महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुरावांच्या वाटचालीतलं अर्धअधिक आयुष्य औंध संस्थानामध्ये गेलं. संस्थान तसं म्हटलं तर लहान, पण तरी एका भल्यामोठ्या कुटुंबासारखं एकमेकांना धरून राहणारं! संस्थानाचे राजेसाहेब कै. भवानराव पंतप्रतिनिधी आणि शंतनुरावांचे वडील लक्ष्मणराव किर्लोस्कर या दोघांचंही औंध संस्थानातलं आणि शंतनुरावांच्या आयुष्यातलं स्थान अतिशय महत्त्वाचं होतं. राजेसाहेबांना संस्थानातल्या कलासंपन्न, हुशार, कर्तृत्ववान मंडळींविषयी अतिशय प्रेम होतं. मोठ्या अभिमानाने ते कौतुक सांगत असत. किर्लोस्करांच्याही प्रगतीला महाराजांच्या प्रेमाचं आणि सहाय्याचं नेहमीच पाठबळ मिळालं. पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यालासुद्धा जर कारखान्यातलं कुठलंही काम जमत असेल तर त्याला तिथे रोजगाराची संधी मिळत होती. एकूणच परिसरातलं वातावरण सलोख्याचं, साहचर्याचं आणि एकमेकांना पुढे घेऊन जाणारं होतं. अमेरिकेहून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुराव आणि लक्ष्मणराव यांच्यामध्ये पुढे काय करायचं या संदर्भात सुरुवातीला बरीच चर्चा झाली. शंतनुरावांनी घरातला व्यवसाय सांभाळायचा की पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं यासंदर्भात ऊहापोह झाला. उच्च शिक्षणसुद्धा अमेरिकेत घेऊन परत यावं असं शंतनुरावांच्या मनात होतं आणि जे शिक्षण घेऊन शंतनुराव परत आले आहेत त्याचा उपयोग करून त्यांनी कारखान्याचं कामकाज पाहावं, ते अद्ययावत करावं, असं लक्ष्मणरावांना वाटत होतं. शंतनुरावांना ही गोष्ट पटली आणि इथेच राहून कारखान्याची वाढ-विस्तार-भविष्यातल्या संधी यांचा विचार करण्याचं ठरलं.
कारखान्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मनातला हा विचार जाहीरपणे सर्वांसमक्ष मांडताना लक्ष्मणराव म्हणाले, “हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी इमाने इतबारे जे कष्ट केले ते ध्यानात घेता, मी माझं लक्ष आता संशोधन कार्याकडे लावून माझ्या जागी त्यांना काम करण्याची संधी देणार आहे. त्या दृष्टीने माझ्या चिरंजिवांनी परिस्थितीचा हिशेब करून पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत रद्द करून स्वार्थत्याग केला आहे. मी माझे अधिकार त्यांना देणार आहे. त्यांना अनुभव नाही, पण हिंमत मोठी आहे. तरी आपण सगळ्यांनी त्यांना सांभाळून घ्यावे अशी आपणाला विनंती आहे." त्यानंतर शंतनुरावांनी देखील अगदी थोडक्यात बोलताना सर्वांना आवाहन केलं, “मालकांनी काम करण्याची जी संधी दिली आहे तिचा एकजुटीने पूर्ण उपयोग करून आपण कारखाना फायदेशीर करून दाखवूया.”
