महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
लक्ष्मणरावांनी स्वतंत्र व्यवसाय म्हणून कोटाला लावायची बटणं तयार करण्यास सुरुवात केली. पूर्ण माहिती घेऊन, तयारीने केलेली ही निर्मिती यशस्वी झाली, पण या देशी बटणांना पुरेशी मागणी मिळाली नाही. परदेशी तोडीची बटणं तयार करण्यासाठी अधिक भांडवलाची गरज होती. त्या वेळी तेवढं भांडवल उभं करणं लक्ष्मणरावांना शक्य नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी कमी भांडवलात औषधं, मलमं ठेवण्यासाठी लागणारी कागदाची जाड पाकिटं, डब्या तयार करायला सुरुवात केली. या छोटेखानी कारखान्याचं काम सुदैवाने नीट सुरू झालं, पण लक्ष्मणरावांचा संघर्ष इतक्यात संपायचा नव्हता. मुंबईवर आलेल्या पहिल्या प्लेगच्या धाडीने व्यवसायाचा घात केला. खुद्द राधाबाईंना या जिवावरच्या दुखण्याचा सामना करावा लागला. त्या यातून बचावल्या पण लक्ष्मणरावांच्या कारखान्याचा कारभार अडचणीत आला. त्यांचं मुंबईत राहणंच धोकादायक ठरलं. या अडचणीत रामूअण्णांचा सल्ला घेऊन लक्ष्मणरावांनी १८९७ साली मुंबईतलं आपलं बस्तान हलवलं आणि रामूअण्णांबरोबर सायकलच्या दुकानाची व्यवस्था पाहायची असं ठरवून ते पत्नीसह बेळगावला आले.
मुंबईतील वास्तव्यात लक्ष्मणरावांनी एका पारशी गृहस्थांना सायकल चालवताना पाहिलं होतं. सायकल हे वाहन त्यांना बेहद्द आवडलं आणि त्या दृश्याचा परिणाम म्हणून लक्ष्मणराव सायकल चालवायला शिकले. त्यांनी सायकल या वाहनाची संपूर्ण माहिती घेतली. सातशे ते हजार रुपयांच्या दरम्यान सायकलची किंमत आहे हे त्यांना कळलं. ही माहिती त्यांनी बेळगावात आपल्या भावाला रामूअण्णांना कळवली आणि रामूअण्णांनी ‘बेळगावात सधन माणसं सायकली विकत घेतील’ हा अंदाज घेतला आणि तसं उत्साहाने लक्ष्मणरावांना कळवलं. या पत्रव्यवहारानंतर तत्कालीन बॉम्बेमधून सायकली विकत घेऊन त्या बेळगावात पाठवण्यास लक्ष्मणरावांनी सुरुवात केली. रामूअण्णा या सायकलींची विक्री करीत आणि १५ रू. फी घेऊन सायकल चालवायलाही शिकवीत.
या नवीन व्यवसायाचा बेळगावात चांगला जम बसला होता. बेळगावात सायकलींचा खप वाढू लागल्यावर लक्ष्मणरावांनी ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने लेटरहेडस् छापून घेतली. ‘बेळगावमधील सायकलींचा अधिकृत विक्रेता’ म्हणून इंग्लंडमधील सायकल उत्पादकांकडून अधिस्वीकृतीही मिळवली. पण १८९७ साली बेळगावातही प्लेगचा शिरकाव झाला. सायकल विक्रीचं उत्तम सुरू असलेलं दुकान बंद करावं लागलं. हा काही काळ पराकोटीच्या अडचणींनी मुक्काम ठोकला खरा, पण त्यावर मात करीत कॅम्पमध्ये एक मोक्याची जागा भाड्याने घेऊन, तिथे नवं दुकान सुरू करण्यात आलं. मग या बंधूंनी सायकली आणि त्यांना लागणाऱ्या सुट्या वस्तूंचा ‘किर्लोस्कर ब्रदर्स’चा कॅटलॉग प्रसिद्ध केला.
