महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
‘किर्लोस्कर’ हे नाव जगद्विख्यात झालं ते शंतनुरावांच्या अविरत आणि भगीरथ प्रयत्नांनी. आपला कारखाना, उत्पादनं यांचा दर्जा सर्वोत्तम राहावा आणि एकूणच व्यवसाय वाढता राहावा यासाठी त्यांनी स्वत:ला या कामाप्रती संपूर्णपणे समर्पित करून घेतलं. जगभरात कुठेही मोठ्या पातळीवर उभे राहणारे व्यवसाय अशा सर्वस्व समर्पणाला दुसरा कोणताही पर्याय शिल्लक ठेवत नाहीत. या यज्ञात रोजच्या रोज प्रचंड कष्टांची आहुती पडावीच लागते. एखादा कारखाना सुरू केला, त्या कारखान्याच्या यशाला सुरुवात झाली, कामाला गती मिळाली आणि मग तो तहहयात विनाअडचणींचा, विनाप्रश्नांचा सुरूच राहिला असं कधीच आणि कुठेच घडत नाही. प्रत्यक्ष कारखाना सुरू करताना गृहीत असलेल्या अडचणी आणि प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर उभी राहणारी अनपेक्षित संकटं याला शंतनुरावदेखील अपवाद नव्हते. शंतनुरावांसाठीसुद्धा नव्याने स्वतंत्र कारखाना उभा करणं हे मोठं आव्हानच होतं आणि खरी परीक्षा किंवा खरी कसोटी त्यापुढेच सुरू होते याचीही त्यांना प्रगाढ जाणीव होती. संपूर्ण सजगता, सखोल अभ्यास, झोकून देऊन काम करणे आणि काटेकोर नियोजन हा शंतनुरावांच्या व्यक्तित्वाचा गाभा होता. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना अथ ते इति गोष्टींचं नियोजन करावं लागतं याचं भान त्यांना होतंच, त्यातही दुसऱ्यावर विसंबून राहणं हा विचार त्यांना जराही मानवणारा नव्हता, त्यामुळे सुरुवातीपासून संपूर्ण समर्पणाने, जागरूकतेने आणि सद्सद्विवेकाला जागून शंतनुराव खंबीरपणे उभे होते.
कारखान्याच्या प्रारंभी तर प्रत्येक बारीकसारीक गोष्ट शंतनुराव जातीने लक्ष घालून पाहत. कधी ते तांत्रिक विभागात एखाद्या यंत्राच्या एखाद्या सुट्या भागाविषयी कुणाशी चर्चा करत असत, कधी मशीन शॉपमध्ये अभियंत्याशी बातचीत करताना दिसत, तर कधी कामगारांना मशिनिंगमधले बारकावे मुद्दे समजावून देत असत. काही माल नाकारला गेला असेल तर ते आवर्जून वेळ काढून त्या मालाची तपासणी करीत. कारखान्यातील सगळ्या विभागाचं काम परस्परपूरक असंच होईल आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा जागच्या जागी निकाल लागेल याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असे. या स्वभावामुळे शंतनुराव त्यांचा जवळपास सगळाच वेळ कारखान्यात घालवीत. सुरुवातीला अभियंते, व्यवस्थापकीय कर्मचारी आणि प्रत्यक्ष काम करणारे कामगार असे सगळे मिळून ३०० लोक कारखान्यात काम करत होते. संख्या मर्यादित असल्यामुळे सगळेजण एकमेकांना नावाने ओळखत असत. स्वतः अतिशय उत्साही आणि ऊर्जादायी असलेल्या शंतनुरावांचा आग्रह असायचा की, प्रत्येकाकडून त्याला नेमून दिलेलं काम उत्तम व्हायला हवं. शंतनुरावांच्या प्रभावी व्यक्तित्वामुळे ही ऊर्जा, ही प्रेरणा सर्वांमध्ये वाहती झालेली होती.