अशाप्रकारे किर्लोस्करांच्या व्यवसायाचा सुकाणू आता एका शिक्षित, धडपडया, उत्साही आणि नवं काही करू पाहणाऱ्या तरुणाईकडे देण्यात आलं होतं. शंतनुरावांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्कर उद्योगसमूहाला प्रारंभ करताना अमेरिकेतील यंत्रयुगाचं अवलोकन केलं होतं. परदेशातील उद्योग व्यवसायात यंत्र युगातल्या काय काय गोष्टी घडत आहेत, या उत्सुकतेपोटी अनेक मासिकं, दैनिकं ते वाचत होते. कडबा कापण्याच्या यंत्राची कल्पना अशाच एका माहितीपर मासिकावरून त्यांना सुचली होती. याच गोष्टी शंतनुराव मात्र प्रत्यक्ष बघून आले होते. अमेरिकेतली तंत्रविद्या, तिथे सतत होणारे प्रयोग, औद्योगिक वसाहती, उद्योगासाठी धडपडणारे अनेक जण आणि त्या तुलनेत आपल्याकडील औद्योगिक परिस्थिती यातली तफावत याचा त्यांना अंदाज आला होता. त्यातील दरी त्यांनी कारखान्यात काम करताना समक्ष अनुभवली होती. उदाहरणादाखल सांगायचं झालं, तर १९२४ सालात अमेरिकेमध्ये ‘जनरल मोटर्स’ या कंपनीची सहा लाख मोटारी आणि ट्रक्सची विक्री झाली होती आणि त्यावर्षी किर्लोस्कर कारखान्याची नांगरांची विक्री चाळीस हजार होती. या आकडेवारीवरून आपल्याकडच्या शेतकऱ्यांची किंवा इतरही मंडळींची आर्थिक क्षमता, औद्योगिक क्षेत्राशी असलेली मैत्री किंवा औद्योगिक यंत्रसामुग्री वापरण्याकडचा कल किती कमी होता याचा अंदाज येतो. अर्थात ही मानसिकता एका रात्रीत बदलणारी नव्हती. त्यासाठी शेतकऱ्यांना यंत्रं वापरायला सहज आणि हाताळायला सोपी, उपयुक्त आणि मित्रवत वाटायला हवी होती.
शंतनुरावांनी आपल्या कार्यपद्धतीची आपल्या कारखान्यातल्या कामकाजाची नीट माहिती करून घेतली. यंत्र तयार करण्याच्या कल्पनेपासून ते यंत्र संपूर्णपणे तयार होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याकडे, कृतीकडे बारकाईने लक्ष दिलं. जे यंत्र तयार करायचं त्याचं सुरुवातीला ड्रॉईंग तयार करणं, त्या यंत्राच्या लहान सहान पार्टस् वर करावं लागणाऱ्या कामाच्या संपूर्ण तपशीलवार, सुसंगत आणि नेमकी माहिती देणाऱ्या ब्ल्यू प्रिंट्स तयार करणं. त्या पुन:श्च एकदा तपासून घेणं आणि त्यानंतरच कारखान्यामध्ये त्याची निर्मिती करणं असा शिस्तशीर, पद्धतशीर आणि वक्तशीरतेचा पायंडा त्यांनी पाडला. यंत्रांवर प्रयोग करून, मग आवश्यक ते बदल करून यंत्राचं काम कसं चालतं याची निरीक्षणं करण्याकरता ‘यंत्रशाळा’ देखील उभी केली. उद्योग व्यवसाय करताना काळानुरूप बदलांसहित नवीन मालाची निर्मिती, आधी तयार केलेली कारखान्यातली यंत्रं, त्याच्या विक्रीची आणि वितरणाची व्यवस्था इथपासून नफ्यातोट्याच्या गणितापासून ते अगदी प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी नीटपणे बघाव्या लागत. कामगारांच्या भावनिक, आर्थिक अडचणींपर्यंत अनेक गोष्टींकडे बारकाईने, तत्परतेने आणि तेवढ्याच जिव्हाळ्याने बघणं हासुद्धा उद्योग व्यवसायाचा गाभा आहे हे शंतनुरावांना मनोमन माहीत होतं. आपल्या भवतालात असलेल्या खेडोपाड्यातले शेतकरी, शेतमजूर यांना नेमकी कशाची गरज आहे, आपण करत असलेली यंत्रसामग्री त्यांना जास्तीत जास्त सोपेपणाने वापरण्याकरता काय काय बदल करावे लागतील, प्रत्यक्ष यंत्र वापरताना नेमक्या अडचणी कुठे येतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी उन्हातान्हातून, पावसापाण्यातून, खेडोपाडी प्रवास करत त्यांनी फक्त महाराष्ट्रच नाही तर मद्रास, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा दूर राज्यांमध्ये देखील दौरे केले. शेतकऱ्यांचं जगणं जवळून पाहिलं आणि आपण ज्यांच्याकरता ही यंत्रं तयार करतोय, ज्यासाठी हा खटाटोप करतो आहे त्या मूलतत्त्वाकडे त्यांनी डोळसपणे पाहिलं. हीच शंतनुरावांच्या व्यावसायिक दूरदृष्टीची आणि उद्योग जगत व समाज यांच्यामध्ये असणाऱ्या घट्ट नात्याची नांदी होती.
