महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
इंजिनाच्या बाजारपेठेत १९६९च्या दरम्यान पुन:श्च एकदा मंदी यायला सुरुवात झाली होती. व्यापार कुठलाही असला तरी त्याच्या चढउताराचा आलेख नेहमीच अस्थिर असतो. अर्थात प्रत्येक वेळी त्याची कारणं वेगळी असू शकतात. यावेळी कमी अश्वशक्तीच्या इंजिनाची मागणी इतकी खालावली की, ती सगळी इंजिनं गोडाऊनमध्ये पडून राहू लागली. परिस्थिती पूर्ववत होण्याचं काही चिन्ह दिसेना. त्यातच सरकारी धोरणाने अजून संकट वाढवलं. खरं पाहता इंजिनाचा व्यवसाय शेतीप्रधान प्रदेशाशी - शेतीच्या प्रगतीशी जोडलेला असल्याने सरकारतर्फे त्याला किमान संरक्षण मिळणे आवश्यक असते, पण फक्त छोट्या कारखानदारांना मदतीचं धोरण सरकारने आखल्यामुळे शंतनुरावांनी ताबडतोब त्यांच्या मूळ स्वभावानुरूप उघडपणे ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली. अशा सगळ्या मंथनामध्ये परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कंपनी स्वतंत्रपणे किंवा भागीदारीतही सुरू करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणत होते. दरम्यानच्या काळात सरकारने शेती उत्पादन वाढवण्यासाठी काही ठोस पावलं उचलायचं ठरवलं. ट्रॅक्टर्स आणि शेतीसाठीची यंत्रं घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळणार होती. हे लक्षात घेऊन १९७० साली ‘किर्लोस्कर ट्रॅक्टर्स लिमिटेड’ कंपनी रजिस्टर केली. जर्मनीतील क्लाकनेर - हुम्बोल्ट - डॉईल्स या कंपनीच्या साहाय्याने ट्रॅक्टर्स बनवायचं ठरलं. शेती अवजारांपासूनच किर्लोस्कर घराण्याच्या व्यवसायाचं पहिलं पाऊल पडलेलं होतं. त्याला स्मरत ‘किर्लोस्कर किसान इक्विपमेंट लिमिटेड’ या छोट्या पेट्रोल इंजिनाची निर्मिती करणाऱ्या कंपनीचीही स्थापना झाली.
किर्लोस्कर यांनी आपल्या परदेशी व्यापाराच्या सोयीसाठी तिथेच विक्रीची केंद्र उभारायचं ठरवलं होतं. १९६५ साली बँकाॅकला उघडलेलं केंद्र अतिशय यशस्वी ठरल्यानंतर रॉटरडॅम इथे सुद्धा असंच एक केंद्र सुरू करण्यात आलं. तिथूनच कॅनडा, दक्षिण अमेरिकेतल्या बाजारपेठांना माल पुरवण्यात येऊ लागला. रशियामध्येही किर्लोस्करांनी तयार केलेल्या पंधरा कमिन्स इंजिनांची निर्यात केली. १९७४ मध्ये ‘बेल्गो - इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ चे प्रमुख पाहुणे म्हणून शंतनुरावांना बोलावणं होतं. युरोपियन राष्ट्र आणि भारत यांच्या परस्पर सहकार्याने उद्योग व्यवसाय अधिकाधिक वाढीला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. औद्योगिक स्पर्धेऐवजी सहकार्य कसे नांदू शकेल हे अगदी तपशीलवार त्या भाषणांमध्ये त्यांनी मांडलं. इतरही वेळी जेव्हा जेव्हा ते युरोपात गेले तेव्हा त्यांनी स्पर्धेऐवजी सहकार्याचं तत्त्व अधोरेखित केलं.
