महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
१९४७ मध्ये यमुताई पुण्यात आल्या. सामाजिक कामाच्या ओढीमुळेच पुण्यात आल्यानंतर यमुताईंसमोर अनपेक्षित असे एक वेगळेच काम उभे राहिले. देशाची फाळणी झाली होती आणि फाळणीनंतर निर्वासितांचा प्रचंड लोंढा भारतात येऊ लागलेला होता. पुण्यामध्ये आलेल्या निर्वासितांची सोय पिंपरीमध्ये करण्यात आली. सुरुवातीला तिथे आलेल्या निर्वासितांची संख्या होती जवळपास दहा हजार. स. गो. बर्वे हे त्या वेळी पुण्याचे कलेक्टर होते. त्यांच्या सूचनेवरून यमुताईंनी आपल्या सहकारी भगिनींच्या मदतीने या निर्वासितांना जास्तीत जास्त सोयी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी लघुउद्योग व्यवसायांचीही तरतूद करण्यात आली. मुलांसाठी शाळा उभारल्या गेल्या. सर्वतोपरी मदतीचा हात देऊन या होरपळलेल्या दु:खी बांधवांचं आयुष्य अधिकाधिक सुरळीत व्हावं म्हणून शक्य तितक्या मार्गांनी प्रयत्न करण्यात आले. यमुताई या सर्व कामात संपूर्णपणे सक्रीय होत्या.
सर्व बदल झेलत काळ पुढे सरकतच राहतो. स्वातंत्र्य, फाळणीचे दु:ख, स्वतंत्र देशाची नवी वाटचाल यांसह काळाची पावले पुढे पडतच होती. १० वर्षे सरली आणि १९५७ सालच्या डिसेंबरमध्ये ‘नॅशनल वुमेन्स कौन्सिल’च्या पुणे शाखेच्या चेअरमन या नात्याने यमुताईंनी तेरावे अखिल भारतीय अधिवेशन पुण्यात भरवले आणि आपल्या लौकिकाला साजेसे यशस्वी केले. त्याचप्रमाणे ‘वुमेन्स फूड कौन्सिल’मध्येही त्या सहभागी झाल्या. तिथे त्यांनी ‘अन्नपूर्णा’ची व्यवस्था काही काळ हाती घेतली. हिशोबाची पद्धत लावून दिली आणि संस्थेचे कर्ज फेडून सर्व साधने संस्थेच्या मालकीची होतील असे पाहिले. विद्यापीठ, सचिवालय वगैरे ठिकाणी संस्थेतर्फे उत्तम ‘अन्नपूर्णा’ चालत असत. पुढे चार वर्षांनी, म्हणजे १९६१ साली यमुताईंच्या नेतृत्वाखाली भरलेल्या महाराष्ट्र राज्य महिला संमेलनात त्यांनी अतिशय महत्त्वाचे, देशाच्या विकासाचे सूत्र सांगणारे भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी उपस्थित मातांना-महिलांना सल्ला दिला, ‘आपण आपल्या मुलांच्या डोळ्यांपुढे कारखानदारीचे व व्यापाराचे ध्येय ठेवले पाहिजे.’ हा विचार यमुताईंनी स्वतः कृतीत उतरवून दाखवला.
