महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
किर्लोस्कर घराणं हे मूळचं गोव्यातील कोने या गावचं. गावावरून या कुटुंबाला मिळालेलं मूळ आडनाव होतं कोनकर. फार पूर्वीच्या काळी म्हणजे १७ व्या शतकापर्यंत हे कुटुंब गोव्यात वास्तव्याला होतं. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १९६१ साली घराण्यातल्या कर्तबगार, व्यवहारकुशल असलेल्या कृष्णंभट्ट कोनकर यांना सावंतवाडी संस्थानाकडून मालवण तालुक्यातल्या किर्लोसी या गावाची महाजन, गावकर आणि कुलकर्णी अशी सनद देण्यात आली. तेव्हापासून कुटुंबाचं कोनकर आडनाव बाजूला राहून ‘किर्लोस्कर’ हे नवीन आडनाव रूढ झालं. ही सनद १८८२ सालापर्यंत सुरू होती, त्यानंतर इंग्रज सरकारने ती रद्द केली.
किर्लोस्कर कुटुंबाचं नातं कर्नाटकाशी जुळलं ते शंतनुरावांचे पणजोबा वासुदेवपंत किर्लोस्कर आणि आद्य संगीतनाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आजोबा रंगोपंतदादा किर्लोस्कर हे किर्लोसी सोडून कर्नाटकमध्ये गुर्लहोसूर इथे आले तेव्हा. रंगोपंतदादा श्रीमंत होते आणि वासुदेवपंत गरीब. रंगोपंतदादा कर्नाटकात आले तेव्हा बेताच्या आर्थिक परिस्थितीत असलेले वासुदेवपंत त्यांचे कारकून म्हणून तीन रुपये पगारावर त्यांच्याबरोबर गुर्लहोसूर इथे आले. पुढे वासुदेवपतांनी स्वतंत्र संसार थाटला आणि रंगोपंतदादा यांच्या वाड्याजवळ लहानसं घर विकत घेतलं. काशीनाथपंत, गोपाळपंत, कृष्णाजीपंत आणि तुळसाबाई ही वासुदेवपंतांची अपत्यं. वासुदेवपंत यांचे ज्येष्ठ पुत्र काशीनाथ हे शंतनुरावांचे आजोबा. ते जमीनमोजणीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, काही काळ मोजणीखात्याच्या सरकारी नोकरीत होते. ही नोकरी गुजरातपासून म्हैसूरपर्यंत फिरतीची होती. ते नोकरीसाठी गुजरातमध्ये असताना वासुदेवपंत आजारी पडले, त्यांचं दुखणं वाढतच चाललं आणि काशीनाथपंतांना नोकरी सोडून गुर्लहोसूर इथे परत यावं लागलं. यानंतर काशीनाथपंतांनी म्हैसूर इथल्या मोजणीखात्यात नोकरी पत्करली. फिरतीमुळे तीही नोकरी झेपत नाही अशी परिस्थिती झाली आणि शेवटी त्यांनी धारवाड इथल्या व्यापारोत्तेजक कंपनीमध्ये दरमहा बारा रुपये पगारावर कारकुनी करण्याचं काम स्वीकारलं. अन्नपूर्णा या त्यांच्या पत्नी नरगुंद इथल्या आठल्ये घराण्यातल्या. या दांपत्याला पाच अपत्यं झाली. थोरली मुलगी बटुआक्का, रामचंद्र, वासुदेव, लक्ष्मण आणि सर्वांत धाकटी बहीण दुर्गा उर्फ टुकी. काशीनाथपंतांना पत्नीची साथ फार काळ लाभली नाही. लक्ष्मणराव केवळ तीन वर्षांचे असतानाच अन्नपूर्णाबाईंचं निधन झालं. मुलांचा स्वयंपाक, कपडे, शाळा, आजारपणं अशा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत काशीनाथपंत नोकरीही सांभाळत होते. केवळ १२ रुपयांसाठी ते घरचं सगळं करून दिवसातले १० तास रोज नोकरीसाठी देत होते.
रामूअण्णांचा जन्म २७ ऑगस्ट १८५७ चा. १८७८ साली ते मॅट्रिक झाले. त्यांना पुढे मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकण्याची इच्छा होती, पण परिस्थितीअभावी शिक्षणाची आस सोडून त्यांना नोकरी शोधावी लागली. वडिलांनी त्यांना सांगितलं होतं, “कसे तरी करून मॅट्रिक होईपर्यंत मी तुला सांभाळले. आता यापुढे तू नोकरी कर आणि मला, तुझ्या बायकोला, वासूला, लखूला व पोरक्या गंगाधरला सांभाळ.” काशीनाथपंतांवर आपल्या पाच अपत्यांच्या जोडीनं त्यांच्या भावाच्या (कृष्णाजीपंतांच्या) दोन मुलांची गंगाधरराव आणि त्यांची बहीण चंद्राची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत रामूअण्णांना नोकरी शोधावी लागली. कलादगी इथे अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून त्यांना पहिली नोकरी मिळाली. पगार होता रुपये २५. पुढे बेळगावच्या अँग्लो व्हर्नाकुलर स्कूलमध्ये पहिल्या असिस्टंटच्या जागेवर, तीस रुपये पगारावर त्यांना बढती मिळाली. १८८२ साली ते बेळगावात दाखल झाले. तिथे त्यांचं उत्तम बस्तान बसलं आणि मग नात्यातली अनेक मुलं त्यांच्याकडे शिकण्यासाठी राहायला लागली.
