महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
१९५० साली किर्लोस्करवाडीच्या वर्धापनदिनासाठी शंतनुराव, यमुताई आणि लक्ष्मणराव वाडीत गेले. ४५ साली लक्ष्मणरावांनी कामगारांमुळे वैतागून वाडी सोडली होती आणि ही गोष्ट जुन्या मंडळीना फार बोचत होती. त्यामुळे कामगारांपैकी पाच जणांनी पुण्यात येऊन लक्ष्मणरावांना आग्रह-विनंती करून वाडीला यायला राजी केलं. रामूअण्णाही औंधहून आले. वाडीत लक्ष्मणरावांची मोठी मिरवणूक काढली गेली. मिरवणुकीतला लक्ष्मणरावांचा रथ मोठा देखणा आणि भव्य होता. मिरवणुकीत सजवलेल्या ४० बैलगाड्याही होत्या. हा दिवस लक्ष्मणरावांसाठी आणि साहजिकच शंतनुराव व साऱ्या कुटुंबियांसाठी आनंदाचा, समाधानाचा होता. याच वर्षी आणखी एक आनंदाची आणि शंतनुरावांची जबाबदारी वाढवणारी घटना घडली. ‘मेकॅनिकल इंजीनिअरिंग असोसिएशन’च्या अध्यक्षपदी शंतनुरावांची निवड झाली. १९५० साल अर्धअधिक संपत आलं त्या सुमाराला पुण्याच्या कारखान्यात रोज सुमारे १० ते १२ ए.व्ही.१ या प्रकारच्या पाच हॉर्स पॉवरच्या ‘किर्लोस्कर-पेटर’ इंजिनाचं उत्पादन सुरू झालेलं होतं. पेरी आणि कंपनीच्या सहाय्याने ही इंजिनं देशात ठिकठिकाणी विकली जाऊ लागली होती. इंजिनाशी जोडलेल्या किर्लोस्कर पंपाच्या सेटस् ना तर सर्वत्र मागणी होती. दुष्काळ निवारणासाठी असे ३०० पंपसंच किर्लोस्करांनी केवळ बिहार कारखान्यालाच पुरवले होते. वीज नसलेल्या भागात तर हे पंप म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं वरदानच होतं.
त्या काळात कोरियन युद्धामुळे जागतिक मंदी होती. परदेशातून उत्पादनासाठी आवश्यक जे सुटे भाग येत असत त्यांची आता खात्री वाटत नव्हती. या वास्तवामुळे १९५१ सालच्या अखेरीस सारे भाग कारखान्यात देशात तयार होतील यासाठीची व्यवस्था केली गेली. तरीही दोन-तीन भागांसाठी आयातीवर अवलंबून राहावं लागणार होतं. यातून मार्ग काढताना शंतनुरावांनी सुचवलं की ‘दुसऱ्या उद्योजकांना तांत्रिक आणि आर्थिक मदत द्यायची आणि त्यांच्या वर्कशॉपमधून हे भाग बनवून घ्यायचे’. शंतनुरावांच्या या विचारामुळे पुणे आणि जवळपासच्या भागात बरेच उद्योगधंदे उभे राहिले. या वेळेपर्यंत सरकारचं धोरण देशी उद्योगांच्या वाढीला पूरक होतं. देशी डिझेल इंजिने बाजारपेठेत पडून राहू नयेत आणि शेतकऱ्यांना इंजिनाचा तुटवडा पडू नये, या उद्देशाने परदेशी इंजिनं बेताने देशात येतील याची काळजी घेतली जात होती. यामुळे देशी इंजिनाला संरक्षण तर मिळत होतंच, पण नव्या उमेदीने देशाच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करण्याचा हुरूपही वाटे. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५१ मध्ये शंतनुराव अमेरिकेला गेले. त्या वेळी कारखान्यात दरमहा २५० ते ३०० इंजिनं तयार होत होती. शंतनुराव परत आले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चंद्रकांत होते. मेन विद्यापीठातलं त्यांचं शिक्षण पूर्ण करून आता ते कारखान्यात कामाला लागणार होते. परत आल्यावर शंतनुरावांनी कामगारांची एक सभा घेतली आणि त्या सभेत ‘कारखान्यासाठी प्रॉव्हिडंट फंड’ सुरू केल्याची घोषणा केली. उत्साहवर्धक अशा त्या वातावरणात दरवर्षी कारखान्याचे उत्पादन दहा हजार इंजिनापर्यंत वाढण्याचा विचार सुरू झाला.
