महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
रामूअण्णांचे धाकटे भाऊ लक्ष्मणराव हे उद्योगमहर्षी म्हणून गौरवले जातात. लक्ष्मणराव हे शंतनुरावांचे वडील. उद्यमशील वृत्तीचा, आधुनिकतेचा, काळापुढे पाहणाऱ्या दृष्टीचा आणि स्वाभिमान युक्त ध्यासाचा वारसा शंतनुरावांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणजे यंत्रांविषयी अपार प्रेम, संपूर्ण निष्ठा, समर्पण, सच्चेपणा आणि साधेपणा. हे उद्योगमहर्षी स्वतःला ‘घिसाडी - लोहार’ म्हणत. किर्लोस्कर उद्योग समूहाची पायाभरणी करणाऱ्या लक्ष्मणरावांचा संपूर्ण जीवनप्रवास एक अत्यंत तेज:पुंज असा प्रेरणास्रोत आहे. लक्ष्मणरावांनी केलेली पायाभरणी एवढी भक्कम होती की, शंतनुरावांनी त्यावर यशाचे अविचल असे अनेक मजले उभे केले, ‘किर्लोस्कर’ हे नाव जगद्विख्यात केले.
लक्ष्मणराव लहानपणापासूनच त्यांच्या भावंडांपेक्षा काहीसे वेगळे होते. त्यांची आई ते जेमतेम तीनचार वर्षांचे असतानाच निवर्तली आणि लहानगा लखू आईच्या प्रेमापासून, छत्रापासून वंचित झाला. अर्थात, मुलांच्या पालनपोषणाकडे, शिक्षणाकडे वडिलांचं पूर्ण लक्ष होतंच. त्यांनी मुलाच्या शिक्षणाची सुरुवात धारवाडला मारुतीच्या देवळातल्या भाऊपंत मास्तरांच्या शाळेत केली. वाचन, लेखन, गणित, संस्कृतचा अभ्यास याचा या मुलाला फार कंटाळा येई. शालेय अभ्यासक्रमात त्याला आवडत असलेले दोनच विषय होते, भूमिती आणि भूगोल. खरंतर लक्ष्मणरावांना अपरंपार रुची होती ती चित्रकलेत आणि यंंत्रविद्येत. लहानपणापासून चित्रं काढणे आणि खेळाच्या वस्तू हाताने बनवत बसणे हा या मुलाचा आवडता उद्योग होता. या गुणांचं शाळेत कौतुक होई, पण अभ्यासात नंबर खाली गेला की छड्याही खाव्या लागत.
१८८० च्या सुमाराला लक्ष्मणराव रामूअण्णांच्या घरी कलादगी इथे राहत होते. त्या वेळी कापडाची गिरणी सुरू करण्याचा प्रस्ताव मनात घेऊन एक गृहस्थ गावात आले. त्या वेळी झालेल्या एका व्याख्यानाचा फार मोठा परिणाम लक्ष्मणरावांवर झाला आणि अंतरातलं यंत्रविषयक प्रेम अधिक लख्खपणे जागं झालं. तसाही एखादी यांत्रिक वस्तू हाती पडली की ती कशी आणि कशासाठी काम करते याचा तपास करायचा नाद त्यांना मुळात होताच, आता तो या क्षेत्रातील शिक्षण घ्यावं, या नेमक्या विचारापर्यंत येऊन पोचला. लक्ष्मणराव हिकमती, तंत्रविषयक कुशाग्र बुद्धी असणारे, कलासक्त होते पण शालेय अभ्यासक्रमात यश मिळवण्यात ते मागे पडले. आपलं आणि अभ्यासाचं काही नीट जमत नाही हे लक्षात आल्यावर कणखर आणि निर्णयक्षम लक्ष्मणरावांनी एकेदिवशी वडिलांना थेट सांगितलं, “आबा, उद्यापासून मी शाळेत जाणार नाही.”
बेताची प्रकृती असलेला, जेमतेम १५ वर्षांचा हा किडकिडीत मुलगा हे बोलला आणि पोथी वाचत असलेल्या काशीनाथपंतांची नजर एकदम वर उचलली गेली.
ते लखूला म्हणाले, “मग तू काय करणार?”
“मुंबईत जाऊन ‘जमशेदजी जिजीभॉय कला विद्यालया’त चित्रकलेचं शिक्षण घेणार!”