कोणत्याही व्यवसायात चढ-उतार येतच असतात, या व्यवसायातही लक्ष्मणरावांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यावर विक्रीमध्ये घट होण्याचा काळ आला. त्यामुळे, व्यवसाय टिकला पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट चालला पाहिजे म्हणून आणखी एखाद्या वस्तूच्या विक्रीचा व्यवसाय करावा असं दोघा बंधूंच्या मनात आलं. आजूबाजूच्या जमीनदार, संस्थानिकांशी आणि युरोपियन मंडळींशी बोलताना लक्ष्मणरावांच्या लक्षात आलं की ज्या कारणासाठी लोक सायकली विकत घेतात, त्याच कारणासाठी म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेसाठी लोक पवनचक्क्या बसवून घेतील आणि सुरू झाला पवनचक्या बसवून देण्याचा नवा व्यवसाय. पवनचक्कीची पहिली मागणी नोंदवली गेली आणि लक्ष्मणरावांनी अमेरिकेतल्या ‘सॅमसन विन्ड मिल्स’ या कारखान्याला पत्र लिहून त्यांचे अधिकृत विक्रेते म्हणून मान्यता मिळवली. ‘किर्लोस्कर ब्रदर्स’नी फक्त एका वर्षात पवनचक्क्यांची एवढी तडाखेबंद विक्री केली की कंपनीने किर्लोस्करांना एक पवनचक्कीच भेट दिली. बेळगावातल्या विहिरीवर रामूअण्णांनी ती पवनचक्की बसवली.
विलायतेहून आलेला माल विकणं एवढ्यावर लक्ष्मणराव संतुष्ट नव्हते. त्यांना स्वतः काही यंत्रं बनवून ती विकण्यात स्वारस्य होतं. त्यामुळे त्यांनी प्रयोगादाखल काही सायकलीही बनवून पाहिल्या. मोठ्या प्रमाणात भांडवल असल्याशिवाय ते शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग आता दुसरं काय? हा विचार मनात येतच होता. लक्ष्मणराव आणि रामूअण्णा हे दोघंही नियमितपणे ‘अमेरिकन मशिनिस्ट’, ‘सायन्टिफिक अमेरिकन’, ‘फाऊंड्री’ ही तीन मासिकं वाचत असत. एकदा लक्ष्मणरावांनी वैरणीचे तुकडे करणारं मशीन एका कॅटलॉगमध्ये पाहिलं आणि त्यांच्या मनानं उचल खाल्ली. त्यांनी ते यंत्र अमेरिकेतून मागवून घेतलं. यंत्राची चाचणी घेतली. ते आपल्याकडे उपयोगी पडेल हे लक्षात घेऊन, ते बनवण्यासाठी आवश्यक ती मशिनरी जमवली. दुकानाच्या मागच्याच बाजूला एक खोपट उभारलं, त्यात लाकडी फळ्या बसवल्या, एक भट्टी उभारली, मुंबईमधून काही साचे मागवले आणि तिथे कडबा कापण्याचं पहिलं यंत्र तयार झालं. किर्लोस्कर बंधूंचं हे पहिलं स्वतंत्र यंत्र, पहिलं उत्पादन. शेतकीयंत्रांशी आलेला किर्लोस्करांचा हा पहिला संबंध! या यंत्राच्या विक्रीला सुरुवातीला संथ पण नंतर चांगला प्रतिसाद मिळाला.
