महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
उत्तम माणसांची नेमकी निवड करणे, त्यांच्या गुण-कौशल्यांना पूर्ण वाव देणे, आपल्या माणसांवर पूर्ण विश्वास ठेवणे, आवश्यक त्या गोष्टी त्या त्या व्यक्तींकडून परिपूर्ण पद्धतीने करून घेणे ही सगळी माणूसकेन्द्री वैशिट्यं शंतनुरावांकडे कमालीची होती. आपल्या उत्पादनाविषयी त्यांना नितांत विश्वास असायचा, कारण त्या उत्पादनांची तपासणी पुरेशा बारकाईने झालेली असे. उदाहरण द्यायचं झालं तर, इंजिनाच्या टिकाऊपणाची चाचणी करण्यासाठी इंजिन अखंड सुरू ठेवलं जाई. अखंड सुरू असलेल्या या इंजिनाचा कोणता भाग आधी मोडतो ते बघून त्यात सुधारणा केल्या जात. दर्जा उत्तम असेल तरच ग्राहकांचं समाधान होईल, यावर आणि त्यासाठी कारखान्यात सतत संशोधन सुरू राहिलं पाहिजे यावर शंतनुरावांचा भर असे, हा त्यांच्या कामातील अविरत ध्यास होता, तीच त्यांची प्रेरणा होती. कच्चा माल उत्तम दर्जाचा आणि मशिनिंग पण उत्तम दर्जाचं या दोन्हीवर शंतनुरावांचा कटाक्ष असल्यामुळे उत्पादनही अर्थातच उत्तम दर्जाचं होई. ग्राहकांच्या हिताविषयी प्रामणिक तळमळ हा महत्त्वाचा भाग ‘किर्लोस्करां’च्या अर्थात शंतनुरावांच्या यशस्वी कार्यशैलीचा, विक्रीव्यवस्थेचा पाया होता.
ग्राहकांची गरज ओळखून उत्पादन तयार करणे हे बाजारपेठेचं किंवा मार्केटिंगचं मूलतत्व प्रथम लक्ष्मणरावांनी ओळखलं होतं. जमिनीत खोल जाणारा, वजनाला हलका आणि सुटसुटीत लोखंडी फाळ बनवून शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पाया लक्ष्मणरावांनी घातला तो याच सजग नजरेमुळे. हाच वारसा शंतनुरावांनी पुढे जोरकस पद्धतीने चालवला. हा वसा पुढे नेताना शंतनुरावांनी आपल्या ३००-४०० कामगारांच्या कारखान्याचा विस्तार देशातच नव्हे तर परदेशीही केला. डिझेल इंजिनांची परदेशी निर्यात होऊ लागली, ‘किर्लोस्कर म्हणजे विश्वास, किर्लोस्कर म्हणजे दर्जाची हमी’ हा लौकिक आपल्या मुलाने जगभर नेला आहे हे वैभव पाहण्याचं भाग्य लक्ष्मणरावांना पुरेपूर लाभलं. शंतनुरावांनीही ‘एकदा नाव झालं की काहीही खपवून घ्यायचं’ ही वृत्ती कधीही जवळ केली नाही आणि आपल्या समूहातील कोणत्याही माणसामध्ये, आपल्या संघटनेत शिरू दिली नाही.