पुढच्याच वर्षी मात्र परिस्थिती एकदम बदलली. १९५२ साली देशभरात काही ठिकाणी पावसाने ओढ दिली आणि ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात तसं कापूस, गूळ, तेल, बिया आदींच्या दरातही मोठी घसरण झाली. मंदी निर्माण झाली. साहजिकच शेतकऱ्यांकडची इंजिनाची मागणी कमी झाली. ही स्थिती वर्षभर तशीच राहिली आणि नोंदवलेल्या ऑर्डर्स वितरकांना रद्द कराव्या लागल्या. त्यातच १९५१ साली सरकारने जी पहिली पंचवार्षिक योजना आखली ती मुख्यत: शेतीचा विकास, सिंचन योजना, वीज उत्पादन यावर भर देणारी होती. बाजारातील इंजिनांच्या तुटवड्यामुळे आणि त्यातून सरकारने आखलेल्या इंजिन आयातीच्या धोरणामुळे बाजारपेठा परदेशी इंजिनांनी भरून वाहू लागल्या. शेतीसाठी पाणीपुरवठा करणारी ८० हजार इंजिनं लागतील आणि इतकी देशी इंजिनं तयार होऊ शकत नाहीत असा सरकारी अंदाज होता. या अंदाजामुळे देशी इंजिनांची बाजारपेठ एकदम गडगडली. या बाबतीत शंतनुरावांचं म्हणणं होतं की, ‘ही आकडेवारी कदाचित बरोबर असेल, परंतु निरनिराळ्या कारणांमुळे इतकी सारी इंजिने एकदम वापरात आणणे दुरापास्त आहे. त्यामुळे देशी इंजिनांपुढे एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवावं आणि काही इंजिने आयात करावी.’ शंतनुरावांचा हा मुद्दा पूर्णत: बरोबर होता याचा प्रत्यय पुढे आलाच. प्रचंड संख्येत आयात केलेली इंजिने एकदम वापरात का येऊ शकत नाहीत याची कारणेही त्यांनी सांगितली.
सरकारी धोरणामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने मदत करायला हवी असंही शंतनुरावांचं स्पष्ट मत होतं. हा मुद्दा सरकारला पटवून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. मध्यवर्ती सरकारने सर्व प्रांतिक सरकारना सूचना दिल्या की त्यांनी शक्यतोवर त्यांच्या गरजांसाठी देशी इंजिनेच खरेदी करावीत. ती वेळ मूळ समस्येतून सहजासहजी बाहेर पडता यावं अशी अजिबातच नव्हती. इंजिनाची संख्या वार्षिक दहा हजाराच्या आसपास असताना बाजारात ४० हजाराहून अधिक इंजिनं अधिकची साठून राहिलेली होती. या स्थितीत शंतनुरावांनी तिहेरी उपाययोजना आखली.
त्याप्रमाणे,
१ - बाजारात जी अधिकची इंजिनं साठून आहेत, त्याचा उठाव होईपर्यंत ३० अश्वशक्तीपर्यंतच्या डिझेल इंजिनांच्या आयातीला सरकारने बंदी घालावी. स्थानिक कारखाने जर देशातील मागणी पूर्ण करू शकले नाहीत, तरच इंजिन आयातीला परवानगी द्यावी.
२ – मध्यवर्ती सरकार आणि राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांना स्वत: किंवा सहकारी संस्थांमार्फत इंजिनं विकत घेण्यासाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात.
३ – सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या आणि जलदगती इंजिनांसाठी निर्यातीचे मुक्त परवाने देण्यात यावे.
शंतनुरावांनी ही तिहेरी उपाययोजना मांडली, त्यावेळी देशात सुमारे सहा कोटी रुपयांची इंजिनं पडून होती. या उपायांनी त्या मालाचा उठाव होण्यास मदत होणार होती. अशा अनेक देशव्यापी प्रसंगांमध्ये शंतनुरावांची समस्यामुक्त करणारी दृष्टी दिसून आलेली आहे.
त्या दिवसांत कारखान्यात हजारो इंजिनं पडून होती. उत्पादन मर्यादित करणे, खर्च कमीत कमी करणे याला पर्याय उरलेला नव्हता. कारखाना बंद पडेल, कामगार रस्त्यावर येतील अशी वेळ येऊन ठेपली होती. या संकटकाळी कारखाना बंद पडू नये यासाठी शंतनुरावांनी जीवापाड प्रयत्न केला. कामगारांना विश्वासात घेतलं, कारखाना कमी तास सुरू ठेवला. आणि अथक प्रयत्नांनी ते या संकटकाळातून सहीसलामत बाहेर पडले. या काळात शंतनुरावांना जाणवलं की या संपूर्ण उद्योगाची एक प्रातिनिधिक संघटना आता फार गरजेची आहे. मग त्यांनी १९५२ सालच्या अखेरीला ‘इंडियन डिझेल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ची स्थापना केली. सर्वानुमते शंतनुराव या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांनी दीर्घकाळ या संघटनेचं नेतृत्व केलं आणि अडचणीत सरकारशी संवाद साधून मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
या काळात अधिक उत्तम इंजिननिर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून इथल्या परिस्थितीत अधिक योग्य ठरतील अशी इंजिने बनवण्यात आली. किर्लोस्कर–पेटर ए.व्ही. १ सिरीज २ या इंजिनांची निर्मिती सुरू झाली आणि अधिक अश्वशक्तीच्या बी टाईप इंजिनांचे नमुने तयार करण्याचे प्रयत्नही सुरू झाले. १९५३ मध्ये बेअरिंग्ज, बुशिंग हे डिझेल इंजिनाचे भाग बनवायला सुरुवात झाली आणि किर्लोस्करांची बेअरिंग्ज डिझेल इंजिनांच्या अन्य कारखान्यातदेखील वापरली जाऊ लागली. कारखानदारी, उद्योगाचं काम अनेकरेषीय असतं, अनेकदा एका पातळीवरचा प्रश्न सुटतोय असं वाटेपर्यंत दुसरा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो. हे अनुभव घेत आपली वाढ साधणाऱ्या किर्लोस्कारांनाही या घडामोडींच्या काळातच आपल्या वितरणव्यवस्थेत अनेकानेक बदल करावे लागले. त्या बदलांच्या दरम्यान ऑइल इंजिन कंपनीचा स्वत:चा वितरण विभाग सुरू करण्यात आला. शंतनुरावांनी देशात आपले ५ विभागीय वितरक नेमले. या विभागीय वितरकांच्या माध्यमातून त्यांनी विक्रेते, उपविक्रेते असं जाळंच देशभर अगदी जिल्ह्या-जिल्ह्यात तयार केलं. या बदलामुळे मालाची उपलब्धता आणि नंतर देखभाल-दुरुस्ती अशी पूर्ण सेवा शेतकऱ्यांना मिळू लागली.
