महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुरावांनी शिक्षणाला प्रयोगशील कष्टाची, दूरदृष्टीची जोड देत आधीच्या पिढीने उभारलेल्या कामांमध्ये स्वतःच्या कल्पनांची भर घातली. ही वाटचाल करत असताना अनेक विषयांबद्दल त्यांची काही मतं ठाम होत गेली. त्यांच्या मते काही विचार हे न पटणारे असले तरी कालांतराने प्रेरणादायक आणि योग्य वाटतील असेच आहेत. ‘गुरू’ या संकल्पनेविषयी काही स्पष्ट मतं त्यांनी मांडली आहेत. त्याबद्दल ‘निवडुंग आणि गुलाब’ या चरित्रात शंतनुराव म्हणतात,
“प्राचीन परंपरेने आपल्याला भरपूर गुरू आंदण म्हणून दिले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून आपण या राजकीय गुरूंमध्ये उदंड भर घातली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्याला मार्गी लावण्याचा मक्ता त्यांचा आहे, अशी त्यांची समजूत आहे. अगदी शेतकऱ्यांनी कोणतं पीक घ्यावं, कोणत्या किमतीला आणि कुणाला विकावं, माझ्या कारखान्यात मी काय आणि किती प्रमाणात उत्पादन घ्यावं हे सगळं ते गुरू ठरवतात. आपल्या देशामध्ये राजकीय अध्यात्मवादाला जवळपास नव्या धर्माचा दर्जा प्राप्त झाला आहे.
गुरूंना त्यांच्या आज्ञांच्या पालनकर्त्यांची गरज असते आणि पालनकर्त्यांना गुरू हवे असतात. ‘गुरूवर सगळा भरवसा टाका’ ही आपली जीवनपद्धती बनली आहे. गुरूशी सहमत असणं अनिवार्य झालं आहे. माझ्या दृष्टीने ज्ञानलालसा आणि वस्तुनिष्ठता ही महान मानवी मूल्यं आहेत. आपले गुरू आणि प्रेषित ज्या बिनशर्त सहमतीची अपेक्षा ठेवतात त्यामुळे मूल्यांशी प्रतारणा होते, असं माझं मत आहे.” जर बारकाईने आणि खोलात जाऊन विचार केला तर खरोखरच शंतनुरावांची मतं मूल्यांना जोडून घेणारी होती.
फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून शंतनुरावांची कामगिरी अधोरेखित करण्यासारखी ठरली. शंतनुराव उपाध्यक्ष असताना गोयंका अध्यक्ष म्हणून काम पाहत असत. मात्र त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे बरंचसं काम शंतनुरावांना पाहावं लागत असे. १९६५ साली शंतनुरावांनी केलेलं अध्यक्षीय भाषण अतिशय गाजलं. सडेतोडपणा आणि परखडपणासाठी त्या भाषणाचा उल्लेख केला जातो. एक उद्योजक म्हणून आणि उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली मतं, आपले विचार पंतप्रधानांच्या समोरच स्पष्टपणे, कुठलाही आडपडदा न ठेवता, भीड न बाळगता मांडले. असं म्हटलं जातं की, २५ मिनिटांचं हे असं प्रभावी भाषण यापूर्वी कधी झालं नव्हतं. अनेक अर्थाने शंतनुरावांची ही कारकिर्द महत्त्वाची ठरली. आर. जी. सरैया यांच्या मते, फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर शंतनुरावांनी अधिक घनिष्ठ संबंध निर्माण केले. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी देवघेवी मोठ्या प्रमाणावर सुरू होण्यास शंतनुरावांचे प्रयत्न कारणीभूत झाले. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सही त्यांच्या खटपटीने स्थापन झाली. फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून शंतनुराव फक्त सभासदांमध्येच लोकप्रिय नव्हते तर सरकारी अधिकाऱ्यांमध्येही लोकप्रिय होते.
शंतनुराव एखाद्या प्रकल्पाबाबत बोलत असत किंवा टीका करत असत, तेव्हा अगदी स्वाभाविकपणे उद्योजकांबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि विचारही मांडले जात असत. त्यामुळे एका अर्थाने ते दोन्ही बाजूंचे प्रवक्ते बनले होते. शास्त्रीजी पंतप्रधान असताना, नेपाळचे राजे आणि राणी भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्याकरता मेजवानीची व्यवस्था करण्याची जबाबदारी शंतनुरावांवर होती. यजमान म्हणून शास्त्रीजींनी त्यांना त्या दोन पाहुण्यांच्या मधोमध बसायला लावले होते. शंतनुराव स्वतः उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक तर होतेच पण परदेशातल्या कारखानदारीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता. आपल्याला उपयोगी असणारी तिथली शिस्तीची, गुणवत्तेची, दर्जाची सगळी तत्त्वे आपल्याकडे यावीत आणि आपल्याही परिस्थितीचा, मानसिकतेचा विचार त्याच्याशी जोडून घ्यावा, ही त्यांची भूमिका होती.