कारखान्यातील उत्पादनाच्या बाबतीत ‘संपूर्ण स्वावलंबन’, ‘देशी बनावटीची उत्पादने-यंत्रे’ हे शंतनुरावांचं ध्येय होतं. लवकरात लवकर सर्व भाग इथेच तयार व्हावेत यासाठीची निश्चित अशी योजना तयार होती, मात्र त्या काळात देशी इंजिन तयार करण्यासाठी त्याचे काही भाग - म्हणजे ३० टक्के भाग इंग्लंडमधून मागवावे लागत होते. त्या आयातीत मुख्यत: फोर्जिंग्ज, काही गुंतागुंतीची कास्टिंग्ज आणि फ्युएल इंजेक्शनची उपकरणे या गोष्टी होत्या. शंतनुराव आपल्या उत्पादनाकडे फार बारकाईने लक्ष देऊन होते, कारण जरी देशी बनावटीची इंजिनं बनायला लागली होती, तरी अजूनही परदेशी इंजिनं आयात होत होतीच. त्या स्पर्धेत टिकून राहणं आवश्यक होतं. त्यामुळे आपल्या इंजिनात जराही दोष राहू नये यासाठी शंतनुराव कमालीचे जागरूक असत. एकेक पाऊल पुढे टाकत शंतनुरावांनी ‘फोर्जिंग्ज, गुंतागुंतीची कास्टिंग्ज, फ्युएल इंजेक्शनची उपकरणे’ यापैकी प्रत्येक भाग आपल्या कारखान्यात तयार करायला किंवा दुसऱ्या देशी कारखान्याने तो बनवावा यासाठी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळे आजवर जी ३० टक्के आयात होती, ती थोड्याच महिन्यात २० टक्क्यांवर आली. स्वत:ची फौंड्री नसल्यामुळे कास्टिंग्जकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहणं भागच होतं. शंतनुरावांनी मग या गोष्टी म्हैसूर किर्लोस्कर, हरिहर आणि किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्करवाडी इथून मिळवण्याची व्यवस्था केली. उत्पादनाइतकाच ‘जाहिरात-ग्राहकांपर्यंत पोहोचणे’ हा विषयही महत्त्वाचा असतो याची पूर्ण जाण असणाऱ्या शंतनुरावांनी ‘प्रत्यक्ष यंत्राच्या उत्पादना’मध्ये जातीने लक्ष घातलंच, पण १९४८-४९ सालापासून यंत्रासाठीच्या जाहिराती, छपाई, प्रसिद्धी या कामांकडेदेखील बारकाईने पाहायला सुरुवात केली. मजकुरापासून ले-आऊटपर्यंत सगळ्या टप्प्यांवर ते लक्ष देत. त्यांना स्वतःला चित्रकलेमध्ये गती असल्यामुळे कारखान्याच्या वार्षिक कॅलेंडरवर हाती काढलेली चित्रं असावीत असा त्यांचा आग्रह, हट्ट असे. या कामात बारकाईने लक्ष द्यायला त्यांनी जवळपास १२ वर्षं वेळ काढला.
‘किर्लोस्कारां’साठी महत्त्वाचं ठरलेलं वर्ष म्हणजे साल १९५०. या वर्षी बी.ओ.इ.एक्स. कंपनीचे अध्यक्ष ए.पी.गुड भारतात आले होते. त्यांना कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाच्या मीटिंगसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांनी ब्रिटनमधल्या कारखानदारीविषयी पूर्ण माहिती दिली आणि ‘कुठल्याही कारखान्याने बहुतेक सगळ्या गोष्टींमध्ये स्वावलंबी व्हायला हवं’, असा सल्लाही दिला. याच वर्षी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑइल इंजिनच्या कारखान्याला भेट दिली. स्वतंत्रपणे भारतीय बनावटीची यंत्रनिर्मिती करणाऱ्या कंपनीची प्रगती पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी लक्ष्मणरावांची देखील आवर्जून भेट घेतली. कारखान्याच्या उभारणीला आणि त्यामागे असलेल्या भक्कम विचारसरणीला अधिक दृढ करण्यात जर्मन इंजिनियर फ्रांझ स्टॉक यांची खूप मदत झाली. ‘जिथे आपण कारखाना उभा करतोय तिथली स्थानिक परिस्थिती, मानसिकता, कामगारांची उपलब्धता ध्यानात घेऊन श्रमावर आधारित अशी रचना करावी,’ असं फ्रांझ यांचं म्हणणं होतं. १९५०-५१ मध्येच कंपनीने डिव्हिडंड जाहीर केले जी विशेष गोष्ट होती. त्यावेळी कंपनीचे उत्पादन सुरू होऊन जेमतेम दोन वर्षंदेखील झाली नव्हती.
