महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
कारखानदार किर्लोस्कर, त्यांच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम, दर्जा दीर्घकाळ टिकून राहण्याची हमी आणि त्यांच्या उत्पादनांची परदेशी होणारी निर्यात या सर्व गोष्टी एका वळणावर अवघ्या देशासाठी प्रतिष्ठेची गोष्ट होऊन गेली. चमत्कार वाटावं असं हे किर्लोस्कर समूहाचं चित्र साठच्या दशकातच तयार झालं याचं कारण शंतनुरावांची ‘काळ, संधी आणि योग्य कृती’ची पारख करून पाऊल उचलण्याची क्षमता. ज्या काळात भारतीयांना यंत्रनिर्माते म्हणून जगात कुणीही ओळखत नव्हते, परदेशी बाजारपेठेत जम बसवणे ही महाकठीण-जणू काही अशक्यप्राय गोष्ट होती, त्या काळी किर्लोस्करांनी परकीय बाजारपेठेत आपला लौकिकासह पक्का जम बसवला. ‘किर्लोस्कर म्हणजे उत्तम माल आणि कायमस्वरूपी टिकणारा दर्जा’ ही ओळख लक्ष्मणराव आणि शंतनुरावांनी महत्प्रयासाने मिळवली होती. पिता-पुत्रांची आणि किर्लोस्कर भावंडांची दीर्घकाळाची उद्योगसाधना त्यामागे होती. परदेशस्थ मंडळींना आपल्या उत्पादनांची माहिती व्हावी, आपल्या मालाच्या दर्जाची खात्री वाटावी याकरिता शंतनुरावांनी एक आगळे पाऊल उचलले, ते म्हणजे परदेशी लोकांनी आपले कारखाने पाहावेत यासाठी त्यांना आपल्याकडे निमंत्रित केलं. शंतनुरावांच्या मते, एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्यापेक्षा ही गोष्ट सोपी आणि कमी खर्चाची होती. ती कल्पना अपेक्षेप्रमाणे फलद्रूप झाली. किर्लोस्कर उत्पादनं केवळ भारतातच बनत नाहीत, तर ती अरमानी, मलेशिया, फिलिपिन्स इथेदेखील बनतात हे पाहून परदेशी पाहुणे थक्क झाले.
‘शंतनुराव म्हणजे औद्योगिक क्षेत्रात जोमाने पुढे येऊ लागलेल्या नव्या भारताचे प्रतीक’ असा सन्मानोद्गार मनुभाई शहांनी व्यक्त केला होता. हे शब्द शंतनुरावांच्या कार्याचा उचित प्रत्यय देणारे आहेत. स्वत: शंतनुराव भारतीय उद्योग क्षेत्राविषयी जे तत्त्वज्ञान मांडत, त्यात ते नेहमी म्हणत,
‘उद्योग वाढून उत्पादन सुधारल्याशिवाय बेकारीची समस्या सुटणार नाही.’ आपल्या तीक्ष्ण दृष्टीने नोंद घेतलेल्या सर्व बाबी अत्यंत स्पष्ट शब्दात मांडताना ते जराही कचरत नसत. शंतनुरावांचं ठाम मत होतं की, ‘आपला देश शेतीप्रधान असला तरी तिच्यावर किती वजन टाकता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. कालांतराने शेतीही धंद्याच्या हिशेबानेच करावी लागेल आणि तेव्हा पुष्कळ माणसे शेतीतून बाहेर जावी लागतील. ती माणसे कारखानदारीत सामावायला हवीत. त्यासाठी कामाच्या जबाबदाऱ्या शिकायला हव्यात, कामाचे तास वाढायला हवेत. स्थानिक लोकांनी औद्योगीकरणाबाबत उत्साह दाखवला नाही तर ते घडणार नाही.’
उद्योजकतेच्या वाटेवर भारताला पुढे नेण्याविषयी शंतनुरावांची भूमिका समजून घ्यायची असेल तर, त्यांच्या ‘निवडुंग आणि गुलाब’ या आत्मचरित्रात त्यांनी अत्यंत परखडपणे व्यक्त केलेली प्रांजळ आणि अनुभवाधारित मतं नीटसपणाने समजून घ्यावी लागतील. आपल्या आयुष्याची गाथा सांगून झाल्यावर हाती आलेलं संचित नव्या पिढीसमोर ठेवताना ते म्हणतात,
“माझ्यापाशी आता अर्ध्या शतकाच्या कामाचा अनुभव आहे. विविध दिशांनी पुढची वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेला औद्योगिक क्षेत्रातला भक्कम पाया आपण घातलेला आहे, याबद्दल मला खात्री आहे. ते साध्य करायचं असेल तर राजकीय बेड्या मात्र दूर कराव्या लागतील. भावना, राष्ट्रवाद, राजकीय विचारसरण्या या गोष्टींना नव्या औद्योगिक तंत्रज्ञानामध्ये थारा नाही. आर्थिक विकासाच्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्तिसापेक्ष असल्या तरी विकासप्रक्रिया मात्र व्यक्तिनिरपेक्ष पद्धतीने काम करत असते. उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री हे घटक अनिवार्य असतात. त्यामुळे या घटकांचा वापर करण्याचं कौशल्य आणि बुद्धिमत्ता किती आहे, यावरच अखेर अंतिम यश अवलंबून असतं.’
हा विचार समजावून सांगण्यासाठी शंतनुराव जपान देशाचं उदाहरण देतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा या देशात अभाव आहे. कच्च्या मालाचा तुटवडा हा मोठा प्रश्न उद्योगांना नेहमी सतावत असतो. पण या देशातील जिद्दी लोक त्यावर मात करतात आणि ‘जगातलं सर्वाधिक औद्योगिक उत्पादन, सर्वाधिक विकासदर’ या कौतुकास्पद स्थितीला आपल्या देशाला घेऊन जातात. या पार्श्वभूमीवर शंतनुराव आपल्याला एक प्रश्न विचारतात, “कशामुळे जमलं असेल त्यांना हे?” आणि त्यांना सापडलेलं उत्तरही आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात,
“त्यांच्याकडचे उद्योगधंदे आणि व्यापार सरकारी मालकीपासून मुक्त आहेत. त्यांच्या देशाचा कारभार समाजवादी तत्त्वानुसार चालवला जात नाही. त्यांच्या देशातील नागरिकांना व्यक्तिगत निर्णय घेऊ दिले गेले, कृती करू दिली आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची कौशल्य त्यांनी आत्मसात केली. या सगळ्याची एकत्रित परिणीती म्हणजे त्यांचं आजचं स्थान!”
शंतनुराव या चित्रदर्शनाबरोबरच सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ आशावादही जागृत करतात. ते म्हणतात, “जपानने जे केलं ते आपल्याला जमणार नाही काय? नक्कीच जमेल. मात्र त्यासाठी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल आणि ती म्हणजे, अर्थशास्त्राचे नियम आणि बाजारपेठातल्या प्रवाहांचा, घडामोडींचा प्रभाव जसा जपान, युरोप किंवा अमेरिकेत महत्त्वाचा ठरतो, तसाच तो भारतातही ठरत असतो. हेच या पुढेही घडत राहील. उंबरठ्याबाहेरचं आर्थिक वास्तव इतकं कठोर असताना केवळ आपल्याकडच्या पारंपरिक समजुतींवर विसंबून भारताचा निभाव लागणार नाही. प्रगती तर दूरच!”
शंतनुराव म्हणजे उद्योगजगतातील प्रचंड धाडस, प्रदीर्घ अनुभव, अखंड गतीशीलता, अफाट ऊर्जा आणि काळाच्याही पुढची स्वप्नं पाहून ती सत्यात उतरवणारी उद्यमशीलता! ‘भारताला एक मजबूत औद्योगिक राष्ट्र बनवण्याची चळवळ मला सुरू करायची होती,’ असं म्हणणारे, भारतीय उद्योगक्षेत्रावर आपल्या कारकिर्दीचा आणि निर्णयक्षमतेचा अमीट-अजरामर असा ठसा उमटवणारे शंतनुराव सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. अधिकाधिक भारतीय हात जेव्हा कृतीशील होऊन उत्पादनात गुंतलेले असतील, तेव्हा शंतनुरावांच्या स्वप्नातला प्रगतीशील, उद्योगशील भारत नक्कीच साकार होईल! आता काळाने सांधा बदललेला आहे, नव्या शतकाचा पाव भाग ओलांडून भारत या प्रवासात आणखी अनेक पावलं चालून पुढे आलेला आहे. शंतनुरावांच्या अनुभवांचे बोल काळाच्या पटलावर आपले प्रत्यय रेखित असताना किर्लोस्करांच्या घराण्यातील पुढच्या पिढ्या यंत्रप्रेमाची, उद्योजकतेची पालखी आनंदाने पुढे नेत आहेत.