१९७० साली मराठा चेंबरतर्फे उद्योगव्यवसायाच्या निरीक्षणासाठी, अभ्यासासाठी १४४ सदस्यांचा पहिलावहिला विदेश दौरा ठरवण्यात आला होता. बँकॉक, हॉंगकॉंग आणि जपान असा हा दौरा होता. ‘एक्सपो’चं प्रदर्शन आणि तिथल्या काही महत्त्वाच्या कारखान्यांना भेट द्यायची होती. पासपोर्ट लवकर काढण्याची जबाबदारी एअर इंडियाने घेतली. विमान तिकिटाचे पैसेही भरून झाले, पण कार्यालयीन अडचणींमुळे पासपोर्ट वेळेवर मिळण्याची चिन्हं दिसत नव्हती. ही तयारी चेंबरकडून भा. र. साबडे पाहात होते. शेवटी त्यांनी एअर इंडियाचे चेअरमन जे. आर. डी. टाटा यांना एक पत्र द्यावं म्हणून पत्र-मसुदा लिहून शंतनुरावांची तातडीने भेट घेतली. जे. आर. डीं.ना टेलेक्सवर पत्र पाठवले. शंतनुरावांनी त्यांना स्वतः फोन केला. दुसऱ्या दिवशी साबडे जेव्हा एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये पोचले तेव्हा मराठा चेंबरसाठी एक विशेष अधिकारी नेमला गेला आणि युद्धपातळीवर पुढची सगळी कामं पार पडली. हा दौरा झाल्यावर त्याची हकीकत शंतनुरावांनी तेवढ्याच उत्सुकतेने ऐकून घेतली. पुढच्या दौऱ्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
आपल्या उत्पादनाने सातासमुद्रापलीकडे जाऊन आपल्या कंपनीचं आणि देशाचं नाव ठळकपणे कोरावं यासाठी शंतनुरावांनी खडतर तपश्चर्या केली. स्वतःचे कारखाने यशस्वीपणे सांभाळताना उद्योजकांना एकत्र आणणं, मराठा चेंबरचं काम जागतं ठेवणं, आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रिअलिस्ट फेडरेशनमध्ये स्वतःची भूमिका मांडणं, त्यांचं प्रतिनिधित्व करणं या साऱ्यातून शंतनुराव किर्लोस्कर हे आंतरराष्ट्रीय उद्योग जगतातलं महत्त्वाचं नाव ठरलं. मराठा चेंबरचं, तसंच फेडरेशनचं कार्य, काळानुरूप ठरवलेली ध्येयधोरणं याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून त्याच्या प्रसिद्धीसाठी शंतनुरावांनी नारायण पुराणिक यांच्याकडे जबाबदारी सोपवली. खरंतर ते किर्लोस्कर मासिकाचं काम पाहत असत, पण त्याच्या बरोबरीनेच साधारण एक तपाचा काळ पुराणिकांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून समर्थपणे आणि कल्पकतेने काम पाहिलं. प्रसाराचं काम इंग्रजीतून केलं तर ते सर्वदूर पोहोचेल आणि त्याची परीघ विस्तारेल असं पुराणिकांचं म्हणणं होतं. शंतनुरावांनी त्याला कधीच आडकाठी केली नाही. शंतनुरावांची प्रगतिशील आणि विचारी उद्योजक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रतिमा याच काळात तयार झाली. कितीतरी प्रदर्शनांमधून, सभांमधून, बैठकांमधून, चर्चासत्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मांडण्याची संधी शंतनुरावांना मिळाली.