१९५५ पासूनच यमुताई ‘समाजकल्याण मंडळाच्या प्रांतीय शाखे’वर सल्लागार म्हणून काम पाहत होत्या. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील संस्थांची पाहणी करणे, अनुदानासाठी शिफारस करणे किंवा अनुदानाचा वापर कसा होत आहे यांवर देखरेख करणे यासाठी त्यांना महाराष्ट्रभर हिंडावे लागे. ‘समाजकल्याण मंडळा’च्या अध्यक्षा दुर्गाबाई देशमुख यांच्यावर यमुताईंच्या कार्याचा मोठा परिणाम झाला आणि ‘दरिद्री व गरजू स्त्रियांना अर्थसाहाय्य करणारी योजना तयार करा,’ असा आग्रह त्यांनी यमुताईंपाशी धरला. यमुताईंनी या कामी शंतनुरावांचा सल्ला आणि सहकार्य घेण्याचे ठरवले. ही मनीषा त्यांनी पूर्ण करून घेतली आणि शंतनुरावांच्या मदतीने ‘ऑइल इंजिन्स कारखान्या’करिता उत्पादन करणारे केंद्र स्थापन करण्याची योजना तयार झाली. ते साल होतं, १९५६. योजना तयार झाल्यावर, यमुताई ‘सहकारी संस्था स्थापन करणे, कामासाठी आवश्यक भांडवल गोळा करणे, सरकारी अनुदान मिळविणे’ या कामांच्या मागे लागल्या. मराठा चेंबर्सचे दामूअण्णा पोतदार यांनी यमुताईंना बरीच मदत केली. सरकारी उद्योग मंत्रालयाकडून इमारत, मशिनरी आणि चालू खर्चासाठी म्हणून ‘दोन लाख ऐंशी हजार रुपये’ एवढी मदत मिळाली. ऑइल इंजिन्सने पाच हजार रुपये दिले. हे यश यमुताईंनी रेखलेलं होतं. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. हे सारे मदतीचे हात पुढे आले आणि १९५७ साली, खडकी येथे ‘महिला उद्योग कारखाना’ उभारण्याचे निश्चित झाले.
समाजकल्याण यंत्र कामगार महिला सहकारी कारखान्याच्या इमारतीचा कोनशिला समारंभ डिसेंबर १९५७ मध्ये तेव्हाचे केंद्रीय उद्योगमंत्री मनूभाई शहा यांच्या हस्ते झाला आणि मे १९५९ पासून या कारखान्यात इंजिनाची बेअरिंग्ज तयार होऊ लागली. यमुताई प्रथमपासून कारखान्याच्या चेअरमन राहिल्या. सुरुवातीस हा सहकारी कारखाना होता, पुढे त्याचे संयुक्त भांडवली संस्थेत रूपांतर झाले. तीस वर्षे वयाच्या व त्या पुढच्या विधवा, परित्यक्ता, गरजू महिलांना या कारखान्यात काम दिले जाई. आठ तास मशीनवर उभे राहून निरनिराळी कामे करणे स्त्रियांना अवघड जाईल असा पूर्वी समज होता, तो या कारखान्यामुळे खोटा ठरला. सामाजिक भान, संवेदना, कामगारांचे आरोग्य अशा अनेक गोष्टींबाबत सजग असणाऱ्या यमुताईंच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांना दूध आणि जीवनसत्त्वत्युक्त आहार देण्याची व्यवस्थाही कारखान्याने केली.