एकदा कारखाना उभा केल्यानंतर तो जसाजसा वाढेल, तुमच्या उत्पादनाचा दर्जा जसा सुधारेल तसतसे परदेशी कारखानदार स्वतः तुमच्याकडे खरेदीसाठी येतील. भारताची बाजारपेठ खूप मोठी आणि विस्तारलेली आहे. त्यामुळे परदेशी उद्योजकांनाही इथे विश्वासू सहकारी व्यावसायिक हवे असतात. या तत्वाने उत्पादनाच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता निर्यातीच्या क्षेत्रात किर्लोस्कर यांच्या सगळ्याच कंपन्यांनी भरारी घेतली होती. यंत्रांच्या उत्पादनात आणि त्याच्या निर्यातीतही आघाडी होती. भारतातली अर्धीअधिक डिझेल इंजिनं, ४०% सेंट्रीफ्यूगल पंप, ४०% टक्के विजेच्या मोटारी आणि इतरही मशीन टूल्स याची निर्यात फक्त किर्लोस्कर समूह करत होता. एकूण उत्पादनाच्या १० टक्क्यांवरून निर्यात ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली. साहजिकच एका भारतीय उद्योजकाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे यश लक्षणीय होतं. १९६५ मध्ये शासनाने ‘पद्मभूषण’ हा बहुमान देऊन शंतनुरावांचा गौरव केला.
अल्प समाधान आणि कूपमंडुक वृत्ती सोडल्याशिवाय विश्व पादाक्रांत करता येणार नाही. उद्योग हाच राष्ट्राच्या प्रगतीचा आणि एका उद्योजकांच्या जीवनाचा पाया आहे, हे ओळखल्यावाचून तरणोपाय नाही. याच संदर्भात शंतनुरावांनी लक्ष्मणरावांविषयी लिहिलं होतं, “किर्लोस्कर कुटुंबीयांना सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर ती म्हणजे सतत कष्ट करून आपल्या उद्योगधंद्याची वाढ करण्याची वृत्ती आणि सवय! म्हणून लक्ष्मणरावांच्या स्मृतीसाठी सुट्टी घेण्याऐवजी रोजच्यापेक्षा जास्त उत्पादन करून दाखवणं हेच त्यांचं खरं स्मरण होईल.” किर्लोस्करवाडीपासून सुरू झालेली वाटचाल आणि प्रत्येक पावलागणिक लाभलेलं अनुभवाचं संचित घेऊन नवनव्या शिखरांकडे ते वाट चालत राहिले. या कर्म योगाचं फलित म्हणजे इंजीनियरिंग उत्पादनात ठोस आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल उद्योजकांना दिला जाणारा ‘सर वॉल्टर की’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार शंतनुरावांना आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘जगातील यशस्वी व्यावसायिक’ असं नामाभिधान देऊन फॉर्च्यून मासिकातूनही त्यांच्या कार्याला गौरवण्यात आलं.
स्वातंत्र्यपूर्व काळात जोखडाखाली असलेल्या भारतीयांनी परदेशी कापडाच्या होळ्या केल्या. ही कृती म्हणजे ब्रिटिश सत्तेला जळजळीत विरोध होता. अनेकांनी या चळवळीत आवेशाने उड्या घातल्या होत्या. त्या काळात ‘मेड इन शेफिल्ड’ असा शिक्का असल्याशिवाय साधा चाकू सुद्धा भारतात दिसत नव्हता. त्या काळात कुंडल या छोट्याशा खेड्यात देशी नांगराचा फाळ तयार होत होता. आज जगभरात फक्त उक्तीने नाही तर कृतीने सुद्धा किर्लोस्कर समूहाने ‘मेड इन इंडिया बाय किर्लोस्कर्स’ अशी निर्यात करून स्वदेशीच्या प्रेमाचा आणि पर्यायाने राष्ट्रप्रेमाचा पुरस्कार केला. पुण्यामध्ये किर्लोस्करांच्या जोडीला कितीक लहानमोठे कारखाने उभे राहत होते. कारखाना पाहण्यासाठी, आयात-निर्यातीसाठी, अनेक प्रकारच्या वाटाघाटी करण्यासाठी परदेशी मंडळी येत असत. त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी अद्ययावत असं हॉटेल त्यावेळी पुण्यात नव्हतं. बरेच दिवस मनात घोळत असलेली एक कल्पना शंतनुरावांनी पुण्यातल्या प्रमुख कारखानदारांना एकत्र घेऊन आकाराला आणली. ‘पूना इंडस्ट्रियल हॉटेल्स लिमिटेड’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेने ‘ब्लू डायमंड’ हे देखणं, सुखसोयी असलेलं, आलिशान हॉटेल उभं केलं.