शंतनुरावांनी जगभर दौरे करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी आता जागतिक बाजारपेठ विस्तारणे ही बाब फार महत्त्वाची होती, एक नवा ध्यास आता त्यांना साद घालीत होता. विक्रीबरोबरच प्रत्येक देशात आपल्या इंजिनाची देखभालही नीट व्हायला हवी याकडे शंतनुरावांचं डोळ्यात तेल घालून लक्ष असे. परदेशी विक्रेते मिळवणे ही मोठी परीक्षा असते. नवीन माणसावर विश्वास ठेवताना फसू शकण्याची शक्यता गृहीत धरावी लागते. अशावेळी शंतनुरावांची तरबेज नजर, पूर्वानुभव कामी येई. विविध ठिकाणी दौरे करून गाठीशी भरपूर अनुभव जमा होत असताना शंतनुरावांच्या लक्षात आले की, अन्य देशतील कंपन्या फक्त इंजिन तयार करतात; त्यामुळे त्यांना इंजिनाला जोडण्यासाठी पंप दुसरीकडून आणावे लागतात. आपण इंजिन आणि पंप दोन्ही बनवतो, तर या दोन्हीचा एकत्र सेट करून वितरीत केला तर हे उत्पादन आकर्षक आणि सोयीचं ठरून मागणीत वाढ होईल. यामुळे ‘किर्लोस्कर’ हे नाव परदेशी चांगलंच रुजेल असं त्यांना वाटलं आणि शंतनुरावांच्या या विचाराला लक्षणीय यशही आलं.
शंतनुरावांनी उचललेलं या पुढचं आणखी एक यशस्वी पाऊल म्हणजे, आपल्या उत्पादनाचं नाव देश-विदेशात सर्वत्र होण्यासाठी त्यांनी प्रदर्शनांचा उपयोग केला. १९५५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’च्या फेडरेशनच्या वतीने पहिलं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनात ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन’चं भव्य दालन उभारलेलं होतं. या प्रदर्शनाला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि कृस्चेव्ह यांच्यासारखे परदेशी पाहुणे आदींनी भेटी दिल्या. शंतनुरावांनी परदेशी वितरण सुरू केल्यावर किर्लोस्करचे पंप इजिप्तची राजधानी कायरो इथे भरलेल्या, तसंच इंडोनेशिया इथे भरलेल्या प्रदर्शनातही ठेवले. यामुळे मलाया, फिलिपिन्स इथेही किर्लोस्करच्या इंजिनांना मागणी येऊ लागली. या सगळ्या धामधुमीत किर्लोस्करांनी २० अश्वशक्ती बी नमुन्याची इंजिनं तयार करून बाजारात विक्रीलाही आणली. शंतनुरावांनी सगळ्यांना बरोबर घेत, १९५२ साली ओढवलेली विपरीत परिस्थिती मोठ्या कौशल्याने, जिद्दीने सांभाळली आणि अडचणीतून बाहेर येताना किर्लोस्कर या नावाला आणि उत्पादनांना मोठी झळाळी प्राप्त करून दिली. १९५५ च्या अखेरीला ४० अश्वशक्तीची बी-४ नमुन्याची इंजिनं कारखान्यात तयार व्हायला लागली. आता इंजिनं केवळ पाण्याच्या पंपांसाठीच नव्हे तर जनरेटिंग सेट्स, कॉन्क्रीट मिक्सर्स, टार मिक्सर्स, एअर कॉम्प्रेसर्स यासाठीही वापरात येऊ लागली. १९५४ मध्ये कारखान्यांना चांगले दिवस यायला सुरुवात झाली आणि पुढची ४ वर्षे शांततेची, भरभराटीची ठरली. त्यामुळे या चार वर्षांत कंपनीने अनुक्रमे पाच, नऊ, नऊ आणि दहा टक्के डिव्हिडंड जाहीर केला.