त्यानंतर काही वर्षांनी वासुदेवराव एल.एम.अँड एस. परीक्षा पास झाले आणि त्यांनी सोलापूर इथे आपला दवाखाना सुरू केला. ते साल होतं, १८९०. आता काशीनाथपंत सोलापुरात मुलाकडे राहायला गेले. गंगाधररावही वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून हैदराबादमध्ये स्थायिक झाले. मुलांचा उत्कर्ष होत होता, पण तो पाहण्याचं, स्वास्थ्य घेण्याचं भाग्य काशीनाथपंतांना फार काळ लाभलं नाही. दोनच वर्षांत न्यूमोनियाचं निमित्त होऊन ते स्वर्गवासी झाले. रामूअण्णा हे भावंडांत ज्येष्ठ. त्यांनी आपल्या लहान भावंडांवर पितृवत प्रेम केलं. त्यांची जबाबदारी घेतली, वेळोवेळी भावंडांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लहान भावंडांना आईची उणीव भासू नये याची काळजी या मोठ्या भावानं आणि पित्यानं पुरेपूर घेतली. प्रेमाबरोबरच शिस्त, शिक्षण, जबाबदारी आणि कर्तव्यपूर्ण वर्तनाचे, संस्कारांचे उत्तम धडे या सर्वच मुलांनी नित्यनेमाने गिरवलेले होते. वासुदेव, लक्ष्मण आणि गंगाधर यांच्या शिक्षणासाठी रामूअण्णा आणि त्यांच्या वडिलांनी अपरंपार कष्ट तर केलेच, पण एक हजार सहाशे रुपये कर्जही काढलं होतं. रामूअण्णांनी आपलं वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न मागे ठेवलं, पण भावंडांच्या इच्छा जीवापाड मेहनतीने पूर्ण केल्या. या भावंडांनीही शिक्षणात यश मिळवलं, कार्यक्षेत्रात घट्ट पाय रोवले, कर्ज चुकतं केलं आणि रामूअण्णांनाही वेळोवेळी मदत केली.
नव्याची आस, समाजाने नवं ते आपलंसं करण्याची गरज ओळखणारी बुद्धिजन्य दृष्टी, यंत्र-तंत्राचा उपयोग करून निर्माण होत असलेल्या नव्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याची धडपड हा किर्लोस्कर मंडळींचा मोठा गुण होता. याची खूण रामभाऊंच्या शिक्षणाच्या काळातच प्रगट झाली. ते सहाव्या इयत्तेत होते तेव्हा त्यांनी धारवाडच्या युरोपियन क्लबच्या मैदानावर एक अचंबित करणारं दृश्य पाहिलं. तिथे ब्रिटिश साहेब लोक पूर्वी कधीच न पाहिलेल्या एका दुचाकी वाहनावर बसायला शिकत होती. त्या दुचाकीला एक चार-साडेचार फूट उंचीचं चाक होतं आणि त्या मागे साधारण वीतभर उंचीचं आणखी एक चाक होतं. मोठ्या चाकाच्या कण्याला दोन पॅडल बसवलेली होती. या दुचाकीला चेन नव्हती. अशी दुचाकी आपल्यालाही चालवता आली पाहिजे, आपल्यालाही त्यावर बसायला शिकलं पाहिजे अशी तीव्र इच्छा तेव्हा रामूअण्णांच्या मनात उत्पन्न झाली. त्या दुचाकीचं नाव होतं, व्हेलासिपिड.
रामूअण्णांनी ही आस जपून ठेवली. ते जेव्हा धारवाडहून बेळगावला आले, तेव्हा तिथे राहणाऱ्या रामकृष्णपंत हेर्लेकर यांची ओबडधोबड बायसिकल ते चालवायला शिकले. ही कथा इथेच संपती तर ते सर्वसामान्य ठरले असते, पण वेगळेपणा, अधिकचं एक पाऊल उचलणं हा किर्लोस्करांचा पिंड होता. रामूअण्णांनी बायसिकलविषयी उत्पन्न झालेल्या उत्सुकतेमुळे इंग्लंड आणि अमेरिकेतून सायकलचे कॅटलॉग आणि सायकलिंगची मासिकं मागवायला सुरुवात केली. ही केवळ उत्सुकता नव्हती, तर आपल्याला नवीन काय करता येईल, याचा तो शोध होता. मग एके दिवशी हेर्लेकर यांना रामूअण्णांनी सुचवलं की त्यांनी एक एक कुशन टायरची सायकल विकत घ्यावी. हेर्लेकरांनी रामूअण्णांचा सल्ला मानला आणि एक सायकल विकत घेतली. रामूअण्णांच्या शाळेचे हेडमास्तर हुग्वर्फ यांना ही बातमी समजली आणि त्यांना या गोष्टीचा अतिशय आनंद झाला. रामूअण्णांची सजगता बघून ते त्यांना म्हणाले, “मिस्टर किर्लोस्कर, आता लवकरच सायकलचं युग सुरू होणार असं दिसतं आहे. तेव्हा आता तुम्हीच एक सेकंडहँड सायकल मागवून घ्या आणि सरकारी नोकरांना, लष्करातल्या अधिकाऱ्यांना सायकलवर बसायला शिकवू लागा. तुमच्यासाठी हा एक चांगला जोडधंदा होईल.” ही एक सुरुवात होती; त्याला धाकटेबंधू लक्ष्मणराव यांच्या ‘संधी हेरणाऱ्या नजरे’ची, उत्साहाची, कल्पकतेची जोड मिळाली आणि बेळगावात रामूअण्णांची ‘सायकल विक्री’ तसंच सायकल चालवायला शिकवणं या उद्योगांची सुरुवात झाली.
किर्लोस्कर घराण्याचा प्रवास हा जसा उद्योजकतेचा, कष्टसाध्य यशाचा प्रवास आहे, तसाच तो प्रेम, जिव्हाळा आणि नात्यांमधल्या, माणसामाणसांमधल्या जिव्हाळ्याचादेखील आहे.