महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
१९२६ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी घेऊन आणि लष्करी शिक्षण पूर्ण करून शंतनुराव मायदेशी परतले. त्यापूर्वी ते जर्मनीला जाऊन आले. शंतनुरावांनी आल्यानंतर धावत जाऊन आपल्या आईला मिठी मारली. आईच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. आपल्या मुलाची स्वप्नं, शिक्षणाची आस त्यांना ठाऊक होती. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने आपल्या मुलाचं तेजस्वी रूप त्या पाहत होत्या. सर्व स्नेही, मित्रमंडळी शंतनुरावांच्या स्वागतासाठी किर्लोस्करवाडीला स्टेशनवर पोहोचले होते. उच्चविद्याविभूषित होऊन शंतनुराव नव्या उमेदीने आणि ऊर्जेचा झरा घेऊन आपल्या माणसात परतले होते.
वुलनचा खाकी रंगाचा सैनिकी पोशाख घालून शंतनुराव वाडीला उतरले आणि अतिशय दिमाखदार मिरवणुकीतून त्यांना कारखान्यामध्ये नेण्यात आलं. शंतनुरावांसाठी कारखान्यात एक समारंभ आयोजित केला होता. आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये येऊन शंतनुरावांनासुद्धा मनोमन आनंद झाला. घरी थोडा काळ स्थिरस्थावर झाल्यानंतर, पुढे काय हा विचार मनात घेऊन शंतनुराव आणि त्यांचे वडील यांच्यात बरीच चर्चा झाली. एकदा वाटत होतं की, शंतनुरावांनी पुन्हा एकदा अमेरिकेत जाऊन पुढचं पदव्युत्तर शिक्षण संपादन करून यावं पण, दुसऱ्या बाजूला कारखान्याचं काम वाढवणं, अधिकाधिक बळकट करणं देखील तेवढंच आवश्यक होतं. सारासार विचार करून शेवटी एकमताने असं ठरलं की इथेच राहून शंतनुरावांनी कारखान्याचं काम पाहायला हवं. लक्ष्मणरावांनी कारखान्याच्या वाढदिवसाच्या दिवशी होणाऱ्या वार्षिक सभेत बोलताना ठरवलेल्या काही गोष्टी सर्वांना सांगितल्या. शंतनुरावांनी कारखान्याच्या प्रगतीकडे, वाटचालीकडे, उत्पादनाकडे लक्ष द्यावं आणि मी आता माझ्या संशोधन कार्याकडे पुन्हा एकदा वळावं अशी मनीषा व्यक्त केली.
शिक्षणानंतर शंतनुराव नव्या जोमाने, उत्साहाने कारखान्याचे काम पाहू लागले. आता अगदी ओघानेच त्यांच्या लग्नासंबंधी विचारणा होऊ लागली. पुण्यातील त्यांच्याच बहिणीच्या वर्गात शिकणाऱ्या फाटकांच्या मुलीचं स्थळ सांगून आलं. खरं पाहता आपला जोडीदार निवडताना शंतनुरावांची काही स्वतंत्र - आधुनिक मतं होती. आपल्याकडे लग्न ठरवायची रीत म्हणजे घरच्या मोठ्या मंडळींनी स्थळं बघून पारंपरिक तऱ्हेने लग्न जमवून टाकायचं. यामध्ये मुला-मुलीच्या जोडीदाराच्या अपेक्षा, एकमेकांच्या विचारांची, स्वप्नांची सांगड घातली जाते की नाही याला महत्त्व दिलं जात नाही. शंतनुरावांनी मात्र किमान आवडीनिवडी, कल, शिक्षण, स्वभाव जाणून घ्यायला हवा यासाठी हैद्राबादला आपल्या चुलत बहिणीला - शरयूला पत्र पाठवून यमुताई फाटक यांची चौकशी केली. त्यांचे आणि आपले सूर जुळतील की नाही याची खातरजमा होताच या विवाहावर शिक्कामोर्तब झालं. एकमेकांच्या पसंतीने, परस्परांना दोन्ही स्थळ रुचल्यानंतर हे लग्न ठरलं. नव्या सूनबाई लक्ष्मणरावांच्या पसंतीला उतरल्या होत्या. हसतमुख, धीट, मिळून मिसळून वागणाऱ्या, इंटरला इंग्रजी विषय घेतलेल्या, गाण्याची गोडी आणि गती असलेल्या, आनंदी स्वभावाच्या यमुताई सगळ्यांना आवडतील अशाच होत्या. यमुताई फाटक आणि शंतनुराव किर्लोस्कर यांचा विवाह राजेसाहेबांच्या संमतीने नक्की झाला. त्या दरम्यान राजेसाहेब महाबळेश्वर मुक्कामी होते. फाटक आणि किर्लोस्कर मंडळींनी श्रीमंतांची तेथे गाठभेट घेऊन या सोयरिकीबाबत चर्चा केली आणि तिथेच म्हणजे महाबळेश्वरला साखरपुडा झाला आणि मुहूर्त सुद्धा निश्चित झाला तो ११ जून १९२७ रोजी!
