महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
‘किर्लोस्कर बंधूं’च्या कारखान्यात नांगर तयार होते. अगदी पहिल्यांदाच एक नवं तंत्र, नवं यंत्र इथल्या मातीत सिद्ध झालं होतं. आता समोर उभं होतं, फार महत्त्वाचं वळण - हे अपारंपरिक नांगर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणं. पण इथेही यश सहजासहजी मिळण्याची चिन्हं दिसत नव्हती. नांगर तयार होते, पण त्यापैकी एकही नांगर कारखान्यातून हलेना. झालं काय, इथल्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या पूर्वजांनी असले नांगर कधी बघितलेच नव्हते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाला अनेक प्रश्न, संशय, भीती यांनी ग्रासलं होतं. लोखंडी फाळामुळे जमिनीत विष पसरेल, जनावरांचे प्राण जातील असे गैरसमज शेतकऱ्यांची पाठ सोडत नव्हते, त्यामुळे कारखान्यातून एकही नांगर हलत नव्हता. ‘माल तयार आहे, पण मागणी नाही,’ या कठीण अवस्थेत दोन वर्षे गेली. आधीचे पैसे मागणी नसलेल्या उत्पादनात अडकलेले, वर टिकून राहण्यासाठी आणखी भांडवलाची गरज अशी स्थिती निर्माण झाली. उत्पादकांसाठी असा काळ झेलणं ही मोठी कठोर, कठीण परीक्षा असते. किर्लोस्कर बंधूंनी धैर्याने हा काळ झेलला.
लक्ष्मणरावांना तयार लोखंडी नांगर धूळ खात पडून असल्याची खंत सतावत होती. आपली धडपड, कष्ट, पैसा वाया जाणार की काय अशी चिंता वाटत होती. तरीही त्यांनी नांगराविषयी असलेला विश्वास ढळू दिला नव्हता, ते आशावाद धरून होते. अखेर एके दिवशी लक्ष्मणरावांची प्रतीक्षा फळाला आली. मिरजेकडचे जोशी नावाचे सुशिक्षित जमीनदार नांगराच्या चौकशीसाठी कारखान्यात आले आणि नांगर त्यांच्या पसंतीला उतरले. त्यांनी सहाही नांगर विकत घेत, नांगराना लागलेलं ग्रहण संपुष्टात आणलं. लक्ष्मणरावांनी हे नांगर दोन वर्षे पडून असल्याची माहिती सच्चेपणाने जोशींच्या कानावर घातली. जोशींनी तरीही ते नांगर विकत घेतले आणि नांगर वापरून पाहिल्यावर त्यांच्या दर्जाविषयी आपलं मत देण्याचं आश्वासनही लक्ष्मणरावांना दिलं. ‘तुमचे लोखंडी नांगर जर चांगले असतील, तर ते वापरण्याची शिफारस मी अनेक शेतकऱ्यांना करेन,’ असा शब्दही त्यांनी दिला. या नंतर अडलेला प्रवाह सुरू झाला, पलूसमध्ये राहणाऱ्या पांडू पाटील यांनी चक्क ३५ नांगरांची मागणी नोंदवली.
पहिले सहा नांगर उचलणाऱ्या जोशींनी नांगर वापरून पाहून, ठरल्याप्रमाणे आपलं मत किर्लोस्करांना कळवलं. त्यांचं म्हणणं होतं, ‘तुमचे नांगर सर्वार्थाने उत्तम आहेत. परंतु ब्रिटिश बनावटीच्या ना़गरांच्या फाळाच्या तुलनेत किर्लोस्करांच्या नांगरांचे फाळाची टोकं लवकर झिजत आहेत.’ लक्ष्मणरावांनी हे स्वतः तपासायचं ठरवलं. त्यांनी ब्रिटिश बनावटीचे दोन फाळ मागवले. ते ऐरणीवर ठेवून त्याचे तुकडे केले आणि त्या फाळांची टोकं बारकाईने चिकित्सापूर्वक निरखली. लक्ष्मणरावांना जोशींच्या सांगण्यात तथ्य आहे हे लक्षात आलं. मग त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून ‘फाऊंड्री’ मासिकाचे गठ्ठे चाळून काढले. फाळांची टोकं अणकुचीदार, टिकावू होण्यासाठी थंड करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते हे त्यांना दिसून आलं. हे कळल्यावर लक्ष्मणरावांनी आपल्याकडच्या फाळांच्या टोकांवर ती प्रकिया करून, ते फाळ जोशींकडे पाठवले. हे फाळ वापरून, ‘नवीन फाळ ब्रिटिशांच्या फाळांच्या तोडीस तोड असल्याची’ पावती जोशींनी लक्ष्मणरावांना दिली.
