महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुरावांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीच्या दरम्यान कितीतरी सहव्यवसायिकांशी आस्थेचे-मैत्रीचे संबंध जोडले होते. स्वतःचा नांदता संसार, जिवाभावाची मित्रमंडळी आणि भलं मोठं जिव्हाळ्याचं गणगोत होतं. सुहृद-स्नेही-सहकारी असा त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या एकसष्टीच्या निमित्त समारंभाचे आयोजन करण्यासाठी कितीक जण उत्सुक होते. शंतनुरावांना मात्र असं वाटत होतं की, जन्माला आलेला माणूस ६१व्या वर्षात पदार्पण करणारच. त्यात सत्कार करण्यासारखं काय! मात्र किर्लोस्करवाडीच्या मंडळींच्या प्रेमापुढे शंतनुरावांचं काही चाललं नाही आणि २९ मार्च १९६४ रोजी शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. महाराष्ट्राचे अर्थमंत्री बॅरिस्टर वानखेडे हे त्यावेळी अध्यक्षस्थानी होते. मराठा चेंबरचे अध्यक्ष दामुअण्णा पोतदार यांनी सन्मानचिन्ह अर्पण केलं. या कार्यक्रमात स. गो. बर्वे, शंकरराव ओगले, लालचंद हिराचंद, नानासाहेब परुळेकर अशा प्रथितयश उद्योगपतींनी जिव्हाळ्याने हजेरी लावली होती.
हा सोहळा पुण्याला अतिशय उत्साहात आणि थाटात साजरा झाला. १९६४ मध्ये आणखी एक सुवार्ता येऊन पोहोचली ती म्हणजे ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ या भारतातल्या सर्वोच्च संघटनेच्या उपाध्यक्षपदाची धुरा शंतनुरावांकडे आली होती. ही निवड विशेष ठरली, कारण भारतातल्या महत्त्वाच्या कार्यप्रवण, अग्रणी उद्योगपतींमध्ये शंतनुरावांचा समावेश झाला. शंतनुरावांच्या एकसष्टीच्या निमित्ताने आणखी एक अगदी आगळीवेगळी कल्पना मांडण्यात आली, ती म्हणजे परदेशातल्या २५ वितरकांना कारखान्याच्या खर्चाने भारतात येण्याचं निमंत्रण पाठवायचं. यातही दुहेरी विचारभूमिका होती. एकतर वितरकांना भारताच्या औद्योगिक प्रगतीची खात्री वाटेल आणि फक्त किर्लोस्करांच्याच नाही तर गोदरेज, प्रीमियम अशा मुंबईतल्या कारखान्यांना आणि ऑइल इंजिन तयार करणाऱ्या रस्टन, कूपर असे कारखाने सुद्धा त्यांना पाहता येतील अशी ती भूमिका होती. शंतनुरावांनी मराठा चेंबर मध्ये एक प्रदर्शनही भरवलं.