या काळात लक्ष्मणराव पुण्यात वास्तव्याला आलेले होते. यंत्रविश्वाच्या प्रेमानंतर त्याचं मन ज्या शेतीशी जुळलेलं होतं त्या शेतीत वेगवेगळ्या प्रयोगात ते आता रमलेले होते. आपली मुलं, पुढे नातवंडं यांच्या रंध्रांत आपली कारखानदारी किती असोशीने उतरली आहे हे ते आता समाधानाने पाहत होते. आता १९५६ सालही अर्धअधिक संपत आलं होतं. त्या वर्षीच्या १ ऑगस्टला नदीला महापूर लोटला. लक्ष्मणराव नेहमीप्रमाणे शेतावर गेले. पाहतात तो आपल्या भातशेतीत कंबरभर पाणी. शेतीवर पित्याच्या ओढीने प्रेम करणारे लक्ष्मणराव ते दृश्य बघून मटकन खालीच बसले. ‘मला उठताच येत नाहीये, माझी कंबर मोडली’ असं लक्ष्मणराव म्हणाले आणि त्यांना डॉ. कानिटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या दुखण्यातून ते लवकरच बाहेर आले आणि ७ ऑगस्टला पुन्हा कामाकडे नजर टाकावी म्हणून शेतावर गेले आणि तिथेच त्यांच्या छातीत कळ आली. शेतावरून त्यांना बेशुध्द अवस्थेत घरी आणण्यात आलं. लक्ष्मणरावांच्या या गंभीर आजाराची वार्ता कळली आणि सगळी नातेवाईक मंडळी पुण्याकडे धावली.
लक्ष्मणरावांच्या या आजारात शंतनुरावांना परदेशी जाण्याची निकड समोर आली. त्यांच्या मनाची अवस्था अवघड होऊन बसली. त्यांना लक्ष्मणरावांनीच धीर दिला आणि सांगितलं की, ‘तू खुशाल जा. तू परत येईपर्यंत मी खडखडीत बरा होतो.’ २५ सप्टेंबरपर्यंत लक्ष्मणराव आजाराशी झगडा करीत होते. डॉक्टरांची तपासणी, औषधं, सेवा-शुश्रूषा सारं काही सुरू होतं. मात्र २५ तारखेच्या रात्री त्यांना पुन्हा एक मोठा हृदयविकाराचा झटका आला. ‘आता नाही शंतनु भेटत’ असं म्हणून त्यांनी मान टाकली. डॉ. मोदी यांनी फार प्रयत्न केले पण त्याला यश यायचं नव्हतं. लक्ष्मणराव थोड्या वेळाने त्यांना म्हणाले, ‘आता तुम्ही जा. उद्या सकाळी गीता घेऊन या.’ दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर, सकाळी ६ च्या सुमाराला लक्ष्मणरावांनी शेवटचा श्वास घेतला. शंतनुराव आणि लक्ष्मणरावांची भेट व्हायची नव्हती. लक्ष्मणरावांच्या निधनानंतर किर्लोस्कर कारखाने तर बंद ठेवले होतेच, पण पुण्यातील अनेक कारखाने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बंद ठेवण्यात आले. लक्ष्मणरावांचे अंतिम संस्कार किर्लोस्करवाडीला करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वाडीत मोठी प्रचंड अंत्ययात्रा निघाली. वाडीच्या प्रवेशद्वाराजवळ राधाबाईंच्या पुतळ्यापासून थोड्या अंतरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. शंतनुरावांना परत यायला त्या नंतर दोन आठवडे लागले. लक्ष्मणरावांच्या निधनानंतर दिवसकार्य, जेवणावळी न करता, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या चार मुलांनी मिळून पलूस इथे लक्ष्मणरावांच्या नावे विद्यालय स्थापन करून, लक्ष्मणरावांनी पाहिलेल्या प्रगतीच्या स्वप्नाला एक नवी दिशा दिली. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाने ‘किर्लोस्कर प्रतिष्ठान’ची स्थापनाही करण्यात आली. लक्ष्मणराव किर्लोस्कर या हाडाच्या यंत्रप्रेमी कारखानदाराचा जीवनप्रवास एका दृष्टीने पूर्णत्वाला गेला आणि त्याच वेळी ध्येयाने झपाटलेल्या कारखानदार मुलांच्या माध्यमातून अधिक तेजस्वी होऊन झळाळता राहिला.
