महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
कुटुंबासाठी, समाजासाठी, आपल्या कारखान्यासाठी सदैव वाहिलेल्या सत्प्रवृत्त, कलासक्त, रसिक आणि प्रेमळ अशा शंतनुराव आणि यमुताई यांच्या संसार वेलीवर माता-पित्यांचा वारसा सर्वार्थाने पुढे नेणाऱ्या कर्तबगार मुलांच्या जन्माची आणि यशाची आनंदमोहोर उमटली. त्यांचे मोठे चिरंजीव चंद्रकात यांचा जन्म ३० जून १९२८ साली किर्लोस्करवाडी इथे झाला. दुसरे चिरंजीव श्रीकांत यांचा जन्मही किर्लोस्करवाडी इथे १० फेब्रुवारी १९३० साली झाला. १९३७ साली ७ मे या दिवशी, किर्लोस्करवाडी इथे कन्या सरोजिनी यांचा जन्म झाला.
कामाच्या घाईतदेखील मुलांसाठी वेळ देणाऱ्या शंतनुरावांनी वा यमुताईंनी मुलांचे फाजील लाड मात्र कधीही केले नाहीत. शिक्षण आणि अनुभव या दोन्हीची उत्तम जोड मिळून, मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, समर्थ व्हावे हाच त्या दोघांचा दृष्टिकोन होता. मालकांच्या मुलाला धाक लावायला वाडीतील शिक्षक कदाचित घाबरतील म्हणून त्यांनी मुलांना पाचगणीस ठेवले होते. ‘आपल्या मुलांनी अमुकच शिक्षण घ्यायला हवे’ असा आग्रह त्यांनी धरला नाही, परंतु त्या संस्थेची शिस्त पाळली जावी असे मात्र ते अवश्य पाहत. आपल्या मुलांना आरामाच्या जीवनाची सवय विद्यार्थीदशेत लागू नये याची त्यांनी काळजी घेतली.
थोरले चिरंजीव चंद्रकांत यांचे शालेय शिक्षण वाडीला झाले आणि पुढची दोनतीन वर्षे पाचगणीला झाले. त्यानंतर चॉन्सी हॉलमध्ये प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण करून, मेन युनिव्हर्सिटीत त्यांनी चार वर्षांची मेकॅनिकल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केली. शंतनुराव-यमुताईंनी चंद्रकांतला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले तो युद्धकाळ होता, तरीही शंतनुरावांनी त्याला एका आरमारी बोटीतून अमेरिकेत पाठवून दिले. अमेरिकेमध्ये चंद्रकांतने स्वत:चे स्वतः सारे काही करावे असे धोरण राखले होते. शिक्षणानंतर एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन १९५१ मध्ये ते मायदेशी परतले. नागपूरच्या दीक्षितांची कन्या व गंगाधर-पंत किर्लोस्करांची नात सुमन यांच्याशी १९५४ मध्ये चंद्रकांतचा विवाह झाला. या दांपत्यास तीन मुलगे. थोरले दोघे अतुल, संजय आणि धाकटा राहुल. पुढे या तीनही मुलांनी किर्लोस्कर उद्योगाची धुरा जोमाने पुढे नेली. चंद्रकांत व सुमनताई दोघांनाही सामाजिक कार्य व क्रीडा यांची आवड होती. त्याच बरोबर ते दोघेही अनेक संस्थांचे पदाधिकारीही होते. महिला उद्योग, संपदा सहकारी बॅंक, किर्लोस्कर फिल्टर्स, हेमॅटिक मोटर्स, एबीसी इंजीनियरिंग, इनेक्स इंजिन व्हॉल्वज् या संस्थांच्या डायरेक्टर बोर्डावर सुमनताई यांनी काम केलं.
