महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
किर्लोस्करांना महापालिकेची नोटीस आली त्या काळापर्यंत श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांना वारसाहक्काने औंधचं राजेपद मिळालं होतं. राजेसाहेब बेळगावी आले असता त्यांना किर्लोस्कर कारखान्याच्या अडचणीविषयीची हकीकत राजेसाहेबांना समजली. राजेसाहेबांना लक्ष्मणरावांविषयी जिव्हाळा होता, सचोटीबद्दल विश्वास होता, कार्यक्षमतेबाबत खात्री होती. त्यामुळे ते लक्ष्मणरावांना म्हणाले, ‘मास्तर, तुम्ही कारखाना घेऊन आमच्या संस्थानातच का नाही येत? आम्ही तुम्हाला लागेल तितकी जागा आणि थोडंफार भांडवलही देऊ. हे शब्द बाळासाहेबांचे नव्हेत, तर पंतप्रतिनिधींचे आहेत हे लक्षात ठेवा. मात्र आम्ही उद्या बेळगातून परत जाण्याच्या आधी तुम्ही तुमचा निर्णय आम्हाला सांगा.’ लक्ष्मणरावांनी घरी येऊन रामूअण्णा आणि त्यांचे सहकारी के. के. कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दुसरा कोणताच पर्याय समोर नव्हता, त्यामुळे चर्चेअंती ‘कारखाना औंध संस्थानात हलवायचा’ यावर एकमत झालं. रेल्वे, पाणी, रस्ते, बाजार, पोस्ट या गोष्टी कारखान्यासाठी गरजेच्या होत्या, पण निदान औंधच्या हद्दीत रेल्वे स्टेशन असेल तर ती जागा निवडू असं ठरलं. औंधचे पोलीटिकल एजंट जेकब बापूजी यांनी औंध संस्थानचा नकाशा आणला. त्यांनी ‘कुंडलरोड स्टेशन’ या जागेकडे बोट केलं. ती जागा लक्ष्मणरावांना ठीक वाटली राजेसाहेब म्हणाले, ‘तुम्हाला हव्या तेवढ्या जमिनीवर खूण करा.’
लक्ष्मणरावांनी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या काही विशिष्ट जागेवर खूण केली. ती जमीन राजेसाहेबांनी कायमस्वरूपी किर्लोस्करांना देऊन टाकली. पुढे बाळासाहेबांनी दहा हजार रु. लक्ष्मणरावांच्या स्वाधीन केले. दर साल, दर शेकडा दोन रु. व्याज आणि तीन वर्षांनंतर दर साल हजार रुपये परत करायचे असं ठरलं. विशेष म्हणजे औंध संस्थानात कारखाना सुरू केल्यावर केवळ काही महिन्यांतच किर्लोस्कर बंधूंनी ही रक्कम चुकती केली.
१९१० सालच्या जानेवारी महिन्यात लक्ष्मणराव, अंतोबा फळणीकर, टोणप्पा सुतार आणि धन्या नावाचा गडी ही मंडळी कुंडलरोड स्टेशनवर जागा पाहायला उतरली. लक्ष्मणरावांनी नकाशा काढला. ते समोरची जागा निरखून पाहू लागले. मोजके शेतकरी उतरण्यापुरता आणि इंजिनात पाणी भरण्यापुरता वेळ गाडी थांबणारं आडमार्गावरचं हे स्टेशन. समोर उजाड माळ, त्यावर फक्त निवडुंग आणि काटेरी झुडपं, दोनतीन फूट उंचीची वारुळं, उंदीर, नाग-सापांची वस्ती. एक दोन लहानशी देवळं. एक उजाड पडकं कोठार. डोक्यावर मोकळं आकाश. तिथल्या मनुष्यवस्तीची खूण म्हणजे स्टेशनशेजारी असलेली मास्तरांची घरं, पोर्टरांच्या दोनतीन कोठ्या आणि एक लहानशी धर्मशाळा. बेळगावसारख्या प्रसन्न ठिकाणाहून या कडक उन्हाच्या जागेत या मंडळींच्या मनाची अवस्था कशी झाली असेल त्याची केवळ कल्पनाच केलेली बरी. तरीही, लक्ष्मणरावांनी मोठ्या उत्साहाने जागेची पाहणी केली. एका शमीच्या झाडाच्या सावलीत ते खाली बसले आणि बरोबर आणलेल्या दशम्या खात आगामी काळात इथे काय नि कसं करायचं याची योजना पक्की केली.