शंतनुरावांचं लग्न हे किर्लोस्करांच्या पुढच्या पिढीतलं पहिलंच मोठं कार्य होतं. लग्न अगदी महिन्याभरावर आलं होतं. ठिकठिकाणाहून पाहुणेमंडळी, मित्रमंडळी, सगळी किर्लोस्कर नातेवाईक मंडळी असा सगळा गणगोत आणि सोयऱ्यांचा गोतावळा जमणार होता. किर्लोस्करवाडीत असं एखादं कार्य ठरलं की, त्याची लगबग आणि तयारी शिस्तबद्ध पद्धतीने होत असे. त्याच प्रथेप्रमाणे शंतनुरावांच्या लग्नासाठी सुद्धा चक्क एक समिती नेमण्यात आली. या लग्नासाठी ‘अंतरपाट’ नावाचं एक मजेदार आणि खेळकर असं पत्रकही काढण्यात आलं होतं. किर्लोस्कर कुटुंबीयांच्या कुलदेवीला म्हणजे विजयादुर्गेला आवाहन करून, घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या सहीनिशी निमंत्रण पत्रिका सुद्धा तयार केल्या. घरातल्या स्त्रिया लग्नसराईमुळे स्वयंपाकघरातच स्वयंपाक रांधण्यामध्ये व्यापून जाऊ नयेत म्हणून चांगले स्वयंपाकी नेमण्यात आले. हा सुद्धा एक नवाच पायंडा शंतनुरावांच्या लग्नामध्ये पडला. थाटामाटात, कोडकौतुकात आणि अतिशय जिव्हाळ्याने विवाहसोहळा रंगला होता. घरी अन् रस्त्यावर घातलेले मांडव, रांगोळ्या, हास्यविनोद, कामांची लगबग, केळवणं, पंक्ती, रुचकर गोडाधोडाचा साग्रसंगीत भोजनप्रपंच, घास देणे-घेणे, उखाणे, सुग्रास भोजनाचा आग्रह अशा अनेक बाजूंनी शंतनुरावांचं लग्न किर्लोस्करांच्या चिरस्मरणात राहिलं. या कार्याच्या निमित्ताने वाडीला बहुतेक सगळी किर्लोस्कर मंडळी जमली होती. बऱ्याचदा घाईगडबडीत म्हणा किंवा वेळेअभावी म्हणा, सगळ्या किर्लोस्करांच्या भेटीगाठी, जुन्या-नव्या पिढीचा परस्परांशी असलेला परिचय राहून जायचा. पण या लग्नाच्या वेळी मात्र एखाद्या कुळाचं संमेलन असावं असंच रूप किर्लोस्करवाडीला लाभलं आणि शब्दशः रियासतकार सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल चार तास किर्लोस्कर कुळाचं संमेलन जुन्या आठवणी, किस्से, हकीकती, नात्यागोत्याचा परिचय-ओळखी अशा धामधुमीत रंगलं.
या सोहळ्यातली आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ‘मनोरंजन महाल’! बाबुराव पेंटर यांनी ‘नेताजी’ हा सिनेमा लग्नासाठी आलेल्या मंडळींना याच मनोरंजन महालात दाखवला. एवढंच नाही तर या लग्न सोहळ्याच्या निरनिराळ्या क्षणांचे चित्रीकरण करून शंतनुरावांच्या लग्नाचा एक छोटासा चित्रपटही तयार केला. याच मनोरंजन महालात दुसऱ्या दिवशी नांदिवडेकरांच्या हुबेहूब नकलांनी पाहुणे मंडळींची मनं जिंकली, तर त्याच्या पुढच्या दिवशी मास्टर कृष्णरावांच्या दैवी गाण्याने सोहळ्याची रंगत वाढली. खरं पाहता लक्ष्मणरावांना मुख्य लग्न समारंभाखेरीज इतर गोष्टींत मोलाचा वेळ खर्ची घालणं पटत नसलं तरी सर्वांच्या उदंड उत्साहापुढे आणि आनंदापुढे त्यांचं काही चाललं नाही. त्या गडबडीतही लक्ष्मणराव थोडा वेळ काढून मुंबईहून आणलेल्या नव्या जर्मन इंजिनाची तपासणी करायला जात असत. एका मुरलेल्या उद्योगप्रेमी माणसाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसे. हाच वसा आणि वारसा शंतनुरावांकडे सुद्धा प्रवाहित झालेला होता.
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, शंतनुरावांसाठी एक नवीन पर्व सुरू होणार होतं. बालपण, तरुणपण आणि उमेदीच्या काळात औंध-किर्लोस्करवाडी-पुणे आणि त्यानंतर शिक्षणासाठी केलेली परदेश वारी असं अनुभवाचं, संस्कारांचं, दूरदृष्टीचं आणि नव्या कल्पनांचं संचित जमा झालं होतं. त्याच बळावर नव्या स्वप्नांची-ध्येयांची झेप त्यांना घ्यायची होती. शंतनुरावांपाशी व्यवसायाचं बाळकडू होतं. नव्या यंत्रयुगाचं अद्ययावत शिक्षण होतं. वडीलधाऱ्यांचा विश्वास आणि यमुताईंची साथ होती. इथून पुढे किर्लोस्कर उद्योगाच्या नव्या पिढीचा, नव्या युगाचा आरंभ होणार होता.