एखादा उद्योग चालवायचा, वाढवायचा म्हटलं की नफा-नुकसानीच्या चक्राला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. आपल्या उद्योगामध्ये असलेल्या स्पर्धकांच्या नव्या कल्पनांचा परिणाम आणि त्याहीपेक्षा जर आर्थिक मंदी आली तर त्याला तोंड देण्याचे धाडस अशा अपेक्षित-अनपेक्षित गोष्टींतून उद्योग आणि उद्योजक तावून-सुलाखून निघत असतो. किर्लोस्करांच्याही वाट्याला अशी आव्हानं अपरिहार्यपणे आलीच. १९२६ सालात सुरू झालेली औद्योगिक मंदीची लाट एक दशकापेक्षाही जास्त काळ ठाण मांडून होती. अक्षरशः ग्रहण लागावं अशा तऱ्हेने सगळेच व्यवसाय झाकोळले गेले होते. अशा या कठीण काळात नवनवीन उत्पादन घेणं आणि त्याच्या विक्रीसाठी अहोरात्र प्रयत्न करणं यासाठी लक्ष्मणराव आणि शंतनुराव दोघेही रात्रंदिवस झटत होते. याच दरम्यान ‘कमाल’ चरकाच्या बरोबरीने शुगर सेंट्रीफ्यूगल तयार करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. १९२९-३० च्या दरम्यान शंतनुरावांनी पहिला सेंट्रीफ्यूगल पंप तयार केला. घरगुती छोटा धंदा म्हणून या शुगर सेंट्रीफ्युगलची उपयुक्तता वाढली. साखर कारखान्यासाठी हे यंत्र नेमकं कसं काम करतं, घरगुती छोटा धंदा म्हणून या यंत्रामुळे उसाचे उत्पादन घेणाऱ्यांना किती फायदा होऊ शकतो, अशा अनेक बाबींवर विचार करून कारखान्याच्या ठिकाणीच ही यंत्रं वापरण्याचं प्रशिक्षण द्यायची व्यवस्था केली. या यंत्रातून तासाला १३० ते १६० पौंड शुद्ध साखर तयार होत असे. याशिवाय कापड उद्योगासाठी जे यंत्रमाग वापरले जात त्याला लागणाऱ्या डॉबीज सुद्धा कारखान्यामध्ये तयार करता येतील हे लक्षात आल्यावर तेही काम किर्लोस्करांच्या कारखान्यात होऊ लागलं. या मंदीच्या लाटेतून तरून जाण्यासाठी लक्ष्मणराव आणि शंतनुरावांनी सर्व दिशांनी प्रयत्न केले.
औद्योगिक आणि शेतकी अवजारांच्या प्रदर्शनामध्ये नित्यनेमाने किर्लोस्करांनी भाग घेतला. या प्रदर्शनांमधून पंपिंग सेट, वसंत चरक, करामत पॉवर अटॅचमेंट, शेंगा फोडण्याचे यंत्र, हॉस्पिटलसाठीचं फर्निचर अशा कितीतरी उपयोगी साधनांची, शेतीसाठी आणि जोडधंदा म्हणून उपयोगी पडणाऱ्या साध्या सोप्या अशा यंत्रांची मांडणी केली. शंतनुरावांनी एकंदरीत मंदीचा काळ किती खडतर होता हे सांगताना एक उदाहरण दिलं, ‘त्या आर्थिक उतरणीच्या काळात त्रिवेंद्रमला एक रुपयाला १०० नारळ मिळत होते. शेतकऱ्याची क्रयशक्ती इतकी कमी झालेली असताना शेतीची अवजारे आणि यंत्रं त्यांना विकणं हे अतिशय जिकिरीचं होतं.’