याच काळात लक्ष्मणरावांना औंधचे राजपुत्र श्रीमंत बाळासाहेब पंत यांच्याकडून एक पत्र आलं. ते बांधत असलेल्या श्री यमाईच्या देवळाच्या शिखरांना चांदीचा मुलामा देण्याचं काम करण्याबाबत त्या पत्राद्वारे विचारणा झाली होती. हे काम लक्ष्मणरावांनी स्वीकारलं आणि उत्तम पद्धतीने करूनही दिलं. या नंतर काही दिवसांनी लक्ष्मणरावांना आणखी एक पत्र आलं. त्या पत्रात, ‘देवळासमोर सात-आठशे माणसं बसतील एवढा प्रशस्त सभामंडप उभारण्याची थोरल्या महाराजांची इच्छा असून, ते कंत्राट लक्ष्मणराव घेतील का?’ असं विचारलं होतं. लक्ष्मणरावांसाठी ही संधी होती आणि आव्हानही होतं. त्यांनी ते स्वीकारायचं ठरवलं. आपल्या दोन्ही बंधूंशी चर्चा केली आणि एके दिवशी हे तीनही किर्लोस्कर बंधू महाराजांसमोर जाऊन उभे राहिले. महाराजांनी काही क्षण या तिघांवर आपली करडी नजर रोखली आणि त्या नजरेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची पावती दिली ती ‘सतरा हजारांची हुंडी’ किर्लोस्कर बंधूंच्या स्वाधीन करून. लक्ष्मणराव आणि त्यांच्या बंधूंनी हा भव्य, आकर्षक सभामंडप बांधण्याचं कामही अतिशय सुंदर पद्धतीने साकार केलं. या कामातून त्यांना आर्थिक नफा झाला, मनातील नव्या यंत्रविषयक योजनांसाठी हाती पैसा आला आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत बाळासाहेब पंत यांच्याशी स्नेहभाव अधिक दृढ झाला.
हे कंत्राट पूर्णत्वाला जाणं हे सहजी घडलेलं काम नव्हतं. लक्ष्मणराव आणि त्यांच्या बंधूंना पराकोटीच्या अडचणींचा सामना करावा लागला. या कामासाठी लक्ष्मणरावांनी त्यांच्या पत्नीसह बेळगावहून औंधला मुक्काम हलवला होता. सभामंडपाचं काम सुरू केलं होतं. पायाचं बांधकाम झालं आणि थोरल्या महाराजांचं निधन झालं. औंध संस्थानात वारसाहक्कविषयक वितंडवादांना सुरुवात झाली. सुरू असलेल्या बांधकामाच्या पैशांबाबत निर्णय कुणी घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आणि लक्ष्मणरावांना हे काम अर्धवट थांबवावं लागलं. लक्ष्मणरावांचे भरपूर पैसे या कामात गुंतलेले होते, पण काम थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय समोर नव्हता. लक्ष्मणराव आणि राधाबाईंना बेळगावला परत यावं लागलं. हा काळ लक्ष्मणरावांसाठी आर्थिक, व्यावसायिक बाजूंनी फार अडचणीचा होता. एकीकडे औंधच्या मोठ्या आणि अर्धवट झालेल्या कामात पैसा अडकलेला, दुसरीकडे त्यांनी नवीन उत्पादनं निर्माण करण्याच्या प्रयत्नात आपला बराचसा पैसा यंत्र, ओतकामाची औजारं-हत्यारं यात गुंतवलेला, त्याच वेळी विक्री न झालेला माल तसाच पडून काही पैसा अडकलेला या अवस्थेत लक्ष्मणरावांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झालेली होती. या काळात एक शुभयोग घडून आला - लक्ष्मणरावांना पुत्ररत्न प्राप्त झालं, शंतनुचा जन्म झाला. शंतनुराव त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, ‘लक्ष्मणराव खरोखरीच गर्तेत होते. त्यांच्यासारखा एक धडाडीचा तरुण उद्योजक चहुबाजूंनी घोंगावणाऱ्या वादळाला तोंड देत असतानाच माझा जन्म झाल्यामुळे त्यांना पितृवात्सल्याचा आनंद मिळाला. मात्र ही त्यांच्यावरच्या आणि कुटुंबावरच्या परमेश्वरी कृपेची सुरुवात असल्याचा त्यांच्या पत्नीचा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी दुर्दैवाने मानला नाही.’ ते पुढे लिहितात, ‘एका अर्थी माझ्या आईचा विश्वास सार्थ ठरला म्हणायचा. औंध संस्थानच्या दिवाणांचं जेकब बापूजींचं माझ्या वडिलांना आलेलं पत्र हे तिच्या पूजा-परिपाठाचं फळ असल्याची तिची ठाम श्रद्धा होती. ‘राजेसाहेबांनी त्यांच्या हयातकाळी मंजूर केलेला आणि त्यांच्या मृत्यूमुळे गोठवण्यात आलेला निधी मोकळा करण्यात आला असून, त्यामुळे १९०१ सालापासून ठप्प झालेलं बांधकाम पुन:श्च सुरू करण्यात यावं,’ अशी सुवार्ता त्या पत्राने आणली. लक्ष्मणराव पुन्हा औंधला गेले. त्यांनी मोठ्या समाधानाने सभागृहाचं काम पूर्ण केलं. अडथळा आला, काही काळासाठी काम बंद पडलं, दीर्घकाळ पैसे अडकून पडले तरी अंतिमतः लक्ष्मणरावांना चांगला नफा झाला ही आनंदाची गोष्ट होती.