एकाच वेळी वेगवेगळ्या देशातल्या वितरकांना इथल्या कारखान्यांना, प्रदर्शनांना प्रत्यक्ष भेट देता आल्यामुळे वेळेची, त्रासाची आणि खर्चाची सुद्धा बचत झाली. इथल्या उद्योजकांना नवनव्या संधीचं एक प्रतल निर्माण झालं, खरं म्हटलं तर सतत उद्योगशील शंतनुरावांना ‘उद्योगस्य पुरुषस्य लक्षणम्’ ही उक्ती अगदी पुरेपूर लागू होती. कारण एकीकडे एकसष्टीचे सत्कार समारंभ सुरू असले तरी त्याचवेळी त्यांच्या मनात विविध कल्पना जन्माला येत होत्या. त्या प्रत्यक्षात कशा उतरवता येतील याचा आराखडाही तयार होत होता. या सगळ्या कौतुकाच्या, आनंदाच्या प्रवासात त्यांच्या मनात एका नवकल्पनेने उभारी घेतली. जसं परदेशामध्ये नव्या उद्योजकांना सल्ला आणि मार्गदर्शन लाभतं, तसंच आपल्याकडच्या उद्योजकांना सल्ला आणि मार्गदर्शन मिळावं म्हणून एखादी कन्सल्टन्सी सुरू करावी असं त्यांच्या मनात होतं. अर्थात भारतातली परिस्थिती आणि परदेशातील कन्सल्टन्सीचं स्वरूप निराळं होतं. शंतनुरावांच्याकडे असलेली माणसांची पारख करण्याची कला इथेही कामी आली आणि इंग्लंडहून ‘इंडस्ट्रियल मॅनेजमेंट’ शिकून आलेल्या द. वि. टिकेकर यांच्या रूपाने ही कन्सल्टन्सी प्रत्यक्षात उतरली. उद्योजकांसाठी असलेलं हे समुपदेशन किंवा मार्गदर्शन करण्यासाठी काही मुख्य सूत्रं निश्चित करण्यात आली होती. ‘ग्राहकांकडून पुन्हा पुन्हा काम मिळत राहिलं पाहिजे, त्यांनी मोजलेल्या किमतीच्या किमान काही पटीत तरी पैशाच्या रूपाने त्यांना मोबदला मिळाला पाहिजे आणि व्यावसायिक संस्था म्हणून कंपनीचं नाव झालं पाहिजे,’ अशा तऱ्हेच्या त्रिसूत्री वर आधारित असलेल्या कन्सल्टन्सीचं बीजारोपण भारतात शंतनुरावांनी पहिल्यांदा केलं. शंतनुरावांनी मराठा चेंबरचे अध्यक्ष म्हणून बारा वर्षे काम पाहिलं. त्यांच्या कारकिर्दीत दुसऱ्याच वर्षी चेंबरचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं झालं. मराठा चेंबरची इमारत उभी करणं, त्याकरता जागा घेणं आणि पुढे मागे चेंबरचं वाढतं काम दृष्टेपणाने पाहून त्याच्याकरता तजवीज करून ठेवणं हे शंतनुरावांच्या पुढाकाराने झालं. त्यांच्या एकसष्टीला एक लाख अकरा हजार एकशे अकराची मिळालेली सन्मानाची रक्कम त्यांनी चेंबरला देऊन टाकली. त्या निमित्ताने तिथल्या हॉलला शंतनुरावांचं नाव द्यावं, त्यांचे तैलचित्र लावावं या कल्पनेला त्यांनी विरोध केला. शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर हॉलला ‘लकाकी हॉल’ हे नाव देण्यात आलं.
पुणे आणि पुण्याच्या परिसरात हळूहळू उद्योगधंद्यांची वाढ होत होती. या औद्योगिक वाढीचं निरीक्षण करून, उद्योगांच्या गरजा, परिसर विस्तार यांचा अभ्यास करून, त्यानुसार औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याच्या दृष्टीने समिती नेमण्यात आली होती. या ‘गाडगीळ समिती’ने अहवालामध्ये औद्योगिकीकरणाची वाढ होण्यासाठी विरोध केला होता. पिंपरी-चिंचवड-भोसरी या भागात असलेलं औद्योगिक क्षेत्र चार हजार एकरांवरून फक्त दीड हजार एकरांवर आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार कायदाही तयार करण्यात आला. अर्थातच शंतनुरावांना हे सारं उद्योगधंद्याच्या हिताचं वाटत नव्हतं. त्यामुळे अतिशय रोखठोकपणे त्यांनी फक्त कागदोपत्री विरोध न नोंदवता या संदर्भात आत्ताच ठोस पावलं उचलली पाहिजेत म्हणून एक पुस्तिका तयार केली आणि त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट मतं मांडली. उद्योगधंद्यांचा विस्तार रोखणाऱ्या समितीच्या विधानांचं अभ्यासपूर्ण आणि सडेतोड खंडन केलं. शेवटी या समितीच्या मंडळावर मराठा चेंबरला प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्यांच्या योग्य वेळी केलेल्या कृतीमुळे पुणे परिसरातल्या औद्योगिक वाढीला ओहोटी लागली नाही.
