महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
वेगवेगळ्या उद्योजकीय आघाड्यांवर काम सुरू असतानाच किर्लोस्कर कुटुंबीयांना घोर लागला होता तो राधाबाईंच्या तब्येतीचा. त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने ग्रासलं होतं. त्याच्या जोडीलाच गॉल ब्लॅडरचं ऑपरेशनसुद्धा करावं लागलं होतं. आजारांचं वेळेवर निदान होऊन, नीट औषधोपचार घेतले गेले. काळजी घेतली गेली आणि या सगळ्यातून राधाबाईंना थोडं बरं वाटून त्या थोडंथोडं हिंडायला लागल्या. १९३३ साल उजाडलं होतं. ही दिवाळी कशी साजरी करायची याचं उत्तम नियोजन झालेलं होतं. ठरल्याप्रमाणे दिवाळीत लक्ष्मणराव आणि राधाबाईंनी मिळून लक्ष्मीपूजनही केलं. त्यानंतर गाण्याचा कार्यक्रमही अतिशय मौजेत पार पडला. बालक प्रदर्शन झालं. भाऊबीज उत्साहात पार पडली. दुसऱ्या दिवशी राधाबाई ठरल्यावेळी उठल्या नाहीत. धावपळीमुळे दमून जास्त झोप लागली असेल असं सगळ्यांना वाटलं. मात्र यमुताईंना शंका आली आणि राधाबाईंच्या जवळ गेल्यावर लक्षात आलं की ती चिरनिद्रा ठरली आहे.
अवघ्या ५५ व्या वर्षी राधाबाईंचं निधन झालं. राधाबाईंच्या अकाली मृत्यूमुळे शंतनुरावांच्या मनात आणि जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली. आईवर त्यांचं नितांत प्रेम आणि अपार भक्ती होती. डोक्यावरचा मायेचा हात दूर झाल्यामुळे मनात एक दुःखाची कळ उमटली होती. लक्ष्मणरावांच्या मनावरही हा आघात होता, तरीही त्यांनी मोठ्या धीराने उभं राहायचा प्रयत्न केला. १९३४ सालापर्यंतचा काळ अगदीच मंदीचा होता. १९३४ सालात मंदीची धग थोडी कमी व्हायला लागलेली होती. शंतनुरावांनी व्यवसाय, आर्थिक मंदी आणि भविष्यकालीन योजनांच्या दृष्टीने अमेरिकेचा दौरा करायचं ठरवलं. खरंतर धाकटे भाऊ प्रभाकर ‘इथका’मधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार होते, तर रवींद्र बॉस्टनला एम.आय.टी.मध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेणार होते. स्वतः अमेरिकेत शिकून आल्यामुळे दोन्ही भावंडांच्या वास्तव्याची आणि त्यांची एकंदरीत व्यवस्था पाहण्यासाठी शंतनुरावांनी यमुताईंसह अमेरिकेचा दौरा नक्की केला होता. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अमेरिका आणि युरोपातील अनेक कारखान्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तिथलं राजकारण आपल्यापेक्षा निराळ होतं, तरीदेखील कारखान्याचा विस्तार, आर्थिक संकटांवर करता येणारी मात, नव्या योजना, प्रगतीची दिशा अशा अनेक बाबी पडताळून पाहण्यासाठी हा अमेरिका दौरा एकप्रकारे अभ्यासदौराच ठरला.
अमेरिकेहून परत आल्यावर शंतनुरावांनी आपल्या मनातल्या योजना कागदावर रेखाटल्या. आराखड्याला चालना द्यायला सुरुवात केली. १९३६ मध्ये साधारणपणे तीस हजार चौरस फुटांची एक नवी मोल्डिंग शेड बांधली. त्याच वर्षी किर्लोस्करांच्या ब्रँडचा ‘शिशिर’ हा नवा चरक तयार झाला. २५ अश्वशक्तीच्या या चरकातून दर तासाला सहा हजार पौंड उसाचं गाळप करता येत होतं. याशिवाय शस्त्रक्रियेचं टेबल, पुस्तकांचं शेल्फ, एस् आकाराच्या खुर्च्याही तयार होऊ लागल्या.