आपल्या कारखान्याचं आणि वसाहतीचं स्वप्न किती मोठं आव्हान आहे, याची जाणीव दोघाही भावांना होती. तरीही त्या माळरानावर काबू मिळवून आपलं स्वप्न साकारायचंच, असा निर्धार त्यांनी मनोमन केला. एका आदर्श औद्योगिक वसाहतीची योजना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. कामांची विभागणीही झाली. रामूअण्णांनी आराखडा तयार करण्याची, इमारतींचे नकाशे रेखाटण्याची आणि रस्ते-बगीच्यांची मांडणी ठरवण्याची जबाबदारी घेतली; तर लक्ष्मणरावांनी त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी स्वीकारली. बत्तीस एकरांच्या या ओसाड, कोरड्या आणि पाण्याअभावी पडीक झालेल्या जमिनीवर त्यांनी औद्योगिक वसाहतीचं स्वप्न उभारण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा केली. त्यांच्या त्या अथक प्रयत्नांतूनच ‘किर्लोस्करवाडी’ वास्तवात उभी राहिली.
ऐन धुळवडीच्या दिवशी, १० मार्च १९१० रोजी लक्ष्मणराव नव्या वसाहतीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी औंध संस्थानात जायला निघाले. कारखाना जसाच्या तसा उचलून नवीन जागेत न्यायचा असं ठरलं होतं. बेळगावहून किर्लोस्करांची दोन आणि कामगारांची २५ कुटुंबं या नव्या जागेत मुळासकट स्थलांतरित झाली. ही सर्व मंडळी स्टेशनच्या आवारात राहिली. स्वयंपाकासाठी धर्मशाळेचा उपयोग करू लागली. सर्वांच्या चुली जवळजवळ मांडलेल्या होत्या. राधाबाईंच्या चुलीशेजारी संतू सुताराच्या बायकोची चूल, तिच्या शेजारी तात्या न्हाव्याच्या बायकोची चूल असं सहजीवन अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झालं. कारखान्यासाठी शेडचं काम आणि लोकांसाठी झोपड्या बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं. पाण्यासाठी विहीर खोदण्यात आली. या माळावर ‘धनगरांचा मायोबा’ म्हणून देव होता. त्या जुन्या काहीशा मोडकळीस आलेल्या देवळाच्या सोप्यात शाळा भरवली जाऊ लागली. जरंडीकर नावाचे शिक्षक नेमण्यात आले.
लक्ष्मणरावांनी विलायतेत स्वतंत्र औद्योगिक वसाहती स्थापन केल्या गेल्याचं वाचलं होतं आणि त्यांना ती कल्पना फारच आवडली होती. अमेरिकेतल्या ‘नॅशनल कॅश रजिस्टर’ या कंपनीने त्यांच्या कामगारांसाठी उभी केलेली वसाहत लक्ष्मणरावांच्या मनात भरली होती. ३२ एकराच्या त्या ओसाड माळावर, अवघ्या साडेचौदा हजारांच्या पुंजीवर अशी वसाहत उभी करण्याचं स्वप्न ते बघत होते. बेळगावातून कारखान्याची एकेक शेड उतरवायची आणि या माळावर आणून तशीच्या तशी उभी करायची. तिथली यंत्रं उचलायची, इथे आणून तशीच्या तशी बसवायची... असं करून ही नवीन वसाहत कारखान्यासह काही महिन्यात नव्याने उभी राहिली. मोठ्या उमेदीने या वसाहतीचं नामकरण झालं - किर्लोस्करवाडी.
किर्लोस्करवाडीमध्ये या बंधूंच्या उद्योगाचा जम उत्तम तऱ्हेने बसायला सुरुवात झाली. किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थाने रुजली, बहरली, यशवंत झाली. एकदा तर औंधचे राजेसाहेब स्वतः किर्लोस्करवाडीत येऊन चार दिवस राहिले. त्यांनी प्रत्येकाची पाठ मोठ्या कौतुकाने आणि प्रेमाने थोपटली. या पुढच्या काळात राजेसाहेबांनी लक्ष्मणरावांकडून औंध संस्थानची अनेक कामं त्यांना आपल्याकडे वरचेवर बोलावून करून घेतली. लक्ष्मणराव राजेसाहेबांचा उजवा हात बनून गेले.