भारताचा हा काळ उलथापालथीचा होता. देशभरातली स्वातंत्र्य चळवळ किर्लोस्करवाडीला देखील केव्हाच दाखल झाली होती. १९३० च्या सुमाराला असहकाराच्या चळवळीसाठी गांधीजींना अटक झाल्यानंतर कामगारांनी हरताळ पुकारला आणि त्यादिवशी कारखाना बंद ठेवला. ‘नही रखना नही रखना जालीम सरकार नही रखना’ किंवा ‘चरखा चला चलाके लेंगे स्वराज्य लेंगे’ अशी मनामध्ये देशप्रेम जागवणारी गीतं निनादू लागली. गांधीजींच्या चळवळीत चरखा, खादी आणि स्वकष्टार्जित वस्त्राचं महत्त्व वाढलं. गणेश भास्कर काळे हे अतिशय कल्पक चरखातज्ञ होते. औंधला त्यांचे चरख्यात वेगवेगळे प्रयोग आणि त्याचं उत्पादन सुरू होतं. लक्ष्मणरावांनी १९२७ साली काळ्यांना किर्लोस्करवाडीतच आणलं. शंतनुरावांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेेम होतं. देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं याविषयीही दुमत असण्याचं कारणच नव्हतं. मात्र त्यांची भूमिका काही बाबतीत थोडी तटस्थ होती. स्वदेशीच्या रुजणाऱ्या कल्पनेत यंत्रयुगापासून देश किती काळ मागे जाईल अशी भीती त्यांच्या मनात होती.
खरं पाहता देशी कारखानदारी वाढवून आपण अधिकाधिक यंत्रसज्ज कसं होऊ, प्रगत देशांच्या बरोबरीने कसे उभे राहू याची स्वप्नं ते पाहत होते. किर्लोस्करवाडीची भारतीय यंत्रं दूर देशात पोहोचल्याचा अभिमानसुद्धा उराशी होता. याच सुमाराला अखिल भारतीय स्पिनर्स असोसिएशनने चरखा तयार करण्याची एक स्पर्धा आयोजित केली होती. एका माणसाकडून आठ तासात ४० नंबरचं १५००० यार्ड सूत निघायला हवं. चरख्याची दुरुस्ती सहज आणि खेड्यात सुद्धा होण्यासारखी असावी. त्याची जास्तीत जास्त किंमत अडीचशे असावी, अशा काही अटी चरख्यासाठी देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी देशा-परदेशातील मंडळींनी भाग घेतला होता. परीक्षकांनी सगळे चरखे तपासल्यानंतर फक्त काळे यांनी तयार केलेला चरखा कसोटीला उतरला, पण त्यात काही दुरुस्त्या सुचवून पुन्हा नव्याने तो तयार करायला सांगण्यात आला. मुंबईच्या प्रदर्शनात या चरख्याचं प्रात्यक्षिक सुद्धा झालं. महात्मा गांधींनी समाधान व्यक्त केलं. प्रत्यक्ष गांधीजींनी या चरख्यावर सूत कातलं आणि चरखा आवडल्याचं पत्रातून कळवलं. प्रत्यक्षात मात्र त्या चरख्याला बक्षीस मिळालं नाही. त्यामुळे सगळी मंडळी वर्ध्याला गांधीजींची भेट घेण्यासाठी गेली. भेटीत गांधीजींचं म्हणणं पडलं की, चरख्याचं काम समाधानकारक असलं तरी ते आता एक यंत्रच बनले आहे. अशिक्षित आणि यंत्राशी फारशी मैत्री नसलेला एखादा खेडूत त्याचा वापर करू शकणार नाही आणि त्याच्या दुरुस्तीचंही काम जिथल्या तिथे होणार नाही. या त्यांच्या म्हणण्यावर त्यांना तपशीलवार माहिती दिली गेली, परंतु त्यांच्याजवळ कोणताही युक्तिवाद चालण्याजोगा नाही, हे स्पष्ट दिसल्यानंतर किर्लोस्करांच्या शिष्टमंडळाने तिथून प्रस्थान केलं. शंतनुरावांच्या दृष्टीने वर्ध्याची ही त्यांची भेट म्हणजे राष्ट्रीय चळवळीविषयीच्या त्यांच्या कल्पनेवरचं एक शिक्कामोर्तब होतं.