परवानगी दिली. मार्च १९१३ मध्ये शंतनु चौथी पास झाला. त्या काळात प्राथमिक शिक्षण, इयत्ता चौथीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून होत असे. हे शिक्षण पूर्ण होऊन, शंतनु आता माध्यमिक शाळेत जाणार होता. आता या मुलाला साताऱ्यामधल्या किंवा पुण्यातल्या शाळेच्या वसतिगृहात शिकायला ठेवावं असा लक्ष्मणरावांचा विचार होता. या दोन्ही शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केल्यावर कळलं की त्या वर्षीचे प्रवेश आधीच होऊन गेले आहेत आणि आता पुढच्या प्रवेशासाठी एक वर्ष थांबावं लागेल. मग हा विषय रामूअण्णांकडे गेला.
रामूअण्णांना औंध संस्थानात तिथल्या राणीसाहेबांना इंग्रजी शिकवण्यासाठी १९१२ सालीच निमंत्रित केलेलं होतं. हे काम दोन तासात संपलं की त्यांना कंटाळा येई आणि म्हणून जोडीला तिथल्या माध्यमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी त्यांना दिली गेली होती. औंध संस्थानात रामूअण्णांकडे सगळी मुलं शिकायला पाठवावीत, मुलं एकत्र राहिली तर परस्परांविषयी प्रेम वाढेल, मुलं खेळीमेळीच्या वातावरणात मोठी होतील असा विचार झाला. रामूअण्णांची चार, डॉ. वासुदेवरावांची तीन, लक्ष्मणरावांची दोघं, डॉ. गंगाधर यांचा एक अशी दहा मुलं रामूअण्णांकडे शिकतील असं ठरलं. शंभोराव जांभेकर यांचा मुलगा रामकृष्ण कुठे शिकणार? म्हणून तोही तिथेच आला. रामूअण्णांनी तिथल्या सरकारी बंगल्यातली डाव्या बाजूची इमारत भाड्याने घेतली आणि तिथे ‘किर्लोस्कराश्रम’ सुरू केला.
या मुलांमध्ये रामकृष्ण सगळ्यात लहान होता. मोठी मुलं त्याच्या खोड्या काढीत. शंतनु मात्र रामकृष्णाची बाजू घेत असे, त्याला मदत करीत असे. खेळ असो, बागकाम असो की दिवाळीतले फटाके, शंतनु लहान रामकृष्णाला नेहमीच सांभाळून घेई. रामूअण्णा स्वतः शिस्तशीर, पद्धतशीर काम करणारे नामवंत शिक्षक होते. त्यांनी या मुलांसाठी खास रचना असलेली टेबलं तयार करवून घेतली होती. त्यात दोन बाजूंना शेल्फची व्यवस्था होती आणि मधली फळी तिरकी उघडत होती. ती फळी पाडली की तिचा लिहिण्याचा डेस्क होई. प्रत्येकाचं टेबल ओळीत एकेका खिडकीशी मांडलेलं असे. खिडकीतून मागून डाव्या बाजूने प्रकाश येईल अशी व्यवस्था केलेली होती. याच टेबलाखाली प्रत्येक जण आपापली वळकटी ठेवत असे. औंधच्या इंग्रजी शाळेत या सगळ्या मुलांचा प्रवेश घेतला होता.
मुलांना औंधला पाठवण्यापूर्वी शंतनुची मुंज व्हावी असा राधाबाईंचा आग्रह होता. चर्चा झाली आणि कुटुंबातील सगळ्या मुलांची सामूहिक मुंज करण्याचं ठरलं. ८ मे १९१३ या दिवशी किर्लोस्कर कुटुंबातल्या सात आणि आणखी दोन अशा एकूण नऊ मुलांच्या मुंजी एकदम झाल्या. रामूअण्णांचे विष्णू, केशव, सोलापूरच्या काकांचे चिमणू, श्रीकृष्ण, हैदराबादच्या डॉ. गंगाधर या चुलत काकांचा भास्कर, लक्ष्मणरावांचे शंतनु, राजाराम ही किर्लोस्करांची मुलं आणि लक्ष्मणराव टिकेकर यांचा सुधांशू आणि रामभाऊ टिकेकरांचा गणू असे दोन टिकेकर या सगळ्या बटूंचा त्यात समावेश होता. मुंजीनंतर मुलांना आश्रमात गुरुगृही शिकायला पाठवलं जाई म्हणून रामूअण्णांनी मुलांसाठी भाड्याने घेतलेल्या घराला ‘किर्लोस्कराश्रम’ असं नाव ठेवलं होतं. आश्रमातली कडक बंधनं मात्र रामूअण्णांच्या या आश्रमात नव्हती. उलट मुलांची छान बडदास्त ते ठेवीत. मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांचं पुरेपूर लक्ष असे. शालेय शिक्षणाबरोबरच रामूअण्णांनी मुलांना पोहायला शिकवलं, व्यायाम करायला शिकवला. जमाखर्च लिहायला शिकवला. आपापले कपडे धुणं, केर काढणं, स्वयंपाकात मदत करणं अशी स्वावलंबी बनवणारी कामंही मुलांना करावी लागत. औंधसारख्या सांस्कृतिक केंद्र असलेल्या संस्थानात या मुलांना वेगवेगळ्या कलांचीही ओळख झाली. मुळात किर्लोस्करांच्या या सगळ्या मुलांचं हस्ताक्षर आणि ड्रॉइंग या दोन्ही गोष्टी वाखाणण्यासारख्या होत्या.