मेसर्स एफ. एच. शुले हॅम्बुर्ग हा पश्चिम जर्मनीमधला ७५ वर्षांचा जुना कारखाना होता. तिथे वेगवेगळी लहान मोठी यंत्रं तयार होत होती. याशिवाय आधुनिक जोडणीची भातसडीची यंत्रंही तयार होत होती. महायुद्धाच्या काळात शुले यांनी उद्ध्वस्त झालेला कारखाना पुन्हा एकदा कष्टपूर्वक आणि संयमाने उभारला. कुठल्याही व्यावसायिकाला व्यवसाय वारशाने पुढे द्यायचा असेल तर पुढच्या पिढीलाही त्यामध्ये मनापासून रस असणं गरजेचं असतं. शुले यांच्या मुलाचं कारखान्याकडे फारसं लक्ष नव्हतं. एकहाती कारखाना चालवणं कठीण होऊ लागल्यावर त्यांनी तो विकायचा ठरवलं. शंतनुरावांची आणि शुलेची परदेशातल्या उद्योजकांच्या बैठकीमध्ये ओळख झालेली होती आणि त्यावेळी केलेल्या भाषणात “विकसित आणि अविकसित देश हातात हात घालून काम करू शकतील. जिथे कामगारांचा सहभाग जास्त आवश्यक आहे तिथे हे जास्त फलद्रुप होण्याजोगं आहे,” या भाषणातल्या काही मुद्द्यांमुळे शंतनुरावांविषयी ‘शुले’चं मत सकारात्मक झालं होतं. याच परिचयामुळे ‘शुले’च्या कारखाना विक्री संदर्भात शंतनुरावांना कळलं होतं.
शंतनुरावांनी १९६६ मध्ये हा कारखाना विकत घ्यायचं ठरवलं खरं पण खूप मोठी किंमत त्या कारखान्यासाठी द्यावी लागणार होती. अनेक लहानमोठ्या अडचणीतून तरून जाऊन अत्यंत दूरदृष्टीने आणि धडाडीने त्यांनी हा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे एक उद्योजक म्हणून शंतनुरावांची काळापुढे पाहण्याची नजर अप्रूपाची ठरते. त्यांना शुलेच्या आधुनिक मशीनरीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा झाला आणि परकीय बाजारपेठेमध्ये मानाने आणि खंबीरपणे उभं राहण्याकरता त्या कारखान्याचा आधार मिळाला. त्यादरम्यान आयात निर्यातीच्या बदललेल्या राजकीय-आर्थिक धोरणांमुळे व्यापाराची स्थितीत चढ-उतार होत होते. ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’ची कल्पना उदयाला आलेली होती. अरब-इस्त्राईल युद्धामुळे सुवेज कालवा बंद झाला आणि माल पोहोचायला सात-आठ महिने लागणार होते आणि हे नक्कीच व्यावसायिकतेच्या कसोट्यांवर उतरणारं नव्हतं. ई. ई. सी. च्या प्रदेशातच यंत्रजोडणी होईल का, या शोधात शंतनुराव होते. शुलेच्या कारखान्याच्या रूपाने एक संधी चालून आलेली होतीच. त्याच दरम्यान भिवंडीला जी. जी. दांडेकर यांचा भातसडीची यंत्रं तयार करणारा कारखाना होता. या कंपनीत सात लाख रुपये गुंतवून कंपनीचे हक्क मिळवले. याच कारखान्यात भातसडीच्या यंत्राचे सुटे भाग तयार करून जर्मनीच्या कारखान्यात पाठवण्याची योजना आखली. भिवंडीचा कारखाना आणि हॅम्बुर्गचा कारखाना यांची सांगड आश्चर्यकारकरित्या कल्पकतेने घातली होती. या दोन्ही कारखान्यांच्या आदानप्रदानाची धुरा वर्तकांनी सांभाळली होती. कारखाना देशातला असो वा परदेशातला, तिथल्या कामगारांची मानसिकता आणि परस्परांची वाटणारी खात्री आणि त्यातून भविष्यात निर्माण करता येणाऱ्या नव्या शक्यता, हीच व्यवसायाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. शंतनुरावांनी उत्पादनासंदर्भात नवनवीन गोष्टींचं स्वागत केलं. मात्र स्वतः उत्पादनासाठी जो एक विशिष्ट प्रांत त्यांनी निवडला होता, त्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. किर्लोस्करांची उत्पादनं वाढली तरी सुद्धा त्या मागचं मुख्य सूत्र तेच राहिलं.
१९७३ मध्ये इंदिरा गांधी सरकारने गव्हाचा व्यापार ताब्यात घेऊन त्याचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्यांनी मुंबईत सुमारे एक लाख व्यापाऱ्यांच्या अभूतपूर्व सभेचे आयोजन केले आणि त्याचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांच्या परखड भूमिकेमुळे सरकारला हा निर्णय बदलावा लागला.