कारखाना हाच ध्यास असलेले शंतनुराव कारखाना सुरू होण्याच्या वेळेत, म्हणजे सकाळी ७.४५ ला कारखान्यात हजर असत. मिळून-मिसळून राहणे हा त्यांचा इतका सहजगुण होता की ते सगळ्या अधिकारी मंडळींबरोबर एकाच टेबलावर बसून डबे खात असत. संध्याकाळी पाच नंतर मात्र कुणाला थांबण्याची सक्ती नसे. कारखान्यात बंडोपंत सरपोतदारांचं एक कॅन्टीनसुद्धा होतं. एकंदरीत किर्लोस्करवाडीच्या वातावरणाची आठवण व्हावी अशीच कारखान्यातली सगळी पद्धत होती. या कॅन्टीनमध्ये महिन्यातून एकदा ‘समन्वय भोजन’ होत असे. त्यावेळी ऑफिसर्स, कामगार यांच्यासह शंतनुराव जेवण घेत. लक्ष्मणरावदेखील या पंक्तीला असायचे. बऱ्याच वेळेला शंतनुराव आणि यमुताई अगदी कामगारांच्या पंक्तीला जेवायला खाली बसलेले असत आणि हे दृश्य कमालीचं आश्चर्यकारक वाटत असे.
या काळात शंतनुराव पुण्यात होते आणि पुण्यातल्या कामाबरोबर ते किर्लोस्करवाडीच्या तांत्रिक भागात लक्ष घालत होते. किर्लोस्करवाडीला शंकरभाऊ आणि प्रभाकर हे दोघेही कारखान्याच्या कामात पूर्ण लक्ष देत होते, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता, तरी त्या दोघांपैकी कुणीही तांत्रिक विषयात तज्ञ नव्हते. ती बाजू शंतनुराव पुण्यातून सांभाळत होते. गांधीजींची हत्या झाल्यावर दक्षिण महाराष्ट्रात जाळपोळीची जी लाट आली, त्यातून शंकरभाऊ आणि प्रभाकर या दोघांनी कारखान्याचा बचाव केला तो, जनसंपर्कामुळेच. या दंगलीला दहा दिवस झाल्यावर मद्रास रेजिमेंट संरक्षणासाठी आली आणि तिने व्यवस्था हातात घेतली. हा दंगा आटोक्यात येतो न येतो तोपर्यंत कारखान्यात संपाला सुरुवात झाली. कामगारांनी त्यांच्या मागण्या लावून धरल्या, नवे प्रश्न समोर उभे राहिले. चर्चा संवाद अशा सनदशीर मार्गाने प्रश्न सुटेनासा झाला. संपाचा जोर एवढा वाढला की कारखानाच बंद करावा लागला. महिनाभर होत आला तरी संप मिटण्याची चिन्हं नव्हती. त्यानंतर हा तंटा ट्रायब्यूनलकडे गेला. या तंट्याचा निकाल लागला तेव्हा ‘तोपर्यंत अमर्याद वाढलेल्या महागाई भत्त्याचं प्रमाण खाली यावं’ ही कंपनीची मागणी मान्य झाली. तोपर्यंतच्या स्थितीत ‘मूळ पगार २६ रुपये तर महागाई भत्ता १५० रुपये’ अशी वेळ आली होती. या निवाड्यामुळे प्रथमच कारखान्यासाठी वेतनश्रेणी निर्धारित करण्यात आल्या. संपाच्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं होतं.