सुट्टीच्या काळात सगळी मुलं किर्लोस्करवाडीला एकत्र येऊन राहत. नुसता दंगा सुरू असायचा. या मुलांना सतत एकत्र राहायला आवडायचं. ही मुलं वाडीतल्या भल्या मोठ्या जागेत भटकंती करायची. कारखान्यात जाऊन कामगारांना पटवून यंत्र चालवून पाहण्यात गढून जायची. कारखान्यात जाऊन वेगवेगळ्या यंत्रांवर स्वतः काम करून पाहणं हा तर लहानग्या शंतनुचा आवडता उद्योग असे. शंतनुने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ऑइल इंजिनचं रेखाचित्र काढलं होतं. तो याहूनही लहान असण्याच्या वयात ‘वडील कार्यालयातली टपालं पाहून इतरांना काय सूचना देतात’ हे कुतुहलाने आणि मन लावून ऐकत असे. हे सारे संस्कार स्वतःत रुजवत मोठ्या होणाऱ्या शंतनुला, त्याच्या भावंडांना आणि त्याच्या मित्रमंडळींना कारखान्यात, कार्यालयात यायला मुक्तद्वार असायचं. फौंड्रीमध्ये एखाद्या पेटीत बाहुल्यांचे साचे दाबून तयार करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी लोखंडाचा रस ओतून झाल्यावर निघालेल्या वस्तू ओतून साफ करून घ्यायच्या हा या मुलांचा तेव्हाचा फार आवडता उद्योग होता. दिवसभर ही मुलं जे अथक उद्योग, प्रयोग, भटकंती करत त्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत मुलं दमून जात. मग सांजवातीलाच आई त्यांना जेवायला वाढीत आणि ही नऊ मुलं जमिनीवर घातलेल्या सतरंजी, पलंगपोसाच्या अंथरुणावर जाऊन पडत. पुन्हा हास्यविनोदांना, खोड्यांना ऊत येई आणि शेवटी या थकलेल्या जीवांच्या डोळ्यात झोप अलगदपणे उतरून येई. हे बालपण अपार मायेच्या उबेत अतिशय सुंदरपणे आकाराला येत होतं.
औंधमधला ‘किर्लोस्कराश्रम’ मुलांसाठी उबदार होता. तिथे ‘शिस्त -शिक्षण- स्वावलंबन’ हे सारं नेटकेपणाने मुलांमध्ये रुजत होतं. परंतु १९१७ साली निरूपाय होऊन ‘किर्लोस्कराश्रम’ बंद करण्याची वेळ आली. तिथे आचारी टिकत नव्हते. त्यातच सीताबाईंचे मुलगे कालीदास आणि विष्णू टायफॉइडने आजारी पडले. या संकटात दुसरी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रामूअण्णांचा आठ वर्षांचा मुलगा चिदंबर आश्रमाजवळील विहिरीत पडला. त्याच्या डोक्याला मोठी खोक पडली आणि तत्क्षणी त्याने प्राण सोडले. या धक्क्याने काकू खचून गेल्या. मुलांचं करणं, जेवणखाणं, खाणीपिणी, शुश्रुषा त्यांच्याकडून होईना. आचारी टिकत नव्हते. त्यामुळे तीन वर्षांनी आश्रम बंद करण्यात आला. मुलं वाडीला परतली. आता मुलांच्या शिक्षणाची दुसरी सोय बघायला हवी होती.
भास्करराव काळे नावाचे एक ध्येयवादी शिक्षक औंधमधल्या शाळेत या मुलांना शिकवत असत. लक्ष्मणरावांनी काळेंची कीर्ती ऐकून त्यांना वाडीला आणलं. काळे यांनी चार महिन्यात मुलांचं वर्ष पूर्ण करून घेतलं. छोटा शंतनु त्या वर्षी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता. पाचवीत गेल्यावर शंतनुला अभ्यासक्रमात दुसरी भाषा घ्यावी लागली. रामूअण्णा वर्षानुवर्षे संस्कृत शिकवीत असत, त्यामुळे शंतनुने संस्कृत भाषा निवडली. शंतनुराव म्हणतात, ‘त्यांनी मला ही भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मला काही ती माझ्या आवाक्यातली वाटली नाही. परिणामी माझा त्यातला रसच उडाला. या चुकीची फार मोठी किंमत मला लवकरच चुकवावी लागली.’