जोशींनी त्यांचा दुसरा शब्दही खरा केला. त्यांनी त्यांच्या शेतकरी मित्रांमध्ये या लोखंडी फाळांची जोरदार शिफारस केली. त्या शिफारसीमुळे पुढच्या दोन वर्षात लक्ष्मणरावांनी चारशे नांगर विकले. शेतकी खात्यानेही ‘फाळ लवकर झिजतात’ म्हणून शिफारस करता येत नाही असा शेरा मारला होता. ही त्रुटी संपुष्टात आल्यावर खात्यालाही ‘किर्लोस्कर नांगरां’ची शिफारस करावी लागली. कालांतराने या नांगरांचा देशभर प्रसार झाला आणि एक कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
नांगरांची मागणी जवळपास दहापट वाढली. कारखान्याची जागा वाढवावी लागली. कामगारांची संख्या तीस-चाळीसपर्यंत गेली. नांगराला मागणी असण्याचा वर्षातला मर्यादित काळ लक्षात घेता, लक्ष्मणरावांनी इतर वेळी कारखान्यात आंबोळ्यांचे बिडाचे तवे तयार करायचे असं ठरवलं. बिडाच्या तव्यांची जाहिरात करण्यात आली. उत्तम प्रतिसाद मिळून हे तवे कमालीचे लोकप्रिय झाले. आता कारखान्याची अधिकाधिक वाढ कशा प्रकारे करायची यावर लक्ष्मणराव आणि रामूअण्णांचा बारकाईने विचार सुरू झाला होता. गरज हेरून केलेला योग्य विचार, तांत्रिक कौशल्य, गुंतवणुकीसठी आवश्यक धाडस या सर्व गोष्टी किर्लोस्कर बंधूंजवळ असल्या तरी अनेक वेळा कसून परीक्षा बघणारी अडचणीची स्थिती समोर येऊन उभी राही आणि किर्लोस्करांना आपली ताकद, वेळ तेथे पणाला लावावी लागे.
या वेळीही असंच घडलं. आपला उद्योग टिकण्यासाठी कारखान्याची वाढ करण्याची गरज होती. नांगर आणि तव्यांना मागणी असली तरी कारखान्याच्या नित्याच्या आर्थिक गरजा भागवून, उत्पादनं वाढवण्यासाठी आवश्यक ते खेळतं भांडवल लक्ष्मणरावांपाशी नव्हतं. त्यांना दहा हजार रुपयांची निकड भासू लागली. शहापूर, बेळगावमधले सावकार तारणाशिवाय कर्ज देईनात. सरकारी मदत मिळाल्यास पाहावी म्हणून त्यासाठीही अर्ज केला. तेव्हाचे बेळगावचे कलेक्टर ब्रेंडन यांनी किर्लोस्कर यांच्यावर असलेल्या लोभामुळे अर्जासोबत शिफारसही केली. पण देशी उद्योगांना उत्तेजन द्यायचं नाही या छुप्या धोरणामुळे अर्ज मंजूर करण्यात आला नाही. हे कारण रामूअण्णांनी पुढे खनपटीला बसून पत्रव्यवहार पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. ‘बॉम्बे बॅंकिंग कॉर्पोरेशन’च्या बेळगाव शाखेकडून कर्ज मिळवण्याचाही प्रयत्न करून झाला. ‘पुरेसं तारण नाही’ या कारणानं हा प्रयत्नही असफल झाला. किर्लोस्करांना बँकेने कर्ज नाकारलं ही बातमी बेळगावात उच्चभ्रू वर्गात चर्चेची झाली. सावकार, सरकार आणि बँकेनेही अर्थसाहाय्य नाकारल्यामुळे ‘आता आपल्याला कुणीच कर्ज देणार नाही’ अशी लक्ष्मणरावांची पक्की धारणा होऊन बसली.