किर्लोस्कर मंडळी कारखानदारीबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेनेही परिपूर्ण होती. शंतनुरावांच्या मनात सैन्याविषयी फार जिव्हाळा होता. माजी सैनिकांसाठी जर कुणी हजार-दीड हजार रुपयांच्या अपेक्षेने निधी मागायला आला, तर शंतनुरावांनी दिलेला निधी पाच हजाराच्या वर असायचा. शंतनुरावांनी आपल्याकडे सैन्यातील निवृत्त मंडळींना नोकरीवर घेण्यात विशेष रस दाखवला तोही अशाच भूमिकेतून. एक तर ही मंडळी कमालीची शिस्तीची असतात आणि मध्यम वयात माणसावर बेकारीचा प्रसंग ओढवतो असं दिसलं तर नवीन मंडळी सैन्यात दाखल होण्याची उत्सुकता कशी दाखवणार असा त्यांचा मुद्दा असे. यावर उपाय म्हणून उद्योगांनी पुढे होऊन हातभार लावला पाहिजे ही त्यांची कृतीशील भूमिका होती. १९५८ सालात किर्लोस्कर कारखान्याच्या सहाय्याने असाच आणखी एक सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाला. तो म्हणजे, समाजकल्याण यंत्र कामगार महिला सहकारी कारखाना. भारत सरकारच्या सोशल वेल्फेअर बोर्डाच्या वतीने तो सुरू करण्यात आला. यात गरीब, गरजू स्त्रियांना काम देण्यात येऊ लागलं. शंतनुराव महाराष्ट्र बँकेचे संचालक म्हणून १९४६ सालापासूनच कार्यरत होते. १९५५ मध्ये स्टेट बँकेवर संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५८ मध्ये ते ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले. किर्लोस्करांच्या उत्पादनांना परदेशी बाजारपेठेतही चांगली मागणी आणि नाव मिळत होतं. त्यामुळे ‘अखिल भारतीय इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’चं अध्यक्षपद शंतनुरावांकडे चालत आलं. शंतनुरावांचे चरित्रकार सविता भावे म्हणतात, ‘शंतनुरावांनी निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने सरकारला बहुमोल मदत केली. आपली यंत्रे परदेशी पाठवायची म्हणजे अनेक तऱ्हेची पूर्वतयारी करावी लागे व फार मोठ्या चढाओढीला तोंड द्यावे लागे. वेळेला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत यंत्रं विकावी लागत. शंतनुरावांनी या साऱ्या परिस्थितीशी सामना दिलेला असल्याने या कामी सरकारला मदत करण्यासाठी त्यांच्याइतकी दुसरी योग्य व्यक्ती नव्हती. देशाची परकीय चलनाची परिस्थिती इतकी गंभीर होती की निर्यातीपासून जितका लाभ उठविता येईल तितका मिळविणे अत्यावश्यक होते. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून शंतनुरावांनी केलेलं काम देशाच्या आर्थिक इतिहासात ठळकपणे नोंदवलं जाईल.’
शंतनुरावांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले गेले. त्या प्रत्येक उद्योगाचा विस्तार आणि लौकिक शंतनुरावांच्या लौकिकाला साजेसा असाच होत राहिला. ‘आकांक्षा पुढती, गगन ठेंगणे’ म्हणणाऱ्या शंतनुरावांनी इंग्लंडच्या ‘ब्रूम अँड वेड’शी करार केला आणि १९५८ साली ‘किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी’ अर्थात ‘केपीसी’ची स्थापना पुण्यात केली. एअर कम्प्रेसर्स आणि हाताने वापरण्यासारखी अवजारं केपीसीमध्ये तयार होऊ लागली. पुढे नव्या युगात तर कारखान्यात मोठमोठे कम्प्रेसर्स, ५२५ टनांपर्यंतचे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचे यंत्रसंच, डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांना पूरक अशा ट्रान्स्मिशन गिअर्सची निर्मितीही सुरू झाली. कंपनीने ‘अमेरिकन क्लासिफिकेशन सोसायटी’ला लागणारे मशीन गिअर्स तयार केले. रेल्वे इंजिन आणि जहाजामध्ये लागणाऱ्या ‘अल्को’ बनावटीच्या ‘ट्रान्स्मिशन्स’ची निर्मितीही ‘केपीसी’ने केली. ताबडतोब बर्फ बनवणारा यंत्रसंच, मालवाहतूक विमानाचं वातानुकूलन करणारी यंत्रणा आणि उतारूंची ने-आण करणारी वाहनंही केपीसी बनवू लागली. या प्रवासाविषयी आणि या काळातील औद्योगिक प्रगतीबाबत स्वत: शंतनुरावांनी लिहिलं आहे,
‘साठचा काळ आमच्या दृष्टीने विस्ताराचा आणि आमच्या कामात विविधता आणण्याचा होता. आम्ही मालाच्या निर्यातीतही वाढ केली. जपान वगळता ‘कोयल’ हा आशियातला सर्वात मोठा डिझेल इंजिन निर्मितीचा कारखाना होता. शिवाय निर्यातही सर्वाधिक होती. परंतु मी समाधानी नव्हतो, माझं लक्ष्य आणखी मोठं होतं. २५ जुलै ६१ रोजी आम्ही ‘सोसिये अॅग्रिकल्चर ग्रॉसहॅन्स ऑलियर मरेप, सोसिये सिव्हील देतुद’ पॅरिस या संस्थेशी करार केला. त्यानुसार सोळा अश्वशक्तीपासूनची ‘अग्रोम’ ही एअरकुल्ड इंजिनं ‘कोयल’मध्ये तयार करायची असं ठरलं. त्यांच्या ४५ अश्वशक्तीच्या इंजिनाचं आरेखन ‘कोयल’ने पश्चिम जर्मनीच्या ‘फरिमन डिझेल’कडून काही अटींवर विकत घेतलं. भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किर्लोस्करनिर्मित विविध इंजिनांचा व्यापक वापर व्हावा या उद्देशाने अशी निरनिराळ्या प्रकारची इंजिनं मी निवडली. सहकार्य करारांवर सह्या केल्या. इंजिननिर्मितीचे परवाने घेतले. स्वत:च्या जीवावर अशी इंजिनं तयार होण्यातला वेळेचा, पैशाचा, श्रमांचा अपव्यय मला टाळायचा होता. सहकार्यामुळे कमीतकमी वेळात आम्हाला ही निर्मिती शक्य होती. आम्हाला जेव्हा जेव्हा यंत्रांच्या आराखड्याची गरज भासली, तेव्हा तेव्हा मी ते रोख एकरकमी आणि कोणत्याही अटींची बंधनं न स्वीकारता विकत घेतले. जे जे उपयुक्त होतं, विक्रीसाठी योग्य होतं आणि ज्याची निर्मिती वाजवी किमतीत शक्य होती त्या सगळ्याचा मी अंगीकार केला.’
किर्लोस्कर कारखान्यांचा, विविध उद्योगांचा सर्वतोपरी विस्तार करण्याच्या या प्रवासात शंतनुरावांनी लहान-मोठ्या अनेक उद्योजकांना वेगवेगळ्या कारखान्यांच्या उभारणीसाठी मोठं साहाय्य केलं. उद्योजकतेच्या माध्यमातून शंतनुरावांनी अपरंपार देशहित साधलं. देशाची यांत्रिक, आर्थिक आणि जगभरातील वाढता नावलौकिक अशा तिहेरी पातळ्यांवर शंतनुरावांनी फार मोठी प्रगती साधली. शंतनुराव किर्लोस्कर म्हणजे देशाला औद्योगिकदृष्ट्या नव्या वाटा खुल्या करून देणारे एक पथदर्शी आणि द्रष्टे उद्योजक होते. मराठी माणसावर तर त्यांचं अपरंपार ऋण आहे. मराठी औद्योगिक वाटचालीतील ही सारी सोनेरी पानं आहेत.