चंद्रकांतांनी ऑइल इंजिन्स कारखान्यात कामास सुरुवात केली. कालांतराने ते कारखान्याचे प्रमुख इंजीनियर झाले. हरिडरच्या म्हैसूर किर्लोस्करचे चीफ इंजीनियर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नंतर १९६२ पासून त्यांनी किर्लोस्कर कमिन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले. किर्लोस्कर किसान, किर्लोस्कर इंजीनियरिंग अशा अनेक कंपन्यांचे ते अध्यक्ष होते. ऑइल इंजिन्स कारखान्याचे ते उपाध्यक्ष होते. त्याखेरीज ज्यांच्या बोर्डावर ते डायरेक्टर म्हणून काम पाहिले त्यापैकी प्रमुख कंपन्या अशा : किर्लोस्कर ब्रदर्स, फलटण शुगर वर्क्स, लक्ष्मी विष्णु कॉटन टेक्स्टाईल, भारत फोर्ज, किर्लोस्कर ट्रॅक्टर्स, वालचंदनगर इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, लकाकी, सुदर्शन केमिकल्स, किर्लोस्कर इंडस्ट्रीज मनिला, न्यू इंडिया अॅश्युरन्स इत्यादी. जवळची मंडळी त्यांना ‘सी. एस.’ किर्लोस्कर म्हणून ओळखत. वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या चंद्रकांतांनी आपली स्वतःची प्रज्ञा दाखवून दिली. केवळ शंतनुरावांचे चिरंजीव म्हणून नव्हे, तर स्वतःच्या गुण-समुच्चयाने त्यांनी किर्लोस्कर उद्योग समूहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले. अधिकाराचा वापर न करता खेळीमेळीने गोष्टी कशा पार पाडता येतील याकडे त्यांनी लक्ष पुरविले.
शंतनुरावांचे दुसरे चिरंजीव श्रीकांत. सोलापूर आणि पाचगणी येथे त्यांचे शिक्षण झाले आणि त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या शिवाजी वर्क्समध्ये काम करायला सुरुवात केली. पुढे यथावकाश ते कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. १९५७ च्या डिसेंबरमध्ये कोल्हापूरचे एस. एम. घाटगे यांची मुलगी शशिकला हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. यमुताईंनी सुनेचे नाव मृणालिनी ठेवले, पण व्यवहारात त्या शशी किर्लोस्कर म्हणून ओळखल्या जात. त्यांचा थोरला मुलगा विक्रम १९५८ मध्ये जन्मला. दुसरी मुलगी रूपलेखा हिचा जन्म १९६१ चा. श्रीकांत यांनी सदर्न गॅस, आफालि फार्मास्युटिकल्स, महाराष्ट्र शुगर मिल्स, डेलस्टार, किर्लोस्कर किसान, गोविंद पॉय ऑक्सिजन या कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डावरही काम केलं. अनेक औद्योगिक आणि सरकारी समित्यांवरही त्यांनी कामे केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन फाँड्रीमेन या संस्थांचे उपाध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र राज्य बास्केट बॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. याखेरीज सोलापुरातील, महाराष्ट्रातील आणि अखिल भारतीय स्तरावरील कित्येक संघटनांशी त्यांचा वेगवेगळ्या नात्याने संबंध आला. इंजीनियरिंग असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने त्यांनी १९७७ मध्ये व्हिएतनाम आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांना भेटी दिल्या होत्या. आपल्या या विदेशवाऱ्यांमधून त्यांनी परदेशातील व्यवस्थापनाचे तंत्र अभ्यासले आणि परत आल्यावर आपल्या कारखान्यात त्याचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला.
शंतनुरावांची मुलगी सरोजिनी यांना जिनी म्हणून ओळखत. त्यांचे शालेय शिक्षण वाडी व पुणे येथे झाले. मुलीलाही हॉस्टेल जीवनाचा अनुभव असावा म्हणून यमुताईंनी सरोजिनीस उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ कॉलेजात ठेवले. शाळा-कॉलेजमध्ये महाराष्ट्र व दिल्ली या दोन्ही राज्यांकडून त्या बॅडमिंटन खेळल्या आहेत. पुढे परदेशी राहण्याचा अनुभव हवा म्हणून कॉलेज सोडून सरोजिनी इंग्लंडला गेल्या व तिथे एक वर्ष फिनिशिंग स्कूलमध्ये काढले. पुढे १९६९-७० मध्ये पुणे विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले.
रवींद्र किर्लोस्करांच्या सूचनेवरून बडोद्याच्या अलेंविकचे भाईलाल अमीन यांचे कनिष्ठ चिरंजीव दिनूभाई यांच्याबरोबर, १९५९ मध्ये सरोजिनीचा विवाह झाला. १९७६ मध्ये दिनूभाई यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर सरोजिनी यांनी ‘ज्योती इलेक्ट्रिक मोटर्स’मध्ये विशेष अधिकारी म्हणून काम पाहायला सुरुवात केली. संगीत आणि नृत्याबरोबरच पोल्ट्रीचा छंद ही त्यांची वेगळी ओळख बनली!