आपण कल्पना करतो त्याहूनही वेगळ्या, अगदी अकल्पित गोष्टी कशा घडून येतात याचं हृद्य प्रत्यंतर काहीच दिवसांनी लक्ष्मणरावांना आलं. एक दिवस एक सद्गृहस्थ अनपेक्षितपणे कारखान्यात आले. लक्ष्मणरावांसमोर उभं राहून ते म्हणाले, “तुम्हाला पैशांची नड आहे असं ऐकतोय. मी रोज तुमचा उद्योग पाहात असतो. तेव्हा तुम्हाला देण्याकरिता मी दोन हजार रुपये आणले आहेत. तुमचा प्रामाणिकपणा आणि कष्ट हे माझ्यासाठी तारण आहेत. कृपया, हे पैसे स्वीकारा आणि सवडीने परत करा.” या सह्रदय दात्याचं नाव होतं, राजाभाऊ गिंडे. या मदतीने लक्ष्मणरावांना मोठा दिलासा मिळाला. आर्थिक कोंडीतून काहीशी सुटका झाली. नंतरच्या काळातही जेव्हा जेव्हा त्यांना पैशांची गरज भासली, तेव्हा तेव्हा राजाभाऊ गिंडे त्वरेने मदतीसाठी धावून आले.
१९०७ साल आलं ते भलतंच संकट घेऊन. सरकारने बेळगावाच्या वाढीसाठी कारखाना असलेली ठळकवाडीची आणि भोवतालची जागा विकत घेऊन, बेळगाव म्युनिसिपाल्टीच्या ताब्यात दिली. किर्लोस्करांना ‘जागा खाली करण्या’साठीची नोटीस शहरवाढीच्या कमिटीकडून पाठवण्यात आली. हा व्यवसायावर फारच मोठा आघात होता. मुदत होती फक्त सहा महिने. ब्रेंडन यांच्या मध्यस्थीने ही मुदत आणखी दीड वर्ष वाढवून मिळाली. या दोन वर्षांत कारखाना हलवण्यासाठी तगादा सुरूच होता. आर्थिक अडचणी, कारखान्यासाठी दुसरी जागा जवळपास नाही अशा विचित्र दुहेरी अडचणीत किर्लोस्कर बंधू सापडले होते. यावेळी लक्ष्मणराव चाळिशीचे होते आणि रामूअण्णांची पन्नाशी उलटून गेली होती. इतक्या वर्षांची शब्दशः खडतर असलेली वाटचाल, अवघड तप:श्चर्या मातीमोल होऊ घातली होती.
समोर नक्की कुठलाच रस्ता नीट दिसत नाहीये अशा काळात, १९०८ साली लोकमान्य टिळक बेळगावात आले होते. त्यांनी वेळ काढून ठळकवाडीत किर्लोस्करांच्या कारखान्याला भेट दिली. ठळकवाडीतल्या त्या लहानशा कारखान्यात लोकमान्य अर्धा तास थांबले, उद्योगातील अडचणींबाबत लक्ष्मणरावांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान लक्ष्मणरावांनी त्यांना ‘सरकारकडून येणाऱ्या अडथळ्यांविषयी’ सांगितलं. त्यावर गंभीर होत लोकमान्य म्हणाले, ‘किर्लोस्कर, तुम्ही करीत आहात ते एक मोठे राष्ट्रकार्य आहे. उद्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालं तरी उद्योगधंद्यांच्या वाढीशिवाय तरणोपाय नाही. तेव्हा कुठल्याही संकटाला न जुमानता पुढील काळावर नजर ठेवून आपलं काम तुम्ही नेटाने चालवा. योग्य वेळी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ लोकमान्यांच्या या भेटीमुळे, शब्दांमुळे लक्ष्मणरावांना बळ मिळालं.
मानसिक बळ मिळालं तरी प्रत्यक्ष लढाई लढणं बाकी होतंच. कारखाना जमीनदोस्त होणार होता. यंत्रसामग्री, कार्यालय, मनुष्यबळ सारं काही दुसरीकडे हलवावं लागणार होतं. त्या ब्रिटिश राजवटीत नुकसान भरपाईची काहीच तरतूद कायद्यात नव्हती. नवीन जमीन, कारखान्याची नव्याने उभारणी यासाठी किर्लोस्करांकडे भांडवलाची व्यवस्था नव्हती. फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून पुन्हा झेप घ्यायची होती... शून्य झालेल्या वास्तवातून नवं विश्व उभं करायचं होतं. लक्ष्मणरावांनी कलेक्टर ब्रँंडन यांची भेट घेऊन ‘नवीन इमारत आणि निधी संदर्भात काही मदत होईल का?’ ही चाचपणी केली. किर्लोस्करांविषयीच्या आदर, आस्थेमुळे ब्रँंडन यांनी कायद्यातली एक पळवाट पकडून नगरपालिकेला तीन हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यायला लावले. ही रक्कम फार म्हणजे फारच थोडी होती, पण बुडत्याला काडीचा आधार अशी ती निकराची वेळ होती.