शंतनुराव स्पष्टवक्ते, द्रष्टे आणि एखाद्या गोष्टीत संपूर्ण अभ्यासानिशी आणि चिकित्सेनिशी एकेका मुद्द्याचा विचार करणारे होते. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी कारखानदारांनी, उद्योगधंद्यांनी या निवडणुकांसाठी आर्थिक पाठबळ देताना कोणती पथ्यं पाळली पाहिजेत यासाठी एक टिपण तयार केलं. उद्योजकांचं या संदर्भात काय धोरण असलं पाहिजे हे मुद्देही लिहून काढले. एवढंच नाही तर ते रीतसर छापून घेऊन हजारो व्यापारी आणि कारखानदारांना पाठवले. ही कृती म्हणजे एका दृष्टीने राजकीय पक्षाचा आणि राजकीय पुढाऱ्यांचा रोष पत्करणं होतं, पण यापुढे उद्योजकहित जास्त महत्त्वाचं होतं.
व्यवसायाच्या निमित्ताने ठिकठिकाणी हिंडताना देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची भूमिका, स्थिती याविषयी अतिशय जागरुकपणे स्वत:ची निरीक्षणं शंतनुराव नोंदवत असत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यांनी ती गोष्ट स्वीकारली नाही. या वृत्तीमुळे आपल्याकडे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या भ्रामक कल्पनांशी त्यांचा संघर्ष झाला. सामाजिक चालीरीती, राजकीय विचारसरणी आणि आर्थिक व्यवहार यांचं नातं गुंतागुंतीचं असतं. भारतात नैसर्गिक साधनांची आणि मनुष्यबळाची कमतरता होती म्हणून नाही, तर त्यांचा उपयोग उत्पादकता वाढवण्यासाठी आपण केला नाही म्हणून आपण गरीब राहिलो, असं आपला इतिहास सांगतो. राजकारणामध्ये समाजाला दिशा देणारी, आर्थिक बळ वाढवणारी नीती आणि कृती याची उणीव कायम भासत राहिली. आजही त्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही, असं शंतनुराव म्हणत असत. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणतात, “१९७७ पासून आपलं राजकीय नेतृत्व स्वार्थी, भ्रष्ट, आणि दूरदृष्टीचा अभाव असणारं आहे. गटबाजी बोकाळली आहे. त्यामुळे यांना नेते का म्हणावं असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. वर्तमान परिस्थितीतही ज्या गोष्टी पूर्णपणे गैरलागू आहेत, अशा गोष्टींची उजळणी करण्यापलीकडे आपल्याकडचा समाजवादी विचार जात नाही. गांधीवादाची किंवा एतद्देशीय समाजवादाची कास धरून आपल्याला आर्थिक विकासाचा दर वाढवता आला नाही आणि सामाजिक न्यायही साधता आला नाही. उत्पादनाचं आधुनिक तंत्रज्ञान, नवी समाजरचना आणि जनतेच्या वाढत्या गरजांच्या रेट्यामध्ये जे युग काळाच्या उदरात केव्हाच गडप झालंय ते म्हणजे या दोन विचारसरणी आहेत.” शंतनुराव म्हणतात, “राष्ट्रवादाचं महत्त्व मी कमी लेखत नाही. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला फाटा द्यावा असंही मी म्हणत नाही. मात्र रचनात्मक जोड न देता केवळ भावनात्मक स्तरावर ही दोन उच्च मूल्यं कवटाळून बसणं कुचकामी आहे. सर्व देश, विशेष करून विकसनशील देश मानवी दुर्बलतेला बळी पडून अशा निरुपयोगी भावनात्मकतेच्या आहारी केव्हा ना केव्हा जातात, हे कट्टर राष्ट्रवाद्यांना सुद्धा मान्य व्हावं. अतिरेकी राष्ट्रवाद किंवा कालबाह्य झालेली समाजवादी खुळं दीर्घकाळ सुरू राहिली तर देशाच्या अर्थकारणाची वासलात लागते आणि गरिबीत भर पडते.” एक भारतीय उद्योजक म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना दिसलेल्या, जाणवलेल्या गोष्टी त्यांनी स्पष्टपणे मांडल्या.