उद्योजक तेव्हाच प्रगती साधू शकतो जेव्हा तो व्यवसायवृद्धीसाठी स्वतःच संधी निर्माण करतो किंवा त्याच्या तीक्ष्ण नजरेला विकासाची संधी सापडते. परदेशी मालाची आयात बंद झाली. त्याच दरम्यान संयुक्त प्रांत सरकारला दोन उसाच्या चरकांच्या आवश्यकता होती. महाराष्ट्रात जसा गूळ तयार होतो तसाच त्या प्रांतातही व्हायला हवा म्हणून ही योजना होती. शंतनुरावांनी उत्पादन खर्च जास्तीत जास्त किती कमी करता येईल आणि तरीही दर्जा मात्र तसूभरही हलणार नाही अशा तऱ्हेने निर्मितीचं हे आव्हान पेललं. उद्योजकाच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलेली सामग्री तशीच राहिली तर मोठं नुकसान अंगावर येईल अशी भीती होती. पण तरीही नेटाने आणि आत्मविश्वासाने ‘मास प्रॉडक्शन’ची पद्धत पहिल्यांदाच शंतनुरावांना अंमलात आणावी लागली. ठरलेल्या वेळी ही सरकारची ऑर्डर पूर्ण केली गेली.
याच अनुभवाच्या जोरावर नंतर दोन वेळा पंचवीस हजार हँड पंप पुरवण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं. अशा तऱ्हेची मोठी कामं स्वीकारण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी शंतनुरावांनी अजून एक विकास योजना आखली. व्यवसाय वाढत असताना सर्व बारीकसारीक कामांत स्वतःला गुंतवून ठेवणं शक्य नाही हे जाणून नवनवीन जबाबदाऱ्यांसाठी योग्य ती लायक माणसं निवडणं आवश्यक होतं. शंतनुरावांना अनेक वर्षे साथ देणारे कीर्तने यांचा कंपनीमध्ये याच काळात प्रवेश झाला. हरळीकर, कुलकर्णी अशी मोजकीच माणसं पदवीधर होती. बेंगलोर महाजनी आणि गुर्जर हे दोघे वर्ग बंधू, आणखी एक विश्वासू सहकारी पी. डी. दीक्षित हे १९३८ सालात कारखान्यात दाखल झाले. मंगेशराव रेगे यांनी हिशोबाची घडी अतिशय उत्तम बसवलेली होती. कितीतरी विश्वासू माणसं शंतनुरावांनी जोडून ठेवली होती. काही काळानंतर तांत्रिक शिक्षण झालेली माणसे नेमायलाही शंतनुरावांनी सुरुवात केली. कचेरीत काम करणाऱ्या माणसाला कारखान्यातल्या गोष्टी कशा आणि कोणत्या क्रमाने चालतात हे माहीत असायला हवं, असा शंतनुरावांचा आग्रह असायचा. किर्लोस्कर कारखान्यामध्ये तयार होणारी यंत्रं अधिकाधिक दर्जेदार व्हावीत त्याकरता प्रयोगांचा सिलसिला मात्र अखंड सुरू असे. या सततच्या काळानुरूप होणाऱ्या बदलांकडे शंतनुराव जातीने लक्ष देत असत. तासनतास ड्रॉइंगच्या ऑफिसमध्ये, यंत्रांच्या रेखाटनांमध्ये ते बुडालेले असत. या सगळ्या व्यापाबरोबरच क्वार्टर्सचं नूतनीकरण, सुखसोयीने युक्त अशी जागा याकडेही त्यांचं लक्ष होतं. अनेकानेक कारणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळी किर्लोस्करवाडीला भेट देत होती. काळ बदलाचा होता. संघर्षाचा होता. कॉंग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेनंतर एस. एम. जोशी यांनी ह. रा. महाजनींबरोबर व्याख्यानाच्या निमित्ताने किर्लोस्करवाडीला भेट दिली. भाषणातून त्यांनी संघटित कामगार वर्ग हा स्वातंत्र्यप्राप्तीचं साधन होऊ शकतो याविषयी सांगितलं. आसपासच्या ग्रामीण भागातल्या लोकांना राजकारणाचे नवे विचारप्रवाह सोप्या भाषेत सांगणारी एक व्यक्ती म्हणजे नाना पाटील. अधूनमधून ते वाडीला येत असत. त्यांच्या भाषणालासुद्धा अलोट गर्दी असे.