किर्लोस्कर उद्योग समूहाने आपल्या अनेक लोकोपयोगी उत्पादनांमुळे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मोहर उमटवली आहे. सातत्यपूर्ण प्रगतिशील उद्योगामुळे विकासाची चक्रं सतत चालती ठेवण्यामध्ये किर्लोस्करांच्या नांगर, पंप, मोटारी, ट्रॅक्टर आणि इतर लहान मोठी यांत्रिक हत्यारं यांचा समावेश होतो. उत्तम गुणवत्ता निर्माण करून, त्याचा दर्जा टिकवणे सोपी गोष्ट नाही आणि विनासायास तर नाहीच. दर्जेदार यंत्रसामुग्रीच्या उत्पादनाच्या बळावर देशी आणि परदेशी बाजारपेठांमध्ये खंबीरपणे उभे राहताना त्यांनी तारतम्याचा विचार केला. कारखानदारीचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी आल्यानंतर असं लक्षात आलं की, आपल्या दैनंदिन कामात अडकल्यावर महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याकरता वेळ मिळत नाही. आर्थिक क्षेत्रातले चढ-उतार लगेच लक्षात आले तर त्यावर कारखान्याच्या हिताची उपाययोजना करता येते. यावरही शंतनुरावांनी एक उपाय शोधला. काही अनुभवी, कारखान्याचे काम माहीत असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा गट तयार करून त्यांच्याकडे आर्थिक क्षेत्रातल्या बदलांचं, घडामोडींचं परीक्षण करण्याचं काम दिलं. कारखान्याचा विस्तार आणि प्रगती तसेच आर्थिक बाबी, गुंतवलेल्या रकमा यांविषयी अभ्यास करून, निरीक्षण नोंदवून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्याचं काम ‘कॉर्पोरेट ऑफिस’ सुरू करून या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या गटाला सोपवण्यात आलं.
आणखी एक महत्त्वाकांक्षी कामगिरी किर्लोस्कर यांनी केली, ती म्हणजे कारखान्यातल्या तंत्रज्ञांनी तयार केलेलं ‘आर इ टी चार डिझेल (चार स्ट्रोक) इंजिन’. संपूर्णतः भारतीय बनावटीचं आणि अतिशय आधुनिक असं हे डिझेल इंजिन होतं. जगातलं असं हे एकमेव इंजिन होतं. त्याची तपासणी करण्याकरता, योग्यता ठेवण्याकरता या डिझेल इंजिनाची जीप पुण्याहून लेहचा ५४०० कि.मी.चा खडतर प्रवास करून येण्याच्या प्रकल्पाला ’मेघदूत’ म्हटलं गेलं. या प्रवासात वाटेत लागलेल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या डिझेल इंजिनाची प्रात्यक्षिकं दाखवली गेली. या यशोफलानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग केला. ‘ओडिसी २.आर.ई.टी.४’ या डिझेल इंजिनाची मोटार गाडी पुणे ते लंडन अशी दिव्य फेरी मारून आली. या प्रयोगामुळे इंजिन उत्पादनातलं एक नवं क्षितिज समोर दिसू लागलं.
इंजिनांवर शंतनुरावांचा खरोखर जीव होता. त्यात रमलेली, उत्तम यंत्रनिर्मितीसाठी झटणारी त्यांची छबी कितीकांच्या मनात ठळकपणे कोरलेली आहे. गुणवत्तापूर्ण इंजिनं जगभर पोचवणं या ध्येयातून ते शब्दशः निर्याततज्ज्ञ झाले होते. मुळातच औद्योगिकीकरणात भारताच्या पुढे असलेल्या, प्रगत युरोप - अमेरिकेत भारतीय बनावटीची यंत्र विकणं ही दुर्लभ गोष्ट प्रत्यक्षात आली आणि भारतीय उद्योग जगताचा चेहरा म्हणून किर्लोस्कर हे नाव वलयांकित झालं.