मुलांनी मोठे झाल्यानंतर स्वतंत्र राहावे ही लक्ष्मणरावांच्या वेळेपासूनची शिकवण होती. शंतनुरावांनी ती शिकवण पुढे चालू ठेवली. आपल्या कुटुंबीयांनाही ते तसाच सल्ला देत. मुकुंदरावांचे लग्न झाल्यावर त्यांना, ‘आता तुम्ही वेगळे घर करा,’ असे त्यांनी म्हटले होते. ‘मी कसा बोलू?’ हा प्रश्नच त्यांच्याजवळ नसे. त्यामुळे विवाहानंतर चंद्रकांत-सुमनताई यांचे वेगळे घर झाल्यावर कोणाला नवल वाटले नाही. मात्र ते शेजारीच राहत असल्यामुळे नातवंडांचा हवा तेवढा सहवास शंतनुराव व यमुताईंना लाभत राहिला. जसे शंतनुराव अमेरिकेहून परत आल्यानंतर प्रथम कारखान्यात अप्रेंटिस इंजीनियर म्हणून पन्नास रुपयांवर काम करू लागले होते, मुलांनीही तळापासून सुरुवात करून सर्व खात्यांमधील कामांचा आलटूनपालटून अनुभव घेऊन स्वयंकर्तृत्वाने मोठे झाले पाहिजे, असा लक्ष्मणरावांचा आग्रह होता, कटाक्ष होता. हीच परंपरा शंतनुरावांनी आपल्या मुलांच्या बाबतीतही पाळली. चंद्रकांत १९५१ मध्ये अमेरिकेहून शिकून आल्यानंतर ऑइल इंजिन्समध्ये शंकर मुकादम यांच्या हाताखाली स्टेशनवरील पार्सलांच्या लोडिंग-अनलोडिंगचे काम करीत असत. कंपनीच्या सर्व खात्यांत क्रमाने कामे करून त्यांनी त्या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रारंभी त्यांना दरमहा एकशे पासष्ट रुपये पगार होता आणि त्या वेळी त्यांचा एकच ध्यास होता की स्वतःच्या कमाईचे निदान दोन हजार रुपये तरी बँकेत पडावेत. वडील तेवढे रुपये एका रकमेने देऊ शकले असते. परंतु चंद्रकांतना ते दोन हजार रुपये स्वतःच्या कमाईचे हवे होते आणि ते मिळविल्यावर त्यांना अपरिमित आनंद झाला होता.
श्रीकांत यांनाही शंतनुरावांनी प्रथम कारकुनाच्या टेबलपासून काम करायला लावले आणि शिस्तीत काम करायची सवय लागल्यावरच बढती दिली. चंद्रकांतांचे चिरंजीव अतुल व संजय यांनीही बॉस्टनला जाण्यापूर्वी दोन महिने किर्लोस्कर किसान कारखान्यात मशीनवर काम केले. चंद्रकांत म्हणतात,
‘उद्योगपतीची कारखान्यातील तिसरी पिढी म्हणून आम्हाला फायदे मिळाले, पण काही परीक्षाही द्याव्या लागल्या. लक्ष्मणरावांपेक्षा बाबाने निराळ्या परिस्थितीत काम करून कारखाने वाढविले, त्या पायावर माझी पिढी उभी राहिली. आम्हाला त्यांच्या पिढीपेक्षा वेगळ्या, जास्त गुंतागुंतीच्या कसोट्या द्याव्या लागल्या. लक्ष्मणरावांनी साधी यंत्रे वापरली, आम्ही आता जगातील सर्वात आधुनिक यंत्रे वापरत आहोत.’
शंतनुरावांचे चरित्रकार सविता भावे लिहितात की, ‘मुलांच्या बाबतीतही शंतनुराव आपला वैचारिक अलिप्तपणा राखू शकले ही एक अपवादात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. या वृत्तीने आपल्या मुलांकडे पाहणे कित्येक मोठमोठ्या माणसांना जमलेले नाही आणि त्यामुळे बाप अतिशय नामवंत तर मुलगा वा नातू कोठे तरी वाहवत गेलेला, असे अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. शंतनुरावांनी आपल्या मुलांच्या बाबतीत अगदी व्यवहारी दृष्टिकोन पत्करून, त्यांच्या वृत्तीची नीट पारख करून त्यांना योग्य तऱ्हेने मार्गावर ठेवण्याकरिता जी जागरूकता दाखविली ती म्हणूनच बिनतोड समजली पाहिजे. याचे कारण असे असू शकेल की, आपण कोणत्या परंपरेचे वारस आहोत आणि त्या परंपरेची आपण कशी जोपासना केली आहे, याचे शंतनुरावांना सतत भान होते आणि ती परंपरा चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्यांना जाणीव होती.’