हे ऐकून ‘चित्रकलेतून कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह कधीही होऊ शकत नाही,’ अशी स्पष्ट कल्पना देत वडिलांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आणि आपल्या बारा रुपये पगारातून जेमतेम दोन रुपये ते लखूला पाठवू शकतात हे वास्तव समोर ठेवले.
लक्ष्मणरावांनी वडिलांच्या नाराजीकडे काणाडोळा केला आणि आपल्यावर जीव असलेल्या मोठ्या भावाला, रामूअण्णांना मदतीसाठी हाक घातली. रामूअण्णा राजी झाले. लक्ष्मणरावांचं मन राखत, त्यांच्यावर विश्वास दाखवत ते वडिलांना म्हणाले, “हा मुंबईत जाऊ दे. त्याच्या राहण्याचा, शिक्षणाचा खर्च मी उचलेन.” आणि अखेर १८८५ साली लक्ष्मणराव मुंबईत चित्रकला शिकण्यासाठी म्हणून दाखल झाले. दोन वर्षे चित्रकलेचा अभ्यास झाल्यावर ‘आपल्याला रंगांची अचूक छाननी करता येत नाही, डोळ्यात किंचित रंगांधळेपणाचा दोष आहे,’ हे लक्षात आलं आणि या कलाप्रेमाला त्यांना पूर्णविराम द्यावा लागला. हा अनपेक्षित फटका सहन करून लक्ष्मणराव ‘यानंतर काय करायचं?’ हा विचार करू लागले. ते त्याच संस्थेत मेकॅनिकल ड्रॉइंग शिकू लागले.
याच काळात व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू होत आहे आणि तिथे मेकॅनिकल ड्रॉइंग टीचरची गरज आहे, अशी जाहिरात लक्ष्मणरावांनी वाचली आणि तिथे नोकरीसाठी अर्ज केला. त्यांना मुलाखतीसाठी बोलावणं आलं. प्राचार्य जे. पी. पिथियन यांनी त्यांना यंत्रांच्या रचनेच्या नकाशांची नक्कल करून दाखवा म्हणून दोन आरेखनं त्यांच्यासमोर ठेवली. या परीक्षेत लक्ष्मणराव कमालीचे यशस्वी झाले आणि मेकॅनिकल ड्रॉइंग या विषयासाठी सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांची ताबडतोब नेमणूक करण्यात आली. महिना ३५ रू. एवढं वेतन सुरू झालं. या शैक्षणिक संस्थेत काम करताना, आपल्या यंत्रविषयक आवडीला खाद्य म्हणून लक्ष्मणरावांनी ‘अमेरिकन मशिनिस्ट’, ‘सायन्टिफिक अमेरिकन’ आणि ‘फाऊंड्री’ या तीनही नियतकालिकांचं वाचन नियमित सुरू ठेवलं. आर्थिक सोय होताच त्यांनी या नियतकालिकांची वर्गणी भरून टाकली.
या संस्थेत नोकरी करत असताना लक्ष्मणरावांनी अनेक यंत्रांची माहिती घेतली. वर्कशॉपमध्ये ते बराच वेळ खर्च करू लागले. यंत्राची उभारणी, यंत्र चालवणं, त्याचे भाग सुटे करणं आणि पुन्हा जोडणं हे सगळं त्यांनी तिथे आत्मसात केलं. याच काळात त्यांना गिरण्यांना लागणाऱ्या ड्रॉइंगची कामं मिळू लागली. १८९२ साली एक छापखाना उभारण्याचं कामही त्यांनी स्वीकारलं आणि अनुभव नसूनही मेहनत, सजगता आणि यंत्रविषयक आकलनाच्या जोरावर त्यांनी ते कामही यशस्वी केलं. त्यानंतर जर्मनीतून दहा हॉर्स पॉवरचं एक ऑइल इंजिन मागवून, ते जागेवर बसवण्याचं कामही लक्ष्मणरावांनी उत्तम रीतीने पार पाडलं. एकुणात शिकवण्याच्या जोडीला यंत्रांची दुरुस्ती, उभारणी, मशीन ड्रॉइंग्जच्या नकला करणं अशी विविध कामं ते करू लागले. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागलेला होता. यांत्रिक विषयातले अनुभवी, तज्ज्ञ म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांची कीर्ती दूरवर पसरू लागली. लक्ष्मणरावांचा सल्ला घेण्यासाठी दूरदुरून मंडळी त्यांच्याकडे येऊ लागली. त्या काळी नव्यानेच शोध लागलेली फोनोग्राम, मायक्रोस्कोप ही यंत्रंही त्यांनी कौशल्याने हाताळली, वेळी दुरुस्तही केली. दरम्यान, इन्स्टिट्यूटमधले वाफ हा विषय शिकवणारे प्राध्यापक रजा घेऊन इंग्लंडला गेले आणि प्राचार्य पिथियन यांनी विश्वासाने तो विषय मुलांना शिकवण्याची जबाबदारी लक्ष्मणरावांवर सोपवली. इंग्रजी चौथी पास झालेला हा तरुण मुलगा ड्रॉइंग टीचर आणि स्टीमचा प्रोफेसर अशी जबाबदारी सांभाळू लागला. एव्हाना विद्यार्थ्यांनी लक्ष्मणरावांना ‘प्राध्यापक’ ही उपाधी लावायला सुरुवात केलीच होती. आता त्यांचा इन्स्टिट्यूटमधला पगारही पन्नास रुपयांपर्यंत गेला होता. लक्ष्मणरावांचा जम बसू लागला आणि त्यांनी वडिलांना त्यांची देणी परत देण्यामध्ये हातभार लावायला सुरुवात केली.
टेक्निकल इन्स्टिट्यूटमधली नोकरी सुरू होऊन काही काळ झाल्यावर रामूअण्णांनी लक्ष्मणरावांना एक पत्र धाडलं. त्यात त्यांच्या नोकरीविषयी आनंद, कौतुक व्यक्त करून, कुंदगोळ इथल्या पळसुले यांच्या कन्येची निवड लक्ष्मणरावांसाठी केल्याचं कळवलं. ‘मुलीचे नाव नागूताई. वय १० वर्षे. गौरवर्ण. कार्य बेळगावनजीक असोगा इथे येत्या वैशाखात आम्ही निश्चित केले आहे. मुहूर्त निश्चित होताच कळवीत आहे. तरी सुटी होताच, सर्व मंडळी बेळगावास येणेचे करावे.’ मुलगी मोठी गोड होती. लक्ष्मणराव खुश होते. लग्न झालं आणि पत्नीला घेऊन ते मुंबईत परतले.
नोकरी सुरू होती. नवीन यंत्र तयार करण्याची लक्ष्मणरावांची ओढ जोरदार होती. त्यांच्या मनात, डोक्यात सतत यंत्रांचेच विचार सुरू असत. त्यांना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं, पण मिळवलेल्या पैशातले बरेच पैसे ते जुन्या बाजारातून लोखंडी सामान आणण्यासाठी खर्च करीत. एकदा तर जुन्या लोखंडी सामानाला कचरा समजून, त्या पसाऱ्याने वैतागून जाऊन राधाबाईंनी ते सामान भंगारात विकून टाकल्याचा आणि त्यामुळे लक्ष्मणरावांचा पारा चढल्याचा प्रसंगही घडला. हे दिवस धडपडीचे होते तरी सारं काही ठीक सुरू होतं. असा काही काळ गेला आणि लक्ष्मणरावांच्या स्वाभिमानी वृत्तीला ठेच लागली. प्रसंग असा झाला की इन्स्टिट्यूटमध्ये वरच्या पदाची जागा रिकामी झाली. लक्ष्मणरावांचा त्या जागेवर हक्क होता आणि ती त्यांची क्षमताही होती. पण त्याच वेळी प्राचार्य बदलले आणि नवीन प्राचार्यांनी तिथे कमी वकुबाचा अँग्लो इंडियन माणूस नेमला. ‘नेटीव्ह’ असल्यामुळे इन्स्टिट्यूटमधला पदोन्नतीचा लक्ष्मणरावांचा हक्क नवीन प्राचार्यांनी डावलला. याविषयी लक्ष्मणरावांनी केलेल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही आणि मग स्वाभिमान दुखावल्यामुळे, रास्त हक्क डावलला गेल्यामुळे लक्ष्मणरावांनी दहा वर्षे करत असलेल्या त्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय अनेकांना चुकीचा वाटला, पण लक्ष्मणराव मात्र स्थिर मनाने नवीन उद्योगाच्या शोधाला लागले.