कारखानदार होण्याची जबरदस्त मनीषा असणाऱ्या लक्ष्मणरावांनी या दरम्यान ठरवलं होतं की यापुढे शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं उत्पादन हाती घ्यायचं आणि पूर्ण ताकदीनं काम करण्यासाठी आता एकाच उद्योगात लक्ष केंद्रित करायचं. मनाशी ठाम निश्चय करून, पुरेपूर विचार करून त्यांनी सायकलचं दुकान विकून टाकलं. ते सालही होतं, १९०३. पारंपरिक लाकडी नांगरांपेक्षा कमी त्रासात काम देतील असे लोखंडी नांगर तयार करायचे अशी एक नवीच कल्पना लक्ष्मणरावांच्या डोक्यात आली. लाकडी नांगराचं औत चालवणं फार कष्टाचं काम आणि खर्चाचं असे. ही नांगरणी दोनदा करावी लागे आणि त्यासाठी धष्टपुष्ट बैलांची गरज असे. या काळात परदेशांमधले औत आधुनिक, सुधारलेले आणि तुलनेने कमी खर्चात, कमी कष्टात काम देणारे होते. लक्ष्मणराव परदेशी औतांचे कॅटलॉग पाहात होते. अनेक कॅटलॉग पालथे घातल्यावर, त्यांच्या घडण आणि उपयुक्ततेवर विचार केल्यावर त्या औतांपैकी एका प्रकारचा औत त्यांना पसंत पडला. लक्ष्मणरावांनी इथल्या शेतकी अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्याच्या सहमतीने आवडलेला नांगर विलायतेहून मागवून घेतला.
समोर आलेल्या यंत्राचा अंतर्बाह्य पूर्ण अभ्यास ही लक्ष्मणरावांची कळीची क्षमता होती. त्यांनी हा औत नीट समजून घेतला. असा नांगर बनवण्यासाठी बिडाची भट्टी आवश्यक होती. लक्ष्मणरावांनी आता प्रयत्नांना जुंपून घेतलं. हे काम मोठं किचकट होतं. लक्ष्मणरावांनी ते मोठ्या हिकमतीने आणि चिकाटीने पार पाडलं. बेळगावच्या छोटेखानी कारखान्यात पहिले सहा लोखंडी नांगर जोडून, रंगवून तयार झाले. या पहिल्या नांगरांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी म्हणून किर्लोस्कर बंधूंनी ‘केसरी’ आणि ‘ज्ञानप्रकाश’मध्ये नांगराची जाहिरात केली. ‘किर्लोस्कर बंधू, ठळकवाडी, बेळगाव’ असा पत्ता त्यावर होता. ‘किर्लोस्कर ब्रदर्स’चे भारतीय बनावटीचे पहिलेवहिले लोखंडी नांगर आता शेतकरीराजाच्या प्रतीक्षेत होते.