ऑइल इंजिनखेरीज मोटारींची बेअरिंग्ज करण्याचे कामही या कारखान्यात होत असे. सरकारी कर्ज व्याजासह परत करण्याची आनंदाची वेळ लवकरच आली. कारखान्याची आर्थिक परिस्थिती भरभक्कम झाली आणि पुढे काही वर्षांतच या कारखान्याची एक शाखा कराडला चालू झाली. केवळ स्त्रियांनी यांत्रिक उत्पादन करण्याचे हे अपवादात्मक उदाहरण यमुताईंच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. या उद्योगाचे मूळही किर्लोस्करवाडीच्या अनुभवात शोधता येईल. स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा छोटासा प्रयोग यमुताईंनी तेथे केला होता. शेवया तयार करून विकण्याची कल्पना त्यांनी काढली व त्यामुळे शेवया करणाऱ्या स्त्रियांना ताशी दीड आणा मिळू लागला. सूतकताई कमिटीही या दृष्टीने उपयोगी पडे, कारण त्यातून प्रत्येकीला अठरा-वीस वार कापड मिळे. यमुताईंची ही सामाजिक आणि उद्योजक अशा दुहेरी पातळींवरची घौडदौड लवकरच देशाच्या सीमा ओलांडून साता समुद्रापार विदेशात पोहोचणार होती. यमुताई १९५९ मध्ये कारखान्याच्या यंत्रसामग्रीसाठी इंग्लंडला गेल्या आणि पुढे १९६० मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री संमेलनासाठी इस्तंबूल, टर्की येथे गेल्या. यमुताईंच्या अनुभवाचे आकाश विस्तारत चालले होते. १९६६ मध्ये अमेरिकन सरकारचे आमंत्रण मिळाले. त्या दौऱ्यात त्यांनी शारीरिक व्यंग असलेल्या मुलांच्या संस्थांना भेटी दिल्या. शंतनुरावांबरोबर केलेल्या इतर परदेशवाऱ्यांमध्येही त्यांनी ठिकठिकाणच्या सामाजिक संस्थांच्या कार्याचा सखोल अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा फायदा पुण्यातील अनेक संस्थांना करून दिला. पानशेतच्या पुरानंतर पुण्यातील स्थिती कमालीची दयनीय झाली होती. त्या वेळी सर्व महिला संघटनांच्या वतीने मदत गोळा करणे आणि तिचे सुयोग्य वाटप करणे यांसाठी यमुताईंनी दक्षतापूर्वक पुढाकार घेतला.
यमुताईंनी पुण्यात आल्यावर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीवर काम केलं. कर्वे मंडळी आणि किर्लोस्करांचं नातं, परस्पर स्नेह, परस्पर जिव्हाळा फार मोठा होता. त्यामुळे यमुताईंनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीवर काम करण्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. शंतनुरावांवरही कमिटीचे ट्रस्टी म्हणून भार सोपवण्यात आला. पुढील काळात काही वर्षे यमुताईंनी ‘महाराष्ट्र स्टेट कौन्सिल फॉर वुमेन्स एज्युकेशनचं अध्यक्षपद सांभाळलं आणि नंतर ‘नॅशनल कौन्सिल फॉर वुमेन इन इंडिया’चं अध्यक्षपद देखील भूषविलं.
यमुताईंच्या पुढाकाराने, महिला मंडळातर्फे करण्यात आलेली आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे पुण्यातील वृद्धाश्रम. त्यांनी सौ. भागवतांच्या जोडीने ही संस्था नावारूपाला आणली. तेव्हाचे दीड लाख रुपये खर्चून संस्थेची इमारत आज पुण्यात उभी आहे. इमारत झाली पण तेथे राहणारी माणसे कुठून आणणार, ही अडचण उभी राहिली. तेथे राहायला येणारांना करावा लागणारा १२५ रुपये हा खर्चदेखील परवडणारा नव्हता. मग यमुताईनी शंतनुरावांच्या प्रमाणे ‘गो अहेड’चे धोरण स्वीकारले... त्यासाठी अनेकांच्या सहकार्याने पाच हजार रुपयांचा फंड जमा केला. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या हातून पैशांचा गोंधळ झाला तरी यमुताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभ्या राहत आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेत. आपण अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आपल्या हाताखालची दुय्यम माणसे असा विचार यमुताईंनी कधी केला नाही किंवा कुणाला कधी दुय्यम वागणूक दिली नाही. उलट स्वतःच्या हातून कधी काही विसरले गेले तर त्या तेही मनमोकळेपणाने कबूल करीत.
यमुताईंच्या या सर्व सामाजिक कामांविषयी शंतनुरावांना फार आस्था होती आणि रास्त अभिमानही होता. शंतनुराव आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘इथे मला माझ्या पत्नीच्या, यमुताईच्या कामगिरीचाही आवर्जून उल्लेख करायचा आहे. गरीब, निराधार महिलांसाठी तिनं ‘महिला उद्योग लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. पूर्णतः महिलांनी चालवलेल्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्त्रियाच कंपनीच्या भागधारकही आहेत. हा उद्योग आर्थिकदृष्ट्या तर यशस्वी झालेला आहेच, पण त्याच्यामुळे या दुर्दैवी महिलांचं पुनर्वसनही उत्तम प्रकारे झालं आहे. त्या आता समाजाच्या जबाबदार नागरिक बनल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे. एका अर्थानं, या नोकरदार स्त्रिया पुढच्या पिढ्यांसाठी भक्कम पायाभरणी करत आहेत.’
अशा ध्यासाने झपाटून जाऊन यमुताईंनी समाजाची अथक आणि अपार सेवा केली. सामाजिक कामात तत्परतेने, हिकमतीने, कष्टाने, चिकाटीने यश साध्य करणाऱ्या यमुताईंनी त्या जोडीला कौटुंबिक व्यापही तेवढ्याच किंबहुना किंचितशा अधिकच निगुतीने सांभाळले. राधाबाई गेल्या तेव्हा यमुताई लहानच होत्या, जेमतेम पंचविशीच्या. परंतु राधाबाईंची सर्व जबाबदारी त्यांनी तत्परतेने उचलली. कुटुंबातल्या बहुतेक स्त्रियांची बाळंतपणं वाडीलाच होत असत. अशा कोणत्याही वेळी यमुताई राधाबाईंच्या इतक्याच जबाबदारीने उभ्या ठाकत. ही मंडळी पुण्याला आल्यानंतर जीवनाचं चित्र वेगळं झालं. येणीजाणी, परस्परांसाठी वेळ देणं यात स्थळकाळपरत्वे बदल झाला. किर्लोस्करवाडीत एखादा माणूस आला की तो सगळ्यांना भेटल्याशिवाय परत जात नसे. पुण्यात ही गोष्ट शक्य नव्हती. शांताबाई किर्लोस्कर म्हणत, ‘सुरुवातीला कुणी येऊन गेलं आणि भेटलं नाही असं कळलं की वाईट वाटे.’ पुण्यात हे असंच होणार ही वस्तुस्थिती स्वीकारायला सर्वांना एक-दीड वर्ष लागलं. हळूहळू पुण्यातला गोतावळाही मोठा झाला, प्रत्येकाच्या कामाच्या कक्षाही वाढल्या, बदलले नाहीत ते शंतनुराव व यमुताई. दोघांनी दिवाळीमध्ये एक दिवस साऱ्या कुटुंबीयांना एकत्र बोलावण्याची परंपरा सुरू केली. किर्लोस्करांचे परस्पर नातेसंबंध दृढ राहावेत, प्रेमाची जोपासना होत राहावी म्हणून दोघे नेहमीच झटत असत. एरवीही कुटुंबातल्या कोणाला काही समस्या आली तर ती सोडविण्यासाठी शंतनुराव आणि यमुताईंचं पाऊल नेहमी पुढे असे.
शंतनुराव व यमुताई यांच्या विवाहाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी शुभेच्छा पत्रांचा त्यांच्यावर वर्षाव झाला होता. पैकी एक पत्र किर्लोस्करवाडीच्या सूर्यवंशी कुटुंबाकडून आलं होतं. त्या बोलक्या पत्रात लिहिलं होतं,
‘फुलासवे मातीस गंध लागे… ही केवळ एक उक्ती नसून आम्हा कुटुंबीयांच्या बाबतीत एक महान व सुंदर सत्य आहे. माझं कुटुंब आमणापूरसारख्या लहान खेड्यातलं, परंतु आपल्या कुटुंबीयाच्या सहवासात आलो आणि आमचं सोनं झालं. ‘कार्यावर निष्ठा ठेवा, काम प्रामाणिकपणे करीत राहा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या मागे आपोआप धावत येतील’ ही शिकवण आम्ही उराशी बाळगून आजपर्यंत चालत आहोत. याची परिणती म्हणजे माझ्या कुटुंबात आज बी.ए, एम.ए, बी.कॉम, एम.बी.बी.एस. झालेली मुले, नातवंडे, सुना आहेत. या साऱ्याचं श्रेय आपणांस आहे. आम्ही आपल्या सहवासात आलो आणि केवळ गंधच घेतला नाही तर आम्ही आमच्या जीवनाची फुलबाग फुलविली. आमच्या कुटुंबाने लक्ष्मणरावांचे कठोर पण डोळस प्रेम अनुभवले. कै.ती.शंभोअण्णा आणि कै.मातोश्री गंगावहिनी यांच्याजवळ आम्ही खऱ्या अर्थाने आईची माया उपभोगली. आपण उभयतांनी प्रेम दिलेच, शिवाय संकटकाळी दीपगृहाप्रमाणे मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिले, मायेची सावली दिली, म्हणूनच आम्ही आज थोडेफार सुखा-समाधानाचे दिवस पाहत आहोत.’
घटप्रभेचे आर.व्ही. भागवत यांनी यमुताईंना लिहिले,
‘तुमच्या विवाहसोहळ्यात मी एक व्हॉलेंटियर होतो. तेव्हापासून आज पन्नास वर्षे तुमचा आदर्श, सुखी-समाधानी आणि समृद्ध संसार पाहत आलो आहे. मी आजवर अनेकांना सांगत आलो आहे की आदर्श पति-पत्नी कशी असावीत हे पाहायचे असेल तर आमच्या शंतनुराव-यमुताईंकडे पाहा.’
शंकरभाऊ म्हणतात,
‘लग्न झाल्यापासून शंतनुने यमुला जी देव्हाऱ्यात बसवून ठेवली आहे तो अजूनही ‘यमु, यमु’ करीत तिच्याभोवती असतो ही विशेष कौतुक करण्याजोगी बाब आहे. अत्यंत सरळ हृदय, मनमिळाऊ स्वभाव आणि आनंदी मुद्रा यामुळे शंतनुची विद्या अधिकच खुलते. लक्ष्मणरावांच्या बरोबरीने त्याने काम केले, पण गर्व असा कुठेही बाळगला नाही.’
यमुताईंनी शंतनुरावांना संसारात दिलेली जोड मोलाची आहे. राधाबाईंची किंवा त्या काळची शिकवण पतीला देव समजून वागण्याची होती. यमुताईंनी जणू काही तसेच वर्तन ठेवले. विशेष म्हणजे शंतनुरावही त्यांना तितकाच मान देत आणि त्यांचा आदर राखत. लेडी धनवंती रामाराव यांनी शंतनुराव-यमुताईंचा संसार पाहिल्यावर म्हटले होते,
‘साऱ्या जगभर बायका पतीसाठी, मुलांसाठी स्वेटर विणत असतात; पण स्वतःच्या अनेक व्यापांतून आपल्या बायकोसाठी स्वेटर विणणारा नवरा तुम्ही पाहिला आहे काय? मला शंतनुरावांचं फार कौतुक वाटतं व त्याहीपेक्षा यमुताईंचं.’
पतिपत्नी-संबंधातील आदर्शवत मोकळेपणा पाहायचा असेल तर या जोडप्याकडे बघावे, असे शांताबाई किर्लोस्कर म्हणाल्या होत्या.
‘बायकोला द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही, तरी पण दोघांचे एकमेकांशी वागणे पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. प्रामाणिक, उत्कट, गोडवा भरलेले असे ते असते. यमुताई एकदा आजारी होत्या. माहेरची माणसे भोवताली होती. त्यातच शंतनुराव गडबडीने आले आणि ज्या पद्धतीने त्यांनी यमुताईंचा हात हाती घेतला, त्यात अनेक शब्द आणि भावना ओतप्रोत भरलेल्या होत्या. असे जोडपे क्